रशियाची 5th Gen- Su-57 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा भारताचा विचार

0
Su-57

भारत सध्या, रशियाच्या Su-57 या पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा सक्रियपणे विचार करत आहे, जेणेकरून भारतीय हवाई दलाच्या (IAF) तातडीच्या लढाऊ विमानांच्या कमतरतेवर तोडगा काढता येईल. हा प्रस्ताव, डिसेंबरमध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या 23व्या भारत-रशिया शिखर परिषदेच्या दरम्यान महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

संरक्षण चर्चांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, “रशियाने भारताला पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरणासह Su-57 फायटर्सचे संयुक्त उत्पादन करण्याची ऑफर दिली आहे. या योजनेअंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या माध्यमातून ही प्रगत विमाने तयार केली जातील, कारण भारताकडे आधीच रशियन तंत्रज्ञानाशी परिचित पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल अनुभव आहे.”

HAL (हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड) सध्या Su-30MKI चे परवाना उत्पादन करते. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते,
Su-57 फायटर्ससाठी याच सुविधांमध्ये थोडेसे बदल करून, उत्पादन सुरू करणे शक्य आणि किफायतशीर ठरेल. तसेच, भारतीय पायलट आणि देखभाल कर्मचारी आधीपासूनच रशियन प्रणालींशी परिचित असल्याने, त्यांचा बदल कालावधी तुलनेत कमी असेल.

रशिया: एक विश्वासार्ह सामरिक भागीदार

नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत, रशियन दूतावासाचे चार्ज ए द’अफेअर रोमन बाबुश्किन यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात रशियाच्या सातत्यपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.

“रशिया हा भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्राथमिक भागीदार आहे. ‘मेक इन इंडिया’ सुरू होण्याच्या आधीपासूनच आम्ही एकत्र काम करत आहोत,” असे बाबुश्किन म्हणाले.

“आपण भारतात सुखोई विमाने आणि जेट इंजिन तयार करण्यास सहमत झालो आहोत. भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी रशिया पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असेही ते म्हणाले.

ही ऑफर, भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनावर केंद्रित धोरणाशी सुसंगत आहे. सध्या IAF ची लढाऊ पथकांची संख्या 32 पेक्षाही कमी झाली आहे, जे मान्यतेप्रमाणे 42 असायला हवे. याचवेळी चीन आणि पाकिस्तानमधील हवाई सहकार्य अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे.

Su-57: का आणि आत्ताच का?

Su-57 (निर्यात आवृत्ती: Su-57E) हे जोड इंजिन असलेले, पाचव्या पिढीतील मल्टी-रोल स्टेल्थ लढाऊ विमान आहे. यात स्टेल्थ टेक्नॉलॉजी, सुपरक्रूझ क्षमता, आणि प्रगत एव्हिऑनिक्स आहेत. पश्चिमी विश्लेषकांनी त्याच्या स्टेल्थ प्रोफाइल आणि मर्यादित उत्पादनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी हे विमान युक्रेन युद्धात वापरले गेले आहे, त्यामुळे भारतीय योजना-कर्त्यांना युद्धातील प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेली माहिती उपयुक्त वाटत आहे.

भारताचा या व्यासपीठात इंटरेस्ट असण्यामागे, रणनीतिक गरज आणि लॉजिस्टिक सुसंगती हे दोन्ही घटक आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, “भारताला केवळ नवीन विमाने हवी नाहीत, तर ती स्वतः तयार आणि देखभाल करण्याची क्षमता हवी आहे, जी अमेरिकेच्या F-35 सारख्या प्लॅटफॉर्म्समध्ये पूर्णपणे शक्य नाही.”

भूतकाळातील अयशस्वी प्रयत्न समजून घेणे

भारताने यापूर्वी Su-57 आधारित FGFA (Fifth Generation Fighter Aircraft) प्रकल्प रशियासोबत संयुक्तपणे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, 2018 मध्ये तो प्रकल्प रद्द करण्यात आला, कारण खर्च, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पारदर्शकतेवर वाद निर्माण झाले होते.

मात्र, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “सध्याची ऑफर पूर्वीपेक्षा वेगळी आहे, विशेषतः कारण रशिया यावेळी पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक असेंब्लीसाठी तयार आहे, जे आधी अडथळा ठरले होते.”

जागतिक दबावांमध्ये समतोल राखणे

रशियन लढाऊ विमानांमधील भारताचा इंटरेस्ट, हा अमेरिकेच्या वाढत्या राजनैतिक दबावाच्या पार्श्वभूमीवरही येतो, ज्यात F-35 चा पर्याय विचारात घेण्यास भारताला सुचवले जात आहे. F-35 च्या क्षमतेबाबत शंका नाही, पण त्याचा खर्च, एंड-यूजर अटी आणि भारतीय संरक्षण प्रणालीशी सुसंगती यावर अजूनही प्रश्न आहेत.

“भारताने सार्वभौमत्व, विश्वासार्हता आणि खर्च कार्यक्षमतेचा विचार करावा लागेल,” असे एका वरिष्ठ IAF अधिकाऱ्याने भारतशक्तीला सांगितले. “रशियन प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या त्रुटी असूनही, स्वायत्तता आणि लवचिकता लाभते, जी इतरत्र मिळणे कठीण आहे,” असेही ते म्हणाले.

पुतिन यांची भेट: निर्णायक क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या 23व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीत ऊर्जा, व्यापार, आणि विशेषतः संरक्षण सहकार्य यावर चर्चा होणार आहे. पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांचे उत्पादन हा चर्चेचा मुख्य मुद्दा असेल.

जसजशी जिओपॉलिटिकल समीकरणे बदलत आहेत आणि भारत संरक्षण धोरणाचे पुनर्मूल्यांकन करत आहे, तसतसे Su-57 ला पुन्हा संधी मिळू शकते.. केवळ एक लढाऊ विमान म्हणून नव्हे, तर भारत-रशिया सामरिक भागीदारीचे प्रतीक म्हणून.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleनेपाळ संसद बरखास्त, मार्च 2026 मध्ये नव्याने निवडणुका
Next articleपोलंडवरील रशियन ड्रोन हल्ला, युरोपच्या संरक्षणासाठी नाटोच्या हालचाली सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here