भारताच्या संरक्षण मंत्रालयाने बंगळुरू येथील डिपार्टमेंट ऑफ स्पेसअंतर्गत असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) – अंतराळ विभागाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम – याच्यासोबत 29 मार्च 2023 रोजी, भारतीय सैन्यासाठी प्रगत संवाद प्रणालीच्या (अॅडव्हान्स्ड कम्युनिकेशन) दृष्टीने उपग्रह खरेदीच्या करारावर स्वाक्षरी केली.
संरक्षण मंत्रालय NSILकडून IDMM (इंडिजिनिअसली डिझाईन, डेव्हलप अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स) श्रेणीअंतर्गत स्वदेशी बनावटीचा GSAT-7B प्रगत संप्रेषण उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाइट) खरेदी करेल, येथे IDDM म्हणजे स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित करणे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत या संकल्पनेशी ती संलग्न आहे.
भारतीय हवाई दलाद्वारे संचालित होणारा GSAT-7A आणि भारतीय नौदलाद्वारे संचालित होणारा GSAT-7 सारखाच GSAT-7B हा भूस्थिर उपग्रह असेल. GSAT-7B लष्करी ऑपरेशन्स आणि मानवतावादी दृष्टीने केलेले सहाय्य तसेच आपत्ती निवारणादरम्यान (HADR) आवश्यक असलेल्या ट्रूप्स, फॉर्मेशन्स, एअरबोर्न प्लॅटफॉर्म आणि शस्त्रास्त्र प्रणालींसाठी, एक दृष्टीक्षेपापलीकडील (beyond line of sight) माहिती प्रदान करेल. डोंगराळ प्रदेशात आणि अतिउंच पल्ल्यांवर असणाऱ्या सैन्याशी सध्या संवाद साधणे काहीसे कठीण झाले आहे. GSAT-7B मुळे ही अडचण दूर होईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (ISRO) तयार होणाऱ्या या उपग्रहाची एकूण किंमत 2963 कोटी रुपये असून याचे घटक तसेच इतर प्रणाली एमएसएमईअंतर्गत भारतीय उत्पादक, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि स्टार्टअप्स यांच्याकडून उपलब्ध केली जाईल. यामुळे उच्च-तंत्रज्ञानाशी निगडीत रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. GSAT-7Bच्या प्रक्षेपणामुळे, तीनही सैन्यदलांकडे स्वतःचे भूस्थिर संप्रेषण उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाइट) असतील.
टीम इन्टरस्टेलर
(अनुवाद : आराधना जोशी)