दक्षिण सुदानमधील कामगिरी: ११९० पुरुष आणि १० महिलांचा समावेश
दि. १६ मे: यादवीग्रस्त दक्षिण सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय लष्करातील जवान व अधिकाऱ्यांचा संयुक्त राष्ट्राचे विशेष पदक (‘यूएन मेडल’) देऊन गौरव करण्यात आला आहे. ‘यूएन मेडल’ मिळालेल्या भारतीय सैनिकांमध्ये ११९० पुरुष आणि दहा महिलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राच्या दक्षिण सुदानमधील शांतता मोहिमेच्यावतीने (युनायटेड नेशन्स मिशन इन साउथ सुदान) ‘एक्स” या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
1190 men & 10 women peacekeepers from #India 🇮🇳#ServingForPeace in Malakal, Kodok & Renk, #SouthSudan🇸🇸 receive the @UN medal for
✅patrolling to protect civilians
✅improving roads
✅helping communities through veterinary interventions
✅providing medical services#A4P pic.twitter.com/Ax4032aDlM— UNMISS (@unmissmedia) May 15, 2024
सुदानमधील काही दशकांच्या यादवीनंतर सुदानमधून दक्षिण सुदान हा स्वतंत्र देश जुलै २०११मध्ये निर्माण करण्यात आला. मात्र, स्वातंत्र्यानंतरही दक्षिण सुदानमध्ये यादवी आणि रक्तपाताचे सत्र सुरूच राहिले. या गृहयुद्धामुळे दक्षिण सुदानमधील हजारो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर लक्षावधी नागरिक विस्थापित अथवा परागंदा झाले आहेत. ही यादवी आणि नरसंहार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार दक्षिण सुदानमध्ये जुलै २०११ मध्येच संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सुरु आकरण्यात आली होती. या मोहिमेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या विविध सदस्य देशांच्या लष्करातील सुमारे २० हजार सैनिक येथे कार्यरत आहेत. या सैन्याचे नेतृत्त्व भारतीय लष्करातील अधिकारी लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमनियन करीत आहेत. तेथे तैनात असलेल्या भारतीय पथकातील सैनिकांना नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी गस्ती घालणे, रस्ते बंधने आणि त्यांची उत्तम देखभाल करणे, पाळीव प्राणी आणि गुरांची काळजी आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविणे, नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविणे आदी बाबींत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘यूएन मेडल’ देण्यात आले आहे, असे सांगण्यात आले आहे.
दक्षिण सुदानमध्ये या शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेत भारतीय लष्करातील ८०० अधिकारी व जवान कार्यरत आहेत. सध्या जगात विविध ठिकाणी सुरु असलेल्या संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलीसदलांतील ६,७०० तैनात आहेत. संयुक्त राष्ट्र सदस्य देशांमधील ही चौथ्या क्रमांकाची मोठी संख्या आहे. भारताने आत्तापर्यंत सुरक्षा परिषदेच्या शांतता पथकात दोन लाखांपेक्षा जास्त सैनिक पाठविले आहेत व संयुक्त राष्ट्राच्या १९४८ पासून आत्तापर्यंत झालेल्या ७१ शांतता मोहिमांपैकी ४९ मोहिमांत भारताने सहभाग घेतला आहे. भारताने अशा शांतता मोहिमेसाठी २००७मध्ये केवळ महिलांचा सहभाग असणारे पथक पाठविले होते. असे पथक पाठविणारा भारत एकमेव देश आहे. शांतता मोहिमेच्या माध्यमातून जगभरात सेवा पुरविणारे भारतीय लष्कर हे एकमेव लष्कर आहे.
विनय चाटी