संरक्षण संशोधन आणि विकास सहकार्य वाढवण्यासाठी DRDO-DAG यांच्यात करार

0
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि शस्त्रास्त्र महासंचालनालय (DGA) फ्रान्स यांच्यात संरक्षण संशोधन आणि विकासात सहकार्य वाढवण्यासाठी एक तांत्रिक करार करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत आणि फ्रान्सच्या राष्ट्रीय शस्त्रास्त्र संचालक (DGA) फ्रान्स लेफ्टनंट जनरल गेल डियाझ डी टुएस्टा यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील DRDO भवन येथे या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे प्रगत संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानात दीर्घकालीन सहकार्यासाठी एक समर्पित चौकट प्रस्थापित झाली आहे.

 

भविष्यातील संरक्षण आव्हानांच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे/संस्थांच्या एकत्रित कौशल्याचा आणि संसाधनांचा वापर करणे हे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. यामुळे संरक्षण संशोधन आणि विकासातील कौशल्य तसेच ज्ञान वाढविण्यासाठी संयुक्त संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम, चाचणी उपक्रम, माहितीची देवाणघेवाण, कार्यशाळा, चर्चासत्रे इत्यादींचे आयोजन करण्यास औपचारिक चौकट उपलब्ध होऊ शकेल.

 

ही घोषणा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या भारत भेटीपूर्वी करण्यात आली आहे, जिथे ते जागतिक एआय शिखर परिषदेसाठी उपस्थित राहतील, ज्यामुळे संरक्षण-केंद्रित एआय अनुप्रयोगांसह उदयोन्मुख तंत्रज्ञानात दोन्ही राष्ट्रांमधील वाढत्या अभिसरणाचे संकेत मिळतात.

 

भारताच्या संरक्षण आणि अवकाश लँडस्केपला आकार देणारी भागीदारी

गेल्या दोन वर्षांत वेगवान झालेल्या भारत-फ्रेंच लष्करी आणि औद्योगिक सहकार्याच्या सतत वाढत असणाऱ्या संधीच्या पार्श्वभूमीवर हा नवीन करार आधारित आहे.

पुढील पिढीतील AMCA इंजिन: भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी सह-विकास

भारताने अलिकडेच सफ्रानसोबत भागीदारी करून ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी (AMCA)  120 KN फायटर इंजिन संयुक्तपणे डिझाइन केले आहे. या कार्यक्रमात संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे, ज्यामध्ये हॉट-सेक्शन मेटलर्जी आणि सिंगल-क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. भारताच्या प्रणोदन क्षमतेमध्ये दीर्घकाळापासून यांची गरज आहे.

भारतासाठी, स्वदेशी इंजिन विकासातील अनेक वर्षांच्या आव्हानांनंतर हा प्रकल्प एक निर्णायक झेप दर्शवितो.

IMRH साठी स्वदेशी हेलिकॉप्टर इंजिन

रोटरी-विंग विभागात, HAL आणि Safran भारतीय मल्टी-रोल हेलिकॉप्टर (IMRH) कार्यक्रमासाठी अरावली इंजिन संयुक्तपणे विकसित करत आहेत. फ्रेंच तांत्रिक सहाय्य आणि सह-अभियांत्रिकीद्वारे सक्षम केलेल्या व्यापक भारतीय डिझाइन इनपुटसह शक्तिशाली हेलिकॉप्टर इंजिन तयार करण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न आहे.

एक धोरणात्मक उत्पादन आधार म्हणून भारताचा उदय

औद्योगिक आघाडीवरही भारत-फ्रेंच सहकार्य विस्तारत आहे. गोदरेज एरोस्पेसने अलीकडेच सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सकडून LEAP इंजिनसाठी टायटॅनियम व्हेंटिलेशन असेंब्ली तयार करण्यासाठी पाच वर्षांचा करार मिळवला आहे, जो जगभरातील हजारो व्यावसायिक विमानांमध्ये वापरला जाणारा पॉवरप्लांट आहे.

सफ्रानच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की हा करार जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळींमध्ये एक आवश्यक नोड म्हणून भारताचे वाढते स्थान प्रतिबिंबित करतो.

हैदराबादमध्ये M88 देखभाल सुविधा

सफ्रान हैदराबादमध्ये त्यांचे पहिले परदेशी M88 इंजिन देखभाल केंद्र देखील स्थापन करत आहे – ही सुविधा भारताच्या राफेल ताफ्याला शक्ती देणाऱ्या इंजिनांना सेवा पुरवणार आहे. पूर्णपणे कार्यरत झाल्यावर, ते दरवर्षी 600 हून अधिक इंजिन मॉड्यूलचे ओव्हरहॉल करेल. त्यामुळे सुमारे हजार तज्ज्ञांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.

सफ्रानच्या वरिष्ठ नेतृत्वाने भारताच्या संरक्षण स्वावलंबनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याचा औद्योगिक पाया अधिक खोलवर नेण्यासाठी हे केंद्र म्हणजे एक धोरणात्मक वचनबद्धता असल्याचे वर्णन केले आहे.

वाढते धोरणात्मक अभिसरण

भारत आणि फ्रान्ससाठी, नवीन तांत्रिक करार हा केवळ एक प्रक्रियात्मक पाऊल नाही; तर तो सह-विकास, सामायिक नवोपक्रम आणि दीर्घकालीन तांत्रिक विश्वासावर आधारित परिपक्व भागीदारीला औपचारिक मान्यता देतो.

जागतिक एआय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या आगामी भेटीसह, नवी दिल्ली आणि पॅरिस केवळ संरक्षण तंत्रज्ञानातच नव्हे तर एआय प्रशासन, दुहेरी-वापर अल्गोरिदम, स्वायत्त प्रणाली आणि सुरक्षित सायबर-एआय एकत्रीकरणातही सहकार्य वाढवतील अशी अपेक्षा आहे.

दोन्ही देश धोरणात्मक स्वायत्तता आणि उच्च-स्तरीय क्षमता विकासावर लक्ष केंद्रित करत असताना, येत्या वर्षात त्यांची संरक्षण आणि तंत्रज्ञान भागीदारी आणखी दृढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Takes Centre Stage as Quad Navies Conclude Malabar 2025 Near Guam
Next articleक्वाड नौदलाच्या मलबार 2025 चा गुआमजवळ समारोप, भारत केंद्रस्थानी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here