उत्तर प्रदेशातील अमेठी येथील इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरआरपीएल) या संयुक्त उपक्रमाकडून 35 हजार कलाश्निकोव्ह एके-203 असॉल्ट रायफल्सची पहिली बॅच भारतीय लष्कराला प्राप्त झाली आहे. या शस्त्रांची निर्मिती आयआरआरपीएलकडून केली जात आहे. एकूण 6 लाख 70 हजार रायफल्सची मागणी नोंदवली गेली आहे.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत या रायफल्सची निर्मिती भारतात केली जात आहे. या प्रकल्पात 100 टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण (टीओटी) समाविष्ट असून एके-203 उत्पादनाची देशी निर्मिती समाविष्ट आहे. रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड या सहयोगी उपक्रमाने भारतात एके-203 कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल्स तयार करण्याच्या प्रकल्पाचा प्रारंभिक टप्पा पूर्ण केला आहे. सर्व आवश्यक उपकरणे उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरीला देण्यात आली असून उत्पादन सुविधा पूर्णपणे कार्यरत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा विकास स्वदेशी साधने आणि उत्पादन क्षमतांचा लाभ घेण्याची बांधिलकी अधोरेखित करतो.
या घडामोडींमुळे कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य करून दिलेल्या कालमर्यादेत 35 हजार कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल्सचे उत्पादन करून भारतीय लष्कराला पहिली बॅच सुपूर्द करणे शक्य झाले. कलाश्निकोव्ह एके-203 असॉल्ट रायफल ही एके-200 रायफलचा एक नवा प्रकार आहे. भारतीय सैन्य वापरत असलेल्या 7.62x39mm काडतूसासाठी ही रायफल तयार केली आहे. यामध्ये विश्वासार्हता आणि अत्यंत सुलभ देखभाल याखेरीज कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल्सची पारंपारिक ताकद समाविष्ट आहे.
भारतातील असेंब्ली लाइनवरील एके-203 रायफल्स अत्याधुनिक प्रमाणित उपकरणांचा वापर करून विशेष रशियन तंत्रज्ञानानुसार तयार केल्या जातात. या काटेकोर निर्मिती प्रक्रियेमुळे रायफल्स उत्पादन गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता करताना निर्दिष्ट वैशिष्ट्यांचे काटेकोरपणे पालनही करतात.
टीम भारतशक्ती