हिंद महासागरात पार पडला भारत आणि अमेरिकेचा संयुक्त नौदल सराव

0
हिंद
भारतीय नौदलाच्या जहाजांनी अमेरिकन नेव्हल कॅरियर स्ट्राइक ग्रुपसोबत संयुक्तपणे सागरी सराव केला.

नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने सोमवारी सांगितले की, भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौका, धोरणात्मक दृष्टीने, 12 जुलै रोजी अमेरिकेच्या थियोडोर रूझवेल्ट वाहक स्ट्राइक ग्रुप नाइनसह हिंद महासागरात आयोजित नौदल सरावात सहभागी झाल्या होत्या. अत्यंत व्यापक अशा इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या लष्करी उपस्थितीबद्दल जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असताना असा युद्धाभ्यास होणे ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे.

भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस आदित्य आणि आयएनएस विशाखापट्टणम यांनी 12 जुलै रोजी अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाची जहाजे युएसएस थियोडोर रूझवेल्ट आणि युएसएस डॅनियल इनोय यांचा समावेश असलेल्या अमेरिकन नौदल वाहक स्ट्राइक ग्रुपसोबत संयुक्तपणे एमपीएक्स हा सागरी सराव केला, असे नौदलाच्या प्रवक्त्याने एक्स पोस्टद्वारे सांगितले.

सहभागी तुकड्यांमध्ये निमित्झ-श्रेणी विमानवाहू जहाज युएसएस थियोडोर रूझवेल्ट (सीव्हीएन 71), कॅरियर एअर विंग 11 आणि आर्ले बर्क-श्रेणी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक युएसएस डॅनियल इनोय (डीडीजी 118) यांचा समावेश होता. भारतीय सैन्याकडून मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक आयएनएस विशाखापट्टणम (डी66) आणि पुनर्भरण (replenishment) जहाज आयएनएस आदित्य (ए59) या सरावात सहभागी झाले होते.

युएसएस थियोडोर रूझवेल्ट हे अमेरिकेच्या नौदलाचे निमित्झ-श्रेणीचे, अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज आहे. वाहक युद्ध गट किंवा वाहक हल्ला गट हा एक धडकी भरवणारा नौदल ताफा आहे ज्यामध्ये अनेक विध्वंसक युद्धनौका आणि इतर सहाय्यक जहाजांसह विमानवाहू जहाज असते.

भारतीय नौदलाने म्हटले आहे की, या जहाजांनी समुद्रातील पुनर्भरण, क्रॉसडेक फ्लाइंग ऑपरेशन, भारतीय नौदल-अमेरिकन नौदलाची अखंड आंतरसंचालनीयता दर्शविणाऱ्या सागरी कारवायांसह हवाई संरक्षण सराव आणि जटिल संयुक्त सागरी मोहिमा हाती घेण्याची क्षमता दाखवून दिली आहे.

या संयुक्त सागरी सरावामुळे दोन प्रमुख संरक्षण भागीदारांमधील आंतरसंचालनीयता वाढली आणि मुक्त तसेच खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी असणारी त्यांची सामायिक वचनबद्धता अधोरेखित झाली, असे अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे.

“अमेरिका आणि भारतीय लष्करी दलांनी सामायिक सागरी क्षेत्र जागरूकता आणि माहितीची देवाणघेवाण सुधारणे, पुनर्भरण आणि रसद आंतरसंचालनीयता वाढवणे आणि संयुक्तपणे एअर टू एअर क्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले,” असेही त्यात नमूद केले आहे.

नैऋत्य आशिया आणि आफ्रिकेच्या किनारपट्टीसह प्रशांत महासागरातील बहुपक्षीय सरावांमध्ये भारतीय नौदल अमेरिकन नौदलाच्या तुकड्यांसमवेत नियमितपणे सहभागी होते. हवाई येथे सुरू असलेल्या रिम ऑफ द पॅसिफिक (आरआयएमपीएसी) 2024 च्या सरावात भारतीय नौदल समूहाच्या नौकानयनाव्यतिरिक्त अमेरिकन नौदल आणि इतर सहयोगी आणि भागीदारांसोबत नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये काम करत आहे, असे अमेरिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

युएसएस थियोडोर रूझवेल्ट (सीव्हीएन 71) सध्या 7 व्या फ्लीटच्या कार्यक्षेत्रात हा संयुक्त सागरी उपक्रम आयोजित केल्यानंतर कॅरियर स्ट्राइक ग्रुप नाइनसह कार्यरत आहे.
सातवा ताफा हा अमेरिकी नौदलाचा सर्वात मोठा नौकासंख्या असलेला ताफा आहे. मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे जतन करण्यासाठी ते मित्र आणि भागीदारांशी नियमितपणे संवाद साधत त्याचे कार्य करते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleArmy Major Among 4 Soldiers Killed In Encounter In Jammu’s Doda
Next articleMos Defence Seth visits HAL, BEML Facilities

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here