पूर्व लडाखमध्ये LAC बाबत भारत- चीनमध्ये नव्याने लष्करी चर्चा

0

भारत आणि चीनमध्ये 25 ऑक्टोबर रोजी उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या एका नव्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता आणि स्थिरता राखण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या ठिकाणी 2020 पासून दोन्ही देशांमधील संघर्षानंतर तणावाचे वातावरण आहे.

 

 

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम क्षेत्रात सामान्य पातळीच्या यंत्रणेअंतर्गत चर्चा झाली – 19 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या 24 व्या फेरीनंतर अशा प्रकारची ही पहिलीच चर्चा होती.

“ही चर्चा मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चेच्या 22 व्या फेरीपासूनच्या प्रगतीचा आढावा दोन्ही बाजूंनी घेतला. दोन्ही शिष्टमंडळांनी “भारत-चीन सीमा भागात शांतता आणि स्थैर्य राखले गेले आहे यावर एकमत असल्याचे सांगितले” आणि भूभागाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आणि स्थिरता राखण्यासाठी विद्यमान यंत्रणांचा वापर सुरू ठेवण्यावर सहमती दर्शविली.

बुधवारी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने एका वेगळ्या निवेदनात, कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चेचा 23 वा टप्पा भारतीय बाजूच्या मोल्डो-चुशुल सीमा बैठक पॉइंटवर झाल्याची पुष्टी केली. “चीन-भारत सीमेच्या पश्चिम भागाच्या व्यवस्थापनाबाबत  दोन्ही बाजूंनी सक्रिय आणि सखोल संवाद साधला,” असे निवेदनात म्हटले आहे.

बीजिंगने पुढे म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग – यांच्या बैठकीत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सहमतीच्या मार्गदर्शनानंतर लष्करी आणि राजनैतिक माध्यमांद्वारे संवाद पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि सीमावर्ती भागात शांतता आणि  संयुक्तपणे सुव्यवस्था राखण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे.

पूर्व लडाखमधील उर्वरित फ्रिक्शन पॉइंट्सवर तणाव कमी करण्यासाठी आणि सैन्य माघारीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कॉर्प्स कमांडर-स्तरीय संवाद ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे. पँगोंग त्सो, गलवान आणि गोग्रा यासह अनेक ठिकाणी सैन्य माघारी पूर्ण झाली असली तरी, देप्सांग आणि डेमचोक येथे प्रलंबित मुद्दे कायम आहेत.

ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या विशेष प्रतिनिधींच्या संवादानंतर नव्याने चर्चा झाली, ज्यामध्ये सीमा व्यवस्थापनात सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्याची आणि एकूणच द्विपक्षीय स्थिरता राखण्याची गरज अधोरेखित झाली.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू: राफेलमधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती
Next articleचीनचा ‘डिजिटल सिल्क रोड’ आपली जागतिक पकड मजबूत करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here