भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रेई बेलोसोव्ह यांच्यात मॉस्को येथे भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्याच्या (IRIGC-M&MTC) 21व्या सत्रादरम्यान विशेष बैठक पार पडली. या बैठकीत India – Russia भागीदारीविषयी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याचे दोन्ही देशांनी “विशेष धोरणात्मक भागीदारी” (Special and Privileged Strategic Partnership) म्हणून स्वागत केले.
द्विपक्षीय संबंधांना दुजोरा
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत भारत-रशिया संबंधांचे मजबूत स्वरूप अधोरेखित केले. तसेच ही भागीदारी भविष्यात टिकवून ठेवण्याच्या पैलूंवरही भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये लागोपाठ रशियाचे दोन दौरे केले. या भेटींनंतर दोन्ही देशातील परस्पर संबंध आणि संवाद अधिक बळकट झाले, असेही सिंह यांनी यावेळी नमूद केले. सिंह यांनी देशांतर्गत संरक्षण उद्योग बळकट करण्याबाबतच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही यावेळी केला. तसेच संयुक्त संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने भारताने सुरु केलेल्या ‘Make in India’ उपक्रमांमध्ये रशियन उद्योगांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.
“आम्ही आमच्या देशांतर्गत संरक्षण क्षेत्राच्या क्षमतेचा विस्तार करण्याचा आणि रशियन उद्योगांच्या साहाय्याने दोन्ही देशाची क्षमात वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे सिंग यावेळी म्हणाले. यासोबतच भारताच्या विविध धोरणात्मक प्रकल्पांची पुष्टी त्यांनी यावेळी केली. BRICS, G20 आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) यासह बहुपक्षीय व्यासपीठांवर दोन्ही देशांमधील असलेल्या यशस्वी सहकार्याचीही त्यांनी प्रशंसा केली.
रशियाचा सकारात्मक दृष्टीकोन
तर दुसरीकडे, रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव्ह यांनी ‘भारत एक विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार आहे’ अशा शब्दांत भारताची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की, ‘’आमचे भारतासोबतचे नाते हे परस्पर आदर आणि विश्वासावर जोडले गेले असून, दोन्ही देशातील राजकीय नेत्यांच्या घनिष्ठ संबंधामुळे गेल्या काही वर्षात हे संबंध अधिक मजबूत झाले आहेत.” बेलोसोव्ह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या दोन प्रमुख द्विपक्षीय बैठकांचाही उल्लेख केला. या बैठकींमुळे दोन्ही देशातील संरक्षण भागीदारी पुढे नेण्यासाठी खूप मोठे सहकार्य लाभले असल्याचे, त्यांनी यावेळी नमूद केले.
SCO आणि ADMM Plus सारख्या बहुपक्षीय फ्रेमवर्कमध्ये दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत लष्करी सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले. “मला विश्वास आहे की आजच्या चर्चेमुळे आमचे संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ होईल,” बेलोसोव्ह पुढे म्हणाले.
चर्चेमधील महत्वाचे मुद्दे
मॉस्को येथे पार पडलेल्या या विशेष चर्चासत्रामध्ये, लष्करी आणि तांत्रिक सहकार्याच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा समावेश होता. दोन्ही देशांच्या बाजूंनी सर्वोच्च स्तरावर झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. या चर्चेत विकसित होत असलेल्या भू-राजकीय परिदृश्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांनाही संबोधित करण्यात आले. सिंग यांनी आपली भूमिका बदलण्यासाठी भारतावरील दबाव मान्य केला परंतु रशियासोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या राष्ट्राच्या संकल्पाची पुष्टी केली. “बाह्य दबाव असूनही, भारत रशियाशी संबंध मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे,” सिंग म्हणाले.
औपचारिक स्वागत आणि प्रोटोकॉल
गार्ड ऑफ ऑनर आणि लष्करी वाद्यवृंद असलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे औपचारिक स्वागत करून बैठकीची सुरुवात झाली. चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी 21 व्या IRIGC-M&MTC च्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये सहकार्याच्या चालू आणि भविष्यातील क्षेत्रांची रूपरेषा आखली गेली.
या सत्राने भारत-रशियाच्या चिरस्थायी भागीदारीत आणखी एक मैलाचा दगड ठरला, ज्याने संरक्षण आणि त्यापुढील सहकार्य मजबूत करण्याचा परस्पर संकल्प अधोरेखित केला.
Raksha Mantti Shri @rajnathsingh called on Russian President Mr. Vladimir Putin at Kremlin in Moscow. pic.twitter.com/kWDcKuu7bP
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) December 10, 2024
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्लादिमीर पुतिन यांसोबतच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पुतिन यांच्यापर्यंत पोहचवला. त्यांच्या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केले आणि भारत आणि रशिया यांच्यातील खोलवर रुजलेल्या भागीदारीवर प्रकाश टाकला.
“भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्री ही सर्वात उंच पर्वतापेक्षाही उंच आणि सर्वात खोल महासागरापेक्षाही खोल आहे आणि राहील” अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांमधील मैत्री अधोरेखित केली.
‘भविष्यात ही भागीदारी आणखी मजबूत होत जाईल’ असा विश्वास व्यक्त करत, सिंह यांनी रशियाला भारताचे अखंड समर्थन असेल अशी ग्वाही यावेळी दिली. ‘या बैठकीत विविध मुद्द्यांवर धोरणात्मक चर्चा तर झालीच, मात्र विशेषत: दोन्ही देशांतील ‘संरक्षण क्षेत्राशी’ निगडीत (Defence sector) संबंध हे यामुळे अधिक मजबूत झाले असल्याचा विश्वास, सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
रवी शंकर
अनुवाद – वेद बर्वे