‘नेव्हल वॉर कॉलेज’मधील नव्या इमारतीचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
दि. ०६ मार्च : हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सागरी व सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेसाठी नौदलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी केले. गोव्यातील ‘नेव्हल वॉर कॉलेज’मधील नव्या प्रशिक्षण व प्रशासकीय संकुलाच्या इमारतीचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या इतिहासकाळातील एक प्रबळ नाविक शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोल राजघराण्याच्या नावावरून नव्या संकुलाचे नाव ‘चोल भवन’ असे ठेवण्यात आले आहे. ‘चोल भवन भारताच्या वैभवशाली नाविक परंपरांची साक्ष देईल व नव्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रेरणा देईल,’ असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
भारताच्या प्रतिस्पर्धी देशांची हिंदी महासागर क्षेत्रातील हालचाल वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि या भागाचे आर्थिक व व्यापारी महत्त्व लक्षात घेता भारताला असलेल्या सागरी व सुरक्षा विषयक आव्हानांचा फेरआढावा घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानुसार देशाचे लष्करी स्रोत व सामरिक प्राधान्याची फेररचना करावी लागेल,’ असे राजनाथसिंह या वेळी म्हणाले. ‘कोणतीही आर्थिक अथवा लष्करी ताकद आपल्या मित्रदेशांच्या सुरक्षेला अथवा त्यांच्या सार्वभौमत्त्वाला धक्का लावणार नाही, याची काळजी नौदल नेहमीच घेत आले आहे आणि ज्या ठामपणे भारतीय नौदल आपल्या मित्र देशांच्या पाठीशी उभे आहे, ते पाहता भारताच्या भूमिकेला जगभरात अधिक वजन प्राप्त होत आहे. नौदलाची वाढती ताकद केवळ आपले शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठीच नाही, तर या भागातील इतर भागीदार देशाच्या पर्यावरण सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय नौदलाने समुद्री चाचेगिरीविरोधात केलेल्या कारवाईमुळे जगभर भारतीय नौदलाचा दबदबा वाढला आहे. मात्र, त्याचबरोबर नवीन आव्हानेही समोर येत आहेत, त्यांचा सामना करण्यासाठीही नौदलाने सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
नौदलाच्या कारवर येथील ‘सी-बर्ड’ या नौदल तळावर बांधण्यात आलेल्या दोन नव्या नौदल धक्क्यांचे (पिअर्स) राजनाथसिंह यांनी या वेळी आभासी माध्यमातून उद्घाटन केले. या नव्या सुविधेमुळे येथे आता दोन विमानवाहू नौका व एक लँडिंग शिप टॅंक एकाच वेळेस ठेवणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर येथे विविध प्रकारच्या युद्ध व रसद पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी जहाजेही ठेवता येणार आहेत. तसेच, या जहाजांना पाणी, इंधन व आवश्यक रसद पुरवठाही येथून करता येणे शक्य आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कारवार नौदलतळावर सध्या सुरु असलेली विकासकामे या तळाच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील आहेत. या सुविधेमुळे कारवार येथे आता ३२ जहाजे व पाणबुड्या, छोटी जहाजे किंवा टगबोटी ठेवता येतील, तसेच देखभाल, दुरुस्तीची कामेही करता येतील. दुहेरी उपयोग करता येण्यायोग्य धावपट्टी या सुविधेत असणार आहे. त्याचबरोबर दहाहजार नौसैनिकांच्या निवासाची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. या सर्व विकासकामांमुळे उत्तर कर्नाटक व दक्षिण गोव्यात पर्यटनही वाढीस लागेल, असे या पत्रकात म्हटले आहे. पहिला टप्पा २०११मध्ये पूर्ण झाला होता. या टप्प्यात येथे दहा जहाजांची व्यवस्था होती. दुसऱ्या टप्प्याची कामे येत्या आठ वर्षात पूर्ण होतील. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर येथील सुमारे २५ किमीच्या परिसरात ५० हजार नौसैनिक वास्तव्यास असतील, त्यामुळे या भागाच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असेही मानले जात आहे.
(अनुवाद: विनय चाटी)