नौदलात १०६ अधिकारी दाखल
दि. १३ मे: नौदलाच्या एकात्मिक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमातील (इंटिग्रेटेड ऑफिसर्स ट्रेनीज कोर्स) १०६ अधिकाऱ्यांचे सागरी प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले. या अधिकाऱ्यांमध्ये मित्रदेशांतील सात अधिकाऱ्यांचाही समावेश होता. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांचे सागरी प्रशिक्षणही (ऑनबोर्ड फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रन) पूर्ण करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल व्ही. श्रीनिवास यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व करंडक प्रदान करण्यात आले. या वेळी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू सागरी प्रशिक्षणार्थी साठी असलेला ‘टेलीस्कोप पुरस्कार’ मिडशिपमन सी प्रणीत यांना देण्यात आला. तर, मिडशिपमन पीपीके रेड्डी यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’मध्ये प्रथम स्थान मिळाल्याबद्दल ‘बायनॉक्युलर’ पुरस्कार देण्यात आला.
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना व्हाइस ॲडमिरल व्ही. श्रीनिवास यांनी, ‘ज्ञान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आणि सागरी वातावरणाची सतत बदलती युद्धकला आणि क्लृप्त्या, तंत्रज्ञान आणि रणनीती यांच्या गतीशीलतेशी जुळवून घेण्याचे आवाहन या अधिकाऱ्यांना केले. वेग, सुरक्षितता आणि मनोबल राखून लोकांप्रती अत्यंत व्यावसायिकपणे आणि सहानुभूतीने वागणाऱ्या लष्करी नेत्याची वैशिष्ट्ये त्यांनी ठळकपणे मांडली. ‘सेवा परमो धर्म’ किंवा ‘स्वतःआधी इतरांची सेवा’ हे नेहमीच ब्रीदवाक्य असावे, असे त्यांनी सांगितले.
‘आयएनएस तीर’ या युद्धनौकेवर या प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रात्यक्षिक वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्याचे निरीक्षण दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रशिक्षण प्रमुख रिअर ॲडमिरल सतीश शेणई यांनी केले. हे अधिकारी आता विविध आघाड्यांवर नौदलाच्या युद्धनौका आणि तटरक्षक दलाच्या पश्चिम आणि पूर्व सागरी किनाऱ्यावरील गस्ती नौकांमध्ये तात्कालिक प्रशिक्षणासाठी सामील होतील. मॉरिशस तटरक्षक दलातील सहाय्यक कमांडंट प्रिशिता जुग्गामाह या अशा प्रकारचे सागरी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)