नव्या अत्याधुनिक तोफांचा लवकरच समावेश
दि. ३१ मार्च: भारताच्या उत्तर सीमेवर विशेषतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या (आर्टिलरी) मारक क्षमता आता वाढणार असून, त्यांना लवकरच देशांतर्गत निर्मित अत्याधुनिक तोफा पुरविण्यात येणार आहेत. या तोफांच्या मागणीसाठीचा प्रस्ताव (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) लष्कराने पाठवला असून, या प्रस्तावावर युद्धपातळीवर निर्णय अपेक्षित आहे.
भारतीय लष्कराचा उत्तर विभाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या विवादास्पद सीमा लष्कराच्या उत्तर विभागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा विभाग कार्यप्रवण विभाग मानला जातो. विशेषतः चीनकडून सुरु असलेल्या कारवाया पाहता, या भागाची सुरक्षा व पायाभूत सुविधांची निर्मिती सरकारकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. या भागात लष्कराला अद्ययावत लष्करी साहित्य पुरविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून लवकरच या १५५/५२ व्यासाच्या वाहनाने खेचून नेता येतील अशा तोफा तोफखाना दलाला पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम’ व ‘भारत फोर्ज लिमिटेड’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून या तोफांची निर्मिती करण्यात आली आहे. या तोफा देशांतर्गत संशोधन व विकास. तसेच तंत्रज्ञानाचा एक भक्कम पुरावा मानल्या जातात. त्यांचे आरेखन व क्षमता यांच्यामुळे अशा डोंगराळ भागात वापरण्यासाठी या तोफा अतिशय योग्य मानल्या जातात.
प्रारंभीच्या टप्प्यात चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात तुकड्यांना ११४ ‘ॲडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन्स सिस्टीम’ (एटीएजीएस) या तोफा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागात तैनात असलेल्या तोफखाना दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
विनय चाटी
(वृत्तसंस्थांच्या ‘इनपुट्स’सह)