पेरूमधील विशेष खनिजांवर भारताचे लक्ष; PERUMIN 37 मध्ये होणार सहभागी

0

भारत आता पेरूमधील आपल्या गुंतवणुकीकडे अधिक गांभीर्याने पाहत आहे. 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान, अ‍ॅरेक्विपा  येथे होणाऱ्या ‘PERUMIN 37′ या लॅटिन अमेरिकेतील आघाडीच्या मायनिंग (खाण क्षेत्र) अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहे.

ही भेट म्हणजे,  महत्त्वपूर्ण खनिजांसाठी विविध स्रोत तयार करणे आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न भागीदारांसोबत आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणे, या नवी दिल्लीच्या उद्दिष्टाचे प्रतीक आहे.

या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व, मायनिंग मंत्रालयाचे सहसचिव विवेक कुमार बाजपेयी करतील. त्यांच्यासोबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, पोलाद मंत्रालय, इंडियन ब्युरो ऑफ माईन्स आणि जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, अशा विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. याशिवाय, SAIL, NMDC, MOIL, Coal India, HCL, GAIL, Jindal Steel & Power यांसारख्या भारतातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रतिनिधी देखील यात सहभागी होणार आहेत. यातूनच पेरूच्या खाण क्षेत्रातील उद्योगांविषयीची भारताची वाढती रुची दिसून येते.

“हे केवळ एक औद्योगिक अधिवेशन नाही, तर हे भारताच्या विकास उद्दिष्टांना पेरूच्या खनिज संपत्तींशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे,” असे भारतातील पेरूचे राजदूत जेव्हिअर मॅन्युएल पॉलीनिच वेलार्डे यांनी नमूद केले. “ही भागीदारी ऊर्जा, नवकल्पना, आणि सर्वसमावेशक प्रगतीस चालना देऊ शकते,” असेही ते म्हणाले.

महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिजांच्या शोधात असलेल्या भारतासाठी पेरू एक महत्त्वाचा भागीदार बनत आहे. आजवर भारत-पेरू व्यापारात सोन्याचे प्रमाण सर्वाधिक होते. 2014 ते 2023 दरम्यान, 357 टनांहून अधिक सोने भारतात निर्यात झाले. मात्र आता लक्ष लिथियम, तांबे (Copper), आणि दुर्मिळ खनिजांकडे वळत आहे.

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Falchani लिथियम ठेवा, जो जगातील सर्वात मोठ्या हार्ड-रॉक लिथियम साठ्यांपैकी एक आहे. यात सुमारे 9.5 दशलक्ष टन लिथियम कार्बोनेट आहे. पेरू दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठ्या लिथियम रिफायनरीचे बांधकाम करत आहे, जी 2027 पासून उत्पादन सुरू करेल. एकदा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर, ही रिफायनरी दरवर्षी 100,000 टन बॅटरी-ग्रेड लिथियम कार्बोनेट पुरवू शकते.

हा प्रकल्प, भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांशी सुसंगत आहे, कारण हे क्षेत्र लिथियम-आयन तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. लिथियम व्यतिरिक्त, पेरूमधील तांबे, चांदी, झिंक, आणि लोखंडाचे साठे तसेच नव्याने सापडलेले दुर्मिळ खनिज भारतासाठी रणनीतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत.

भारत आणि पेरू Free Trade Agreement (FTA) वर वाटाघाटी करत असून, तो 2025 मध्ये अंतिम होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रथमच भारताने महत्त्वपूर्ण खनिजांसाठी स्वतंत्र प्रकरण (dedicated chapter) सुचवले आहे, ज्यामध्ये प्राधान्य प्रवेश, संयुक्त अन्वेषण, आणि लांब पल्ल्याच्या पुरवठा साखळींसाठी स्थिर दर यांचा समावेश असेल.

माहितगार सूत्रांच्या मते, भारत खनिज उत्खनन आणि शुद्धीकरण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्पष्ट चौकट देखील तयार करत आहे, विशेषतः लिथियम आणि तांबे क्षेत्रात, जेथे जागतिक स्पर्धा वाढत आहे. दुसरीकडे, पेरू आपला निर्यात पोर्टफोलिओ विस्तृत करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे तो भारताला एक विश्वसनीय आणि स्थिर भागीदार मानतो.

आजवर सोन्याच्या व्यापारातून दोन्ही देशांत चांगले संबंध असले, तरी पेरूमध्ये फारशी भारतीय गुंतवणूक झालेली नाही. StratNews Global शी बोलताना, पेरूचे परराष्ट्रमंत्री एल्मर शिआलेर यांनी ही उणीव अधोरेखित केली आणि भारतीय कंपन्यांना खनिज व ऊर्जा क्षेत्रातील संधींचा शोध घेण्याचे आमंत्रण दिले.

एक विशेष पण तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे क्षेत्र म्हणजे, पेरूमधील लिथियम आणि युरेनियमच्या साठ्यांचा एकत्रित परिसर, जिथे विशेष तांत्रिक कौशल्याची गरज आहे. भारतीय कंपन्या येथे रस दाखवत असून, फक्त कच्चा माल नाही, तर मूल्यवर्धित प्रक्रिया भागीदारीचाही विचार करत आहेत.

Voice of Global South Summit मध्ये, पेरूने सहभाग घेतल्याने भारताशी जलवायू बदल, शाश्वत विकास, आणि व्यापार समता यांसारख्या मुद्यांवर सहकार्य वाढण्याचे संकेत मिळाले.

PERUMIN 37 हे अधिवेशन, पेरूसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर होते आहे, कारण 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, देश राजकीय व आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. पेरूची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर खनिज क्षेत्रावर अवलंबून आहे, आणि हेच क्षेत्र आता बेकायदेशीर व्यवहारांविरुद्ध कारवाई, प्रशासकीय अडथळ्यांचे निर्मूलन, आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पुढे येत आहे.

भारतासाठी यंदाचे अधिवेशन हे प्रतीकात्मक आणि धोरणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून महत्त्वाचे आहे. हे भारताच्या महत्त्वपूर्ण संसाधनांच्या सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन दृष्टिकोन, लॅटिन अमेरिकेबरोबर संबंध दृढ करण्याचे उद्दिष्ट, आणि जागतिक उत्पादन व ऊर्जा केंद्र म्हणून आपली भूमिका प्रस्थापित करण्याच्या योजनांशी सुसंगत आहे.

आत्तापर्यंतच्या $4 अब्ज डॉलर्सहून अधिकच्या द्विपक्षीय व्यापारामुळे आणि सहकार्याची नवी क्षेत्रे उघडत असल्यामुळे, भारत आणि पेरू – सामायिक हितसंबंध, शाश्वत विकास आणि परस्पर विश्वासावर आधारित आपली भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहेत.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleIAF Chief: India Needs Aircraft with Long-Range Missile Strike Capabilities
Next articleEU च्या अर्थमंत्र्यांनी ‘Digital Euro’ लाँचच्या रोडमॅपला दिला पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here