ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात स्थित, भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मुख्य प्रवेशद्वारावर, गुरुवारी (10 एप्रिल) रोजी पहाटे, काही अज्ञात व्यक्तींनी भित्तीचित्रांच्या (graffiti) माध्यमातून विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे भारताच्या उच्चायुक्तांनी ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा गंभीर मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित केला आहे.
ताज्या माहितीनुसार, मेलबर्नमधील 344 St Kilda रोड, येथील भारतीय वाणिज्यदूतावासाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आक्षेपार्ह भित्तीचित्रे काढल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच व्हिक्टोरिया पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
The Australia Today या वृत्तसंस्थेशी बोलताना पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, “पोलिसांच्या अंदाजानुसार, ही भित्तीचित्रे बुधवारी (9 एप्रिल) आणि गुरुवारी (10 एप्रिल) दरम्यान मध्यरात्री कधीतरी काढण्यात आली असावीत. सध्या या नुकसानीचा कसून तपास सुरू आहे.”
या घटनेवर भारतीय समुदायात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोन्ही देशांतील राजनैतिक आणि सुरक्षाविषयक पातळीवरही ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे.
दूतावासाची अधिकृत प्रतिक्रिया
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय वाणिज्यदूतावासाने या घटनेवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की:
“मेलबर्न येथील भारतीय वाणिज्यदूतावासाच्या इमारतीची काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली आहे. हा प्रकार ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांकडे आधीच नोंदवण्यात आला आहे. देशातील भारतीय दूतावासी कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत.”
हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांची पार्श्वभूमी
मागील वर्षी, ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा शहरात दोन हिंदू मंदिरांमध्ये मुखवटे घालून आलेल्या व्यक्तींनी घुसून तोडफोड केली होती.
2023 मध्ये, ब्रिस्बेन येथील भारतीय वाणिज्यदूतावासाच्या गेटवर खलिस्तानी झेंडे बांधले गेले होते. ही घटना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर काहीच दिवसांत घडली होती.
The Australia Today च्या वृत्तानुसार, व्हिक्टोरिया पोलिस आणि राज्य सरकारने अलीकडील महिन्यांत धर्मस्थळांवर आधारित द्वेषपूर्ण गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
ऑस्ट्रेलियातील भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाने अनेकदा अशी तक्रार केली आहे की, इतर समुदायांशी संबंधित घटनांमध्ये तत्काळ प्रतिसाद दिला जातो, पण भारतीय संस्थांवरील हल्ल्यांत विलंब होतो.
“हा राजकारणाचा मुद्दा नाही,” असे एका समुदाय सदस्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
टीम स्ट्र्रटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)