शुक्रवारी 19 एप्रिलला भारताकडून फिलिपीन नौदलाला ब्राह्मोस (Brahmos) या सुपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली बॅच सुपूर्द करणार आहे. भारत आणि फिलिपीन्स यांच्या दरम्यान 2022 मध्ये ब्राह्मोस खरेदीच्या 375 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. आता दोन वर्षांनी या क्षेपणास्त्रांची पहिली बॅच देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या के सी 17 ग्लोबमास्टर आणि रशियाच्या आईएल 76 या वाहतूक विमानांद्वारे फिलिपीन्सला पोहोचवली जाणार आहेत. तिथे जाण्यासाठी विवादास्पद असणाऱ्या दक्षिण चीन सागरावरून या विमानांचा प्रवास होणार आहे. दक्षिण चिनी समुद्रातील विवादास्पद भागांमधील चीनच्या दादागिरी आळा घालण्यासाठी फिलिपीन्सला या क्षेपणास्त्रांची मोठी मदत होणार आहे.
हा करार जानेवारी 2022 मध्ये केला होता. या करारामुळे जागतिक स्तरावर संरक्षण सामग्रीचा एक मोठा निर्यातदार म्हणून भारताची ओळख बनली आहे. रशिया आणि भारत यांच्याद्वारे विकसित झालेले हे क्षेपणास्त्र शुक्रवारी जरी फिलिपीन्सला पोहोचणार असले तरी त्याची पूर्ण प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी अजून एक आठवडा लागणार आहे.
भारताने 2024-25 या आर्थिक वर्षात 35 हजार कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. भारताच्या संरक्षण निर्यातीत मागील आर्थिक वर्षात 32.5 टक्के इतकी वाढ झाली असून पहिल्यांदाच 21 हजार कोटी रुपयांचा आकडा पार झाला आहे, असे 1 एप्रिल रोजी भारताच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. आपल्या तिन्ही दलांना आत्मनिर्भर बनवत असतानाच आता भारत संरक्षणविषयक निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भारताने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
सध्या जगातील जवळपास 85 देशांमध्ये भारताकडून संरक्षणविषयक हार्डवेअरची निर्यात केली जात असून 100 लहानमोठ्या कंपन्यांचा यात सहभाग आहे. क्षेपणास्त्रे, तोफा, रॉकेट, चिलखती वाहने, समुद्रातील गस्तीसाठी आवश्यक जहाजे, वैयक्तिक सुरक्षा प्रणाली, विविध प्रकारचे रडार, टेहळीसाठी आवश्यक प्रणाली, दारूगोळा अशा गोष्टी सध्या निर्यात केल्या जात आहेत.
दक्षिण चीन समुद्रात आपली ताकद दाखवणाऱ्या चीनला यामुळे सध्या मोठा झटका बसला आहे. चीनच्या आक्रमक वृत्तीला तोंड देत असलेला फिलीपीन्स आपल्या तटीय क्षेत्रांमध्ये ब्राह्मोस तैनात करण्याची शक्यता आहे.
ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या तिप्पट म्हणजेच ताशी ४, ३२१ किलोमीटर वेगाने मारा करण्यास सक्षम आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. सुमारे २९० किलोमीटरवरील लक्ष्य ब्राह्मोस अचूकपणे भेदू शकते. विशेष म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही दलांमध्ये हे क्षेपणास्त्र तैनात करता येऊ शकते. ब्राह्मोस हे भारतीय संरक्षण दलाच्या भात्यातील अतिशय महत्त्वाचे अस्त्र आहे. वेग आणि अचूकता यांमुळे जागतिक स्तरावर या क्षेपणास्त्राला मागणी आहे. आग्नेय आशियातील देशांबरोबरच संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांनी ब्राह्मोस मिळवण्यासाठी भारताशी चर्चा केली आहे.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)