‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमाननिर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केली गेली. सी-295 एमडब्लू या लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प असून टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए., स्पेन यांच्या सहकार्याने ही विमाननिर्मिती होणार आहे.
या मालवाहू विमाननिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत भविष्यात वाहतूक आणि व्यावसायिक विमानांचा एक प्रमुख उत्पादक म्हणून उदयास येईल, जो देशांतर्गत गरजा पूर्ण करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेचीही पूर्तता करेल. येथे उत्पादित होणारी वाहतूक विमाने केवळ आपल्या लष्करालाच सामर्थ्य देणार नाहीत तर, विमाननिर्मितीची एक नवीन इकोसिस्टमदेखील विकसित करतील. लवकरच, भारत प्रवासी विमानांचाही उत्पादक होईल ज्यावर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक-फॉर-वर्ल्ड’ असे लिहिलेले असेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या संरक्षण आणि वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या उत्पादन प्रकल्पात आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच एवढी मोठी गुंतवणूक होत असल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की, “येत्या काही वर्षांत संरक्षण आणि एरोस्पेस ही क्षेत्रे भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे आधारस्तंभ ठरतील. 2025पर्यंत, 25 अब्ज डॉलरहून अधिक आपले संरक्षण उत्पादन असेल. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उभे राहणारे संरक्षण कॉरिडॉर या उद्दीष्टापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्यभूत ठरतील.
अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे, ज्यामध्ये खासगी कंपनी भारतात लष्करी विमानाची निर्मिती करणार आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो. 40 विमाने बनवण्याव्यतिरिक्त, वडोदरा येथील या प्रकल्पात हवाई दलाच्या गरजा आणि निर्यातीसाठी अतिरिक्त विमाने तयार केली जातील.
सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली होती. ही विमाने भारतीय हवाई दलाच्या 1960च्या दशकातील जुन्या अॅवरो (Avro) विमानांची जागा घेतील. याकरारा अंतर्गत, उड्डाणासाठी सज्ज अशी 16 विमाने पुढील चार वर्षांत उपलब्ध केली जातील आणि 40 विमाने टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) यांच्याकडून व्यावसायिक भागिदारीअंतर्गत (या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या) भारतात तयार करण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील 16 विमाने सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान मिळणार आहेत. पहिले स्वदेशी अर्थात मेड इन इंडिया विमान सप्टेंबर 2026 ते 2031 या कालावधीत उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पामुळे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात 42.5 लाख मनुष्य-तासांपेक्षा जास्त अशा थेट 600 उच्च कुशल नोकऱ्या, 3,000हून अधिक अप्रत्यक्ष नोकऱ्या आणि 3,000 मध्यम-कौशल्य रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
सी-295एमडब्लू हे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त 5-10 टन क्षमतेचे वाहतूक विमान आहे. या विमानाचा कमाल वेग 480 किमी प्रतितास आहे. ही विमाने विशेष मोहिमा आणि आपत्ती प्रतिसाद तसेच सागरी गस्त अशी कर्तव्ये पार पाडू शकतात. हे विमान पॅराट्रूप्स आणि सामान एअरड्रॉप करू शकते आणि अपघातग्रस्त किंवा वैद्यकीय मदतीसाठी वापरले जाऊ शकते.
(अनुवाद : आराधना जोशी)