PM मोदींच्या मालदीव दौऱ्यापूर्वी, भारताकडून कमांडोजना VIP सुरक्षेचे प्रशिक्षण

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 आणि 26 जुलै रोजी होणाऱ्या मालदीव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने मालदीव पोलीस दलातील 10 जवानांना खास VIP सुरक्षा प्रशिक्षण दिले. नोव्हेंबर 2023 मध्ये डॉ. मोहम्मद मुइझू यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारल्यापासून, पंतप्रधान मोदींचा हा पहिला मालदीव दौरा असून, यादरम्यान द्विपक्षीय आर्थिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध बळकट करण्यावर भर दिला जाईल.

सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (CRPF) मार्फत नोएडा येथे प्रशिक्षण घेतलेले मालदीवचे हे कमांडोज, राष्ट्राध्यक्ष मुइझू यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकात सामील होतील. नोएडा येथील VVIP सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात दोन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, या अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत CRPF महासंचालक जी. पी. सिंग यांची भेट घेतली. DG सिंग यांनी, या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “हा शांतता, व्यावसायिकता आणि प्रादेशिक पोलिस सहकार्य यावरील आमच्या सामूहिक बांधिलकीचा पुरावा आहे.”

पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा

पंतप्रधान मोदी 26 जुलै रोजी, मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. हा दौरा दोन ऐतिहासिक टप्प्यांतील साधर्म्य दर्शवतो, मालदीवचा 60वा स्वातंत्र्यदिन आणि भारत–मालदीव यांच्यातील 60 वर्षांच्या राजनैतिक संबंधांची पूर्तता. राष्ट्राध्यक्ष मुइझू यांनी यानिमित्ताने व्यक्तिशः पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले होते, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मालदीवला भेट देणारे मोदी हे पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख ठरणार आहेत.

हा दौरा पूर्वीच्या द्विपक्षीय तणावांना सौम्य करण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये, अध्यक्ष मुइझू सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मालदीवमध्ये तैनात भारतीय संरक्षण दल हटवण्याची मागणी केली होती, ज्यामुळे द्विपक्षीय नातेसंबंधात तणाव निर्माण झाला होता. चीन समर्थक भूमिका असलेल्या मुइझू यांचे सुरुवातीचे धोरण, नवी दिल्लीसाठी चिंतेचे कारण बनले होते. मात्र, ऑक्टोबर 2024 मध्ये मुइझू यांच्या भारत दौऱ्यानंतर या संबंधांमध्ये स्थिरता आली. त्या दौऱ्यात दोन्ही देशांनी एका उच्चस्तरीय गटाच्या (HLCG) देखरेखीत ‘व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टिकोन पत्रकच स्विकारले होते.

आर्थिक सहाय्य, सुरक्षा आणि धोरणात्मक संबंध

या महत्वपूर्ण बैठकीदरम्यान सागरी सुरक्षा, आर्थिक विकास, हवामान अनुकूलता आणि प्रादेशिक संपर्क यावर भर दिला जाईल. दोन्ही देश ‘व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी’ अंतर्गत प्रगतीचा आढावा घेतील आणि नवीन करार अंतिम करतील.

या दौऱ्यात विकास सहकार्य, फेरी सेवा, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि क्षमतावाढ या क्षेत्रांत अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.

आर्थिक पाठबळ आणि विकासात्मक सहाय्य

भारत मालदीवचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे. भारत अनुदान, कर्जसुविधा आणि चलन विनिमय योजनांद्वारे सहाय्य करतो. 2024 मध्ये, भारताने मालदीवला 40 कोटी अमेरिकी डॉलर्सची तातडीची आर्थिक मदत पुरवली होती, त्याशिवाय ₹3,000 कोटींचा चलन विनिमय करार, आणि 100 कोटी अमेरिकी डॉलर्सचे व्याजमुक्त ट्रेझरी बिल्स रोलओव्हर दिले होते.

‘हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स’च्या (HICDP) तिसऱ्या टप्प्यात, भारताने 13 सामंजस्य करार (MoUs) केले असून, यामध्ये 10 कोटी मालदीवियन रूफीयांचा अनुदान मदतीचा समावेश आहे, ज्यातून फेरी कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे.

भारताचा मालदीवच्या व्यापार व गुंतवणूक क्षेत्रातही महत्त्वाचा वाटा आहे, आणि द्विपक्षीय व्यापार $५४८ दशलक्ष डॉलर्सहून अधिक आहे. भारतीय व्यवसायांचे मालदीवच्या पर्यटन व पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे योगदान आहे, ज्यामुळे रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विविधीकरण साधले जात आहे.

संरक्षण व सागरी सुरक्षा

संरक्षण आणि सागरी सुरक्षा सहकार्य हे भारत-मालदीव संबंधाचे एक प्रमुख अंग आहे. नियमित द्विपक्षीय सराव, संयुक्त पाळत ठेवणे, आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये ऑपरेशनल समन्वय वाढला आहे. भारताने मालदीवला विमानवाहन, नौदल प्लॅटफॉर्म्स आणि देखभाल सहाय्य पुरवले आहे, जेणेकरून मालदीवची सागरी क्षमता अधिक मजबूत होईल.

प्रादेशिक भागीदारी आणि जागतिक परिणाम

मालदीव हे भारताच्या ‘पडोसी प्रथम’ धोरणात आणि ‘विजन महासागर’ सागरी रणनीतीत महत्त्वाचे स्थान राखून आहे. हिंद महासागरातील मालदीवचे धोरणात्मक स्थान लक्षात घेता, भारतासाठी प्रादेशिक स्थिरता राखणे आणि चीनचा वाढता प्रभाव रोखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नवी दिल्ली आणि माले यांच्यातील सातत्यपूर्ण उच्चस्तरीय संवाद – मंत्रिपरिषद सदस्यांचे दौरे, COP28, भारत सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील भेटी आणि राजकीय दौरे, हे संपर्क बळकट करण्याच्या दोन्ही देशांच्या कटिबद्धतेचे द्योतक आहेत.

भविष्याकडे पाहताना…

भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक संबंधांचा 60 वर्षांचा यशस्वी टप्पा साजरा करत असताना, हा दौरा सहकार्य, परस्पर सन्मान आणि हिंद महासागरातील प्रादेशिक नेतृत्वाच्या एका नव्या अध्यायाची नांदी असल्याचे संकेत देतो.

– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleIndia’s First Army Apaches Arrive at Hindon, Marking Major Leap in Indo-US Defence Ties
Next articleExplainer | End of an Era: India Retires MiG-21, the ‘Workhorse’ That Defined IAF for 60 Years

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here