पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच) ‘प्रचंड’चा पहिला ताफा सोमवारी, दि. 03 ऑक्टोबर 2022 भारतीय हवाई दलात समाविष्ट झाला. जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या या समारंभासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नवनियुक्त सीडीएस जनरल अनिल चौहान आणि एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी उपस्थित होते. एलसीएच हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे (HAL) डिझाइन आणि तयार केलेले पहिले स्वदेशी मल्टी-रोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. यात जमिनीवर हल्ला करण्याची तसेच हवेतील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. शिवाय, हे जगातील एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जे जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये काम करू शकते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरचे “प्रचंड” असे नामकरण केले. ‘प्रचंड’च्या समावेशाने भारतीय हवाई दल भविष्यात जगातील सर्वोच्च शक्ती बनेल, तसेच देशाला संरक्षण उत्पादन आवश्यकतांमध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर बनवेल, असा विश्वास व्यक्त करतानाच हा “संरक्षण उत्पादनातील भारताची क्षमता प्रतिबिंबित करणारा महत्त्वाचा प्रसंग” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवाई दलामध्ये सामील झाल्यानंतर काही वेळातच संरक्षणमंत्र्यांनी एलसीएच हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. स्वदेशी डिझाइन आणि विकासावर विश्वास ठेवून मारुत- लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, प्रगत लाइट हेलिकॉप्टर आणि लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आपल्या ताफ्यात दाखल करून याला पाठबळ दिल्याबद्दल भारतीय हवाई दलाची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. “एलसीएचचा समावेश हेच अधोरेखित करतो की, जसा देश भारतीय हवाई दलावर विश्वास ठेवतो, त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलदेखील स्वदेशी उपकरणांवर विश्वास ठेवते,” असेही ते म्हणाले.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले की, एलसीएचच्या समावेशामुळे हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेत एक विलक्षण वाढ झाली आहे. एलसीएचचे बहुउपयोगीत्व आणि आक्रमक क्षमता जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या बहुतेक अटॅक हेलिकॉप्टरच्या बरोबरीची किंवा अधिक चांगली आहे.
एलसीएचचा समावेश म्हणजे 1999च्या कारगिल संघर्षाच्या शेवटी सुरू झालेल्या प्रक्रियेचा कळस आहे. कारगिल युद्धाच्या लढाईने स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरची आवश्यकता अधोरेखित केली होती. असे हेलिकॉप्टर जे पुरेशी शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतात आणि हिमालयाच्या अतिउंचावरही काम करू शकतात. एलसीएच तंतोतंत याच आवश्यकता पूर्ण करते.
या हेलिकॉप्टरमध्ये आधुनिक स्टेल्थ वैशिष्ट्ये असून, मजबूत कवच संरक्षण आणि रात्री हल्ला करण्याची जबरदस्त क्षमता आहे. ऑनबोर्ड प्रगत नेव्हिगेशन सिस्टीम, जवळच्या लढाईसाठी तयार केलेल्या तोफा आणि हवेतून हवेत मारा करणारी शक्तिशाली क्षेपणास्त्रे एलसीएचला विशेषतः आधुनिक युद्धभूमीसाठी अनुकूल बनवतात. अतिशय उंचीच्या भूभागावरून कार्य करण्यास आणि उंचीवरील लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम अशा या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या युद्धसामग्रीत जबरदस्त भर पडली आहे.
विशेष म्हणजे, औपचारिक समावेशापूर्वीच, एलसीएच पूर्व लडाखमध्ये जिथे भारत दोन वर्षांपासून चिनी सैन्यासोबत संघर्ष करत होता, तिथे भारतीय सशस्त्र दलांनी तैनात केले होते. यामध्ये दोन शक्ती इंजिने, 20 मिलीमीटर टर्नेट गन, 70 मिलीमीटर रॉकेट सिस्टीम आणि Mistral-2 हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, 330 किमी प्रतितास या वेगाने चालणाऱ्या या एलसीएचचा सहभाग हा भारताच्या स्वदेशी लष्करी उत्पादनासाठी आणखी एक महत्त्वाचा क्षण आहे.
(अनुवाद – आराधना जोशी)