भारत, ब्राझील व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य वाढविण्याच्या दिशेने…

0

भारत आणि ब्राझील या देशांनी, त्यांच्या प्राधान्य व्यापार कराराची (PTA) व्याप्ती वाढविण्याचा तसेच कृषी, संरक्षण, डिजिटल नवोपक्रम आणि स्वच्छ ऊर्जा अशा क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य बळकट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे द्विपक्षीय आर्थिक आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘भारत-ब्राझील बिझनेस डायलॉग’ या कार्यक्रमादरम्यान, हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. FICCI, ApexBrasil आणि National Confederation of Industry (CNI) यांनी या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजन केले होते. दोन्ही देशांनी यावेळी, व्यापार वृद्धिंगत करणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढविण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची पुन:पुष्टी केली.

ब्राझीलचे उपराष्ट्रपती आणि विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्री जेराल्डो अल्कमिन, यांनी भारताला ब्राझीलच्या व्यापार विविधीकरण धोरणातील ‘प्राथमिक भागीदार’ असे संबोधले. 2024 मध्ये, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 12 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता, जो 2030 पर्यंत 20 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.

“आम्हाला प्राधान्य व्यापार कराराचा विस्तार करायचा आहे, जेणेकरुन आमच्या व्यापार प्रवाहाला गती मिळेल,” असे अल्कमिन म्हणाले. गुंतवणूक सुलभीकरण आणि दुहेरी कर रोखण्यासाठीच्या यंत्रणा यासारख्या उपक्रमांमुळे स्थिर व्यवसाय वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दोन्ही देश, भारत आणि मर्कोसुर – ज्यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे या देशांचा समावेश आहे, त्या दक्षिण अमेरिकन व्यापार गटातील विद्यमान PTAचा विस्तार करण्याचे मार्ग शोधत आहेत. जेणेकरून, अधिक शुल्क सवलती आणि बाजारपेठेतील सुलभ प्रवेश दोन्ही शक्य होईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘हे प्रयत्न लॅटिन अमेरिका आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसोबत व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या भारताच्या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे.’

अल्कमिन यांनी भारतीय कंपन्यांना- वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, अक्षय ऊर्जा, आरोग्यसेवा, कृषी, एरोस्पेस आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणुक करण्यासाठी आमंत्रण दिले. “दोन्ही देश ई-व्हिसा प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उच्च कार्यक्षमता संगणन आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सचा समावेश असलेल्या डिजिटल भागीदारीवर काम करत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, यांनी यावेळी भारताच्या आर्थिक सशक्तीकरणावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, “2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP 7.8% ने वाढला आहे आणि IMF (International Monetary Fund) ने 2025 साठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.6% पर्यंत वाढवला आहे.” “ब्राझीलसोबतची आपली वाढती भागीदारी दोन्ही अर्थव्यवस्थांची परस्परपूरकता दर्शवतो,” असेही ते म्हणाले. त्यांनी कृषी क्षेत्राला परस्पर सहकार्य आणि जागतिक अन्नसुरक्षेसाठी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून अधोरेखित केले.

सध्या (FY25), भारताचा ब्राझीलसोबतचा व्यापार अधिशेष 6.77 अब्ज डॉलर्सची निर्यात आणि 5.42 अब्ज डॉलर्सची आयात इतका आहे. आर्थिक वर्ष 2023 नंतर, एकूण व्यापारात थोडीशी घट झाली असली तरी, केंद्रित धोरणात्मक समन्वयामुळे या व्यापाराला पुन्हा गती मिळेल, अशी दोन्ही देशातील अधिकाऱ्यांना आशा आहे.

या कार्यक्रमात, ‘इंडिया-ब्राझील बिझनेस लीडर्स फोरम’चा पुन:प्रारंभ (रिलाँच) करण्यात आला. यावेळी, FICCI आणि CNI यांनी खाजगी क्षेत्रातील संवाद वाढवण्यासाठी ‘संदर्भ अटीं’वर चर्चा केली.

CNI चे फेडरिको लामेगो आणि ApexBrasil च्या अना रेपेज्झा या अन्य सहभागी वक्त्यांनी, यावेळी बिझनेस-टू-बिझनेस सहकार्यातील नवकल्पना आणि शाश्वत विकासाला चालना देण्याबाबतचे महत्त्व अधोरेखित केले.

मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या संरचनात्मक सुधारणा, व्यवसाय सुलभीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारासंबंधी केंद्रित धोरणाचा पुनरुच्चार केला. त्यांनी मॅक्रो-आर्थिक स्थैर्य, आधुनिक पायाभूत सुविधा आणि जीवनमानातील सुधारणा यांचे भारताच्या प्रगतीचे तीन स्तंभ म्हणून वर्णन केले.

दोन्ही देशांनी, आपली भागीदारी केवळ व्यापारापुरती मर्यादित न ठेवता, त्यापलीकडे जाऊन तंत्रज्ञान, नवोपक्रम, कृषी आणि संरक्षण सहकार्य या क्षेत्रांमधील आपली भागीदारी अधिक दृढ करण्याची आपली इच्छा व्यक्त केली.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleUK-India Defence Ties Enter ‘Era of Co-Production’, Says UK Defence Minister
Next articleकोचीन शिपयार्डला LNG कंटेनरशिप्सची मोठी जागतिक ऑर्डर प्राप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here