उरुग्वे आणि इक्वेडोरमध्ये नवीन दूतावास सुरू करण्याची भारताची योजना

0

भारत, उरुग्वेची राजधानी माँटेव्हिडीओ आणि इक्वाडोरची राजधानी क्विटो येथे नवीन दूतावास उघडण्याची योजना आखत असून, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (LAC) प्रदेशात आपली राजनैतिक उपस्थिती बळकट करत आहे. हे महत्वपूर्ण पाऊल, या क्षेत्रांशी नवी दिल्लीचे वाढते संबंध अधोरेखित करते.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या माँटेव्हिडीओ दौर्‍याच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत, जिथे ते भारताच्या दूतावासाचे उद्घाटन करतील. त्यांचा हा दौरा उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन क्विटो येथे भारतीय दूतावासाच्या उद्घाटनासाठी जाण्याची शक्यता आहे, जो भारत-इक्वाडोर संबंधांच्या पाच दशकांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

हा विस्तार शाश्वत विकास, व्यापार आणि बहुपक्षीय सहकार्यासाठी सामायिक उद्दिष्टे असलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या ‘ग्लोबल साउथ’ (Global South) समूहांसोबत, संबंध दृढ करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. उरुग्वे आणि इक्वेडोरमधील दूतावासांद्वारे भारत द्विपक्षीय संबंध, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि साऊथ-टू-साऊथ भागीदारी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

भारताच्या प्रादेशिक धोरणात उरुग्वे एका महत्त्वाचे स्थान भूषवतो. हा देश त्याचे राजकीय स्थैर्य, आर्थिक पारदर्शकता आणि उदार व्यापार धोरणांसाठी ओळखला जातो. StratNews Global शी बोलताना भारतातील उरुग्वेचे राजदूत अल्बर्टो ग्वानी यांनी आपल्या देशाचे वर्णन “कायद्याचे शासन असलेले, एक मजबूत लोकशाही राष्ट्र, तसेच आर्थिक स्थैर्य, पारदर्शक प्रक्रिया आणि या प्रदेशातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले राष्ट्र” असे केले.

त्यांनी, भारतीय उद्योगांसाठी उरुग्वेमधील पारदर्शक व्यवसाय प्रणाली, फ्री पोर्ट आणि विमानतळ सुविधा, तसेच 14 आर्थिक मुक्त क्षेत्रे हे प्रमुख आकर्षण असल्याचे नमूद केले. उरुग्वेची दीर्घकालीन विकासासाठीची वचनबद्धता देखील उल्लेखनीय आहे. देशातील 98% वीज वारा, सौर आणि बायोमास यांसारख्या अक्षय उर्जेतून निर्मित होते. नोएडा येथे कार्यालय असलेल्या उरूग्वेच्या एका कंपनीद्वारे, सध्या भारतातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी एक डझनहून अधिक बॉयलर तयार केले जात आहेत.

भारत-उरुग्वे राजनैतिक संबंधांची सुरुवात 1948 मध्ये झाली, जेव्हा उरुग्वे भारताशी औपचारिक संबंध प्रस्थापित करणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश बनला. उरुग्वेने कायम भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थानाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही उरुग्वेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या, पहिल्या काही भारतीय कंपन्यांपैकी एक होती, जिने माँटेव्हिडिओचा वापर क्षेत्रीय विस्तारासाठी एक लाँचपॅड म्हणून केला.

2026 मध्ये, उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचा पहिला भारत दौरा होणार असून, हा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावर आधारित असेल. एप्रिल 2026 मध्ये, उरुग्वे CELAC (Community of Latin American and Caribbean States) चे अध्यक्षपद स्विकारेल, ज्यामुळे MERCOSUR आणि ALADI सारख्या प्रादेशिक संघटनांशी संवाद साधण्याची भारताची संधी अधिक वाढेल.

क्विटोतील भारताचा नवा दूतावास, लॅटिन अमेरिकेतील दुर्मिळ खनिज क्षेत्रावरील भारताच्या वाढत्या स्वारस्याटे प्रतीक आहे. इक्वाडोरकडे तांबे, लिथियम आणि कोबाल्ट यांसारख्या खनिजांचे मोठे साठे आहेत, जे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे इक्वाडोर भारताच्या ऊर्जा संक्रमणात एक महत्त्वाचा भागीदार म्हणून उदयास येत आहे.

भारत–इक्वाडोर राजनैतिक संबंधांना 56 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, भारतातील इक्वाडोरचे राजदूत फर्नांडो झेवियर बुचेली वर्गास म्हणाले की, “यावर्षी आपण केवळ एक आकडा साजरा करत नाही; तर आपण सखोल होत चाललेल्या संबंधांचे, दृष्टिकोनाचे आणि मानवी नात्यांचे उत्सव साजरे करत आहोत.”

इक्वाडोरचे खाण क्षेत्र अजूनही विकसित होत असले,तरी Mirador आणि Fruta del Norte यांसारख्या प्रकल्पांमुळे, भविष्यातील सहकार्यासाठी संधी निर्माण होत आहेत. तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि शेती या क्षेत्रांत, भारत आपले कौशल्य सामायिक करण्यासाठीही सज्ज होत आहे.

क्विटोतील नव्या भारतीय दूतावासाचे प्रभारी अधिकारी लोकेश कुमार मीणा यांनी सांगितले की, “हा दूतावास द्विपक्षीय संबंधांच्या नव्या टप्प्याची सुरुवात करेल, ज्यामध्ये प्रशिक्षण, नवोन्मेष आणि संयुक्त प्रकल्पांवर भर दिला जाईल.” त्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा, विशेषतः युपीआयचा (UPI) उल्लेख केला, जे दररोज 600 दशलक्षांहून अधिक मूल्याचा व्यवहार हाताळते आणि जे या प्रदेशातील आर्थिक समावेशनासाठी एक आदर्श ठरू शकतो.

लॅटिन अमेरिकेमध्ये- ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू आणि कोलंबिया येथे आधीपासूनच भारताचे दूतावास आहेत. आता उरुग्वे आणि इक्वाडोरमध्ये दूतावासाचा विस्तार करून, भारत या खंडातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे. यामुळे नवी दिल्लीला अक्षय ऊर्जा, डिजिटल नवकल्पना, उच्च शिक्षण आणि शाश्वत व्यापार यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवणे सोपे होईल.

ही राजनैतिक पावले, भारताच्या लॅटिन अमेरिकेसोबतच्या दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहेत. हा प्रदेश काळानुरुरप, भारताच्या व्यापार, तंत्रज्ञान आणि ऊर्जा विविधीकरण धोरणांसाठी अधिकाधिक महत्त्वाचा ठरत आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleपॅसिफिक-इंडिया डिजिटल कॉरिडॉर: एक दृष्टीक्षेप…
Next articleटांझानियातील निवडणुकविरोधी आंदोलन पेटले; शेकडो जण ठार झाल्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here