लष्कर, नौदल व हवाईदलातील समन्वयाबाबत चर्चा
दि. ०५ मार्च : नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (नेव्हल कमांडर्स) तीन दिवसीय द्वैवार्षिक परिषदेस मंगळवारपासून सुरुवात झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाईदल प्रमुख एअर चिफमार्शल व्ही.आर.चौधरी व नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार या परिषदेत नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नौदलच्या विमानवाहू नौकेवर अरबी समुद्रात ही परिषद होणार आहे.
भारताची सागरी सुरक्षा हा या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्रात चिनी नौदलाच्या वाढत्या उपस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच, लाल समुद्रात हौती बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर होत असलेले हल्ले व एडनच्या आखातातील समुद्री चाचांचा उपद्रव, अशा सामरिक विषयावरही या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताच्या आयएनएस विक्रांत व आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकांच्या संयुक्त कारवाईचे प्रदर्शन या प्रसंगी संरक्षणमंत्र्यांसमोर करण्यात येणार आहे. नौदलाच्या विविध जहाजांवर तैनात असलेल्या शस्त्रप्रणाली व संवेदकांच्या युद्धसिद्ध क्षमतेचा आढावाही या परिषदेत घेतला जाणार आहे.
संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाईदल प्रमुख एअर चिफमार्शल व्ही.आर.चौधरी व नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार या परिषदेत नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, तिन्ही सैन्य दलांच्या परस्पर समन्वयाबाबत ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. संरक्षणदल प्रमुख व तिन्ही सेना दलांचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षेबाबत महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील व सर्व सेनादलांचे संयुक्त प्रयत्न देशाच्या सामरिक हिताच्या रक्षणासाठी कसे उपयुक्त ठरतील, या बाबतही चर्चा होणार आहे, असे नौदलाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
‘सामरिक स्पष्टता, कारवाईतील अत्युतमता, तंत्राद्यानातील नाविन्यपूर्णता व आंतरराष्ट्रीय सहकार्य या चतुःसुत्रीच्या आधारे देशाच्या सागरी सीमा व हितांचे रक्षण करणे, हिंदी महासागर क्षेत्रातील एक जबाबदार नौदल म्हणून असलेली प्रतिमा उंचावणे,यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही या परिषदेत चर्चा होणार असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले आहे.
(अनुवाद : विनय चाटी)