भारतीय हवाई दलाद्वारे तंत्रज्ञान, संयुक्त संचालन आणि युद्धक्षेत्राचे बळकटीकरण

0

‘भारतीय संरक्षण परिषद 2025’ (India Defence Conclave 2025) मध्ये, एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी भारतशक्ती आणि स्ट्रॅटन्यूज ग्लोबलचे संस्थापक नितीन गोखले यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, भारतीय हवाई दल (IAF) आता आधुनिक युद्धाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, अधिकाधिक सॉफ्टवेअर-आधारित प्रणालींवर आणि संयुक्त संचालन फ्रेमवर्कवर अवलंबून आहे.

चर्चेदरम्यान, भारतीय हवाई दलाचे हवाई संरक्षण, रणांगण पातळीवरील नियोजन, सर्व सेवांमधील समन्वय आणि निम्न-लष्करी दलांशी असलेले धोरणात्मक संरेखन या बाबींवर भर देण्यात आला.

हवाई दल तंत्रज्ञानातील जलद बदल कशाप्रकारे हाताळते, असे विचारले असता, सिंह यांनी स्पष्ट केले की, “हवाई दलाने नेहमीच विकसित होत असलेल्या साधनांशी आणि प्लॅटफॉर्मशी बऱ्याच काळापासून जुळवून घेतले आहे.”

पुढे ते म्हणाले की, “विशेषतः सॉफ्टवेअर आधारित प्रणालींमध्ये नवनिर्मितीचा वेग खूप जास्त वाढला आहे. प्रशिक्षण आणि परिचालन सज्जता अत्यंत महत्त्वाची झाली आहेत; जे तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकणार नाहीत, ते उच्च-तीव्रतेच्या परिस्थितीत प्रभावी ठरू शकणार नाहीत.”

हवाई संरक्षण आणि देखरेखीबाबत बोलताना, सिंह यांनी नमूद केले की: “आधुनिक प्रणालींमध्ये रडार, विमान, ड्रोन आणि स्वयंचलित प्रतिसाद नेटवर्कद्वारे एकत्र केले जातात.” “हा नेटवर्कवर आधारित दृष्टीकोन, परिस्थितिजन्य जागरूकता वाढवतो आणि जलद, अचूक निर्णय घेण्यास सक्षम करतो,” असेही ते म्हणाले.

नितीन गोखले यांनी, भारतीय हवाई दलाची कार्यात्मक क्षमता दर्शवणाऱ्या अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबद्दल विचारणा केली असता, सिंह यांनी सविस्तररित्या त्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, “ही मोहीम स्पष्ट मार्गदर्शन आणि सुनियोजित आराखड्याखाली हवाई दल, सैन्य दल, नौदल आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या प्रभावी समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे. मोहिमेच्या यशस्वी परिणामकारकतेसाठी संयुक्तता आणि थिएटर-स्तरीय अंमलबजावणी या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, ज्यामुळे अनेक कार्यात्मक क्षेत्रांमध्ये एकात्मिक कृती करणे शक्य झाले.”

‘थिएटररायझेशन’आणि संयुक्त कार्यवाहीबद्दल बोलताना सिंह म्हणाले की, “संघटनात्मक संरचना महत्त्वाच्या असल्या तरी, कार्यवाहीतील लवचिकताही तितकीच आवश्यक असते. विविध सेवा आणि संस्थांमधील समन्वय सुलक्ष केल्यामुळे, कोणतेही निर्णय वास्तविक वेळेत  प्रभावीपणे अंमलात आणले जाऊ शकतात.”

धोरण आणि निमलष्करी दलांच्या समन्वयाबद्दल बोलताना, सिंह यांनी यावर जोर दिला की, “राजकीय दिशा, कार्यात्मक नियोजन आणि आंतर-एजन्सी सहकार्य यांचा मेळ घालणे हे सुसंगत अंमलबजावणीसाठी खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, हवाई दल हे संबंध सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे सर्व घटक समक्रमित पद्धतीने कार्य करू शकतील.”

सिंह आपल्या भाषणाच्या अखेरीस, भविष्यातील हालचालींचा वेध घेत म्हणाले की, “वेगाने बदलणाऱ्या सुरक्षा वातावरणात प्रतिक्रियाशीलता आणि परिणामकारकता कायम राखण्यासाठी, हवाई दल सॉफ्टवेअर-सक्षम ऑपरेशन्स, प्रगत प्रशिक्षण, संयुक्त-दल तयारी आणि एकात्मिक धोरण समन्वयावर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवेल.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleDefence Ministry Emphasizes Speed, Self-Reliance, and Industry Collaboration in Procurement Reforms
Next articleखरेदी सुधारणांमधील वेग, स्वावलंबन, उद्योग सहकार्यावर संरक्षण मंत्रालयाचा भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here