पाकिस्तानात चार वर्षांपूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन भारतीय तरुणांची भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी भेट घेतली. रावळपिंडी येथील कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या अदियाला तुरुंगात ही भेट घेण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील बांदीहुरा शहरातील गोरेझ भागातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय फिरोज अहमद लोन आणि 24 वर्षीय नूर मुहम्मद वानी या दोन तरुणांना 2020 मध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान येथे अटक करण्यात आली होती.
या दोन भारतीय नागरिकांना अलीकडेच गिलगिट-बाल्टिस्तान येथील तुरुंगातून रावळपिंडी इथल्या अदियाला तुरुंगात हलवण्यात आले असे वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे.
या संपूर्ण घटनाक्रमाशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या विनंतीवरून दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना हा प्रवेश देण्यात आला होता. मात्र या घटनेवर तिथल्या भारतीय उच्चायुक्तालयाकडून किंवा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाकडून त्वरित कोणताही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.
मुत्सद्दी सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे की, “इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील तीन सदस्यीय शिष्टमंडळाने अदियाला तुरुंगातील दोन कैद्यांची भेट घेतली. सोमवारी झालेल्या या भेटीसाठी गृह मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.”
भारतीय माध्यमांनुसार, अटकेत असलेले दोन्ही तरुण नोव्हेंबर 2018 पासून पाकव्याप्त काश्मीरमधून बेपत्ता झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर त्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
भारत-पाक संबंधांच्या संदर्भात उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भेट घेण्यासंदर्भात स्वतःचा एक संक्षिप्त इतिहास आहे. कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकाला पाकिस्तानने 2016 मध्ये अटक केली. हेरगिरी तसेच दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली; भारताने वारंवार विनंती करूनही त्याला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती नाकारण्यात आली.
नंतर, भारताने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) नेले. तिथे न्यायालयाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटू देण्याचे आदेश दिले. याशिवाय त्यांची फाशीची शिक्षा रद्द केली आणि पाकिस्तानला जाधव यांच्यावर दिवाणी न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश दिले. आयसीजेच्या आदेशानंतर भारतीय अधिकाऱ्यांना इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या आवारात कडक सुरक्षाव्यवस्थेत जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)