हवामान अंदाज वर्तविणाऱ्या स्वदेशी ॲपचे नौदलप्रमुखांकडून अनावरण
दि.०८ जून: हवामान विषयक अंदाज वर्तविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘इंडियन नेव्हल डायनामिक रिसोर्स फॉर वेदर ॲनालिसिस’ (इंद्रा) या स्वदेशी ॲपचे नौदलप्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांच्या हस्ते जागतिक महासागर दिनाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’ या संकेतस्थळावर दिली आहे.
On #WorldOceanDay meeting our commitment to safer oceans & climate conservation, #IndianNavy unveil’s #INDRA – Indian Naval Dynamic Resource for Weather Analysis, launched by Adm Dinesh K Tripathi #CNS.
Developed & designed by Directorate of Naval Oceanology & Meteorology #NHQ… pic.twitter.com/6ON7EDQF80
— SpokespersonNavy (@indiannavy) June 8, 2024
इंद्रा या ॲपची निर्मिती नौदल मुख्यालयातील नौदल महासागर आणि हवामान विषयक विभाग आणि ‘भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लीकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स’ (बीआयएसएजी-एन) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आली आहे. भर समुद्रात नौकानयन करताना योग्य आणि त्वरित निर्णय घेण्यासाठी गरजेचा असलेला तपशील पुरविण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपद्वारे हवामान आणि वातावरण विषयक तपशील, महासागर विषयक त्या क्षणाची (रिअल टाइम) माहिती मिळविता येणार आहे. त्यामुळे सागरी नौकानयन करताना उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती मिळविणे सोपे जाणार आहे. त्याचा उपयोग अधिक उत्तम नौकानायानासाठी होईल, असे नौदलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. सरकारच्या डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणाच्या सुसंगतीने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
‘इंद्रा’विषयी थोडेसे
‘भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लीकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स’ (बीआयएसएजी-एन) या संस्थेने ‘इंद्रा’च्या निर्मितीत महात्त्त्वाचे योगदान दिले आहे. हे ॲप वापरकर्त्याच्या गरजेनुसार त्याला जागतिक हवामान स्थिती आणि हवामान अंदाज पुरविण्यासाठी मदत करते. हे ॲप वापरकर्ता आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातूनही वापरू शकतो. त्यासाठी वापरकर्त्याला लॉगइन करण्याची गरज आहे. भारतीय नौदलातील सेवारत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे ॲप मोफत वापरता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून ‘लोकेशन’नुसार हवामानाचा अंदाज पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी वापरकर्त्याला आपल्या मोबाईलमधील लोकेशन फीचर्स सुरु ठेवावी लागणर आहेत. हे ॲप इंटरनेट आणि वायफायच्या उपयोग करूनही वापरता येऊ शकते. त्यासाठी वापरकर्त्याची माहिती देणे गरजेचे आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)