संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका ‘सुरत’ आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील ‘उदयगिरी’ या स्टेल्थ युद्दनौकेचे मंगळवारी मुंबईतील माझगाव डॉक येथे एकाच वेळी जलावतरण झाले. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात आलेली भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत.
देशाच्या सागरीक्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप, असे वर्णन संरक्षणमंत्र्यांनी या युद्धनौकांचे केले. रशिया – युक्रेन संघर्ष आणि कोविड-19मुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येत असताना भारताने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. महामारी असूनही जहाजनिर्मिती सुरू ठेवून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझगाव डॉकचे अभिनंदन केले. या दोन युद्धनौका भारतीय नौदलाच्या सशस्त्रतेचे सामर्थ्य वाढवतील आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचे तसेच आत्मनिर्भरतेच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतील, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
हिंद-प्रशांत क्षेत्र खुले आणि सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले. “हिंद-प्रशांत क्षेत्र संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारत या क्षेत्रातील प्रमुख देश आहे. शेजाऱ्यांसोबत मैत्री, मोकळेपणा, संवाद आणि सहअस्तित्व या भावनेवर या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आधारित आहे. त्याच दृष्टिकोनातून भारतीय नौदल आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडत आहे, असे ते म्हणाले.
हिंद महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात सतत बदलणारी सुरक्षा परिस्थितीमुळे येणाऱ्या काळात भारतीय नौदलाला अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागू शकते, असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणांचा फायदा घेऊन क्षमतांचा पुरेपूर वापर करून भारताला स्वदेशी जहाज बांधणी केंद्र बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना केले.
नौदलाच्या परंपरेनुसार, नेव्ही वाईव्हज वेलफेयर असोशिएशनच्या (पश्चिम क्षेत्र) अध्यक्षा श्रीमती चारू सिंग आणि माझगाव डॉक्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्नी श्रीमती जयश्री प्रसाद यांनी शुभेच्छा देत जहाजांचे अनुक्रमे ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ असे नामकरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आणि भारतीय नौदल व संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रोजेक्ट 15B आणि प्रोजेक्ट 17A या दोन्ही युद्धानौकांची रचना नौदल आरेखन संचालनालयाने (DND) केली आहे, जे देशातील सर्व युद्धनौकांच्या संरचनेचे काम पाहते. कारखान्यात उभारणीच्या टप्प्यात असताना उपकरणे आणि अन्य प्रणालीच्या सुमारे 75 टक्के ऑर्डर्स एमएसएमईसह स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या. देशातील ‘आत्मनिर्भरते’चे हे महत्त्वाचे उदाहरण आहे.
‘सुरत’विषयी
‘सुरत’ ही प्रोजेक्ट 15B या श्रेणीतील चौथी विनाशिका आहे, ज्याची निर्मिती P15A (कोलकाता श्रेणी) विनाशिकेत महत्त्वपूर्ण बदल करून केली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी आणि मुंबईपाठोपाठ पश्चिम भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक केंद्र असलेल्या सुरत शहराच्या नावावरून या विनाशिकेचे नाव ठेवण्यात आले आहे. सुरत शहराला समृद्ध सागरी किनारा आणि जहाज बांधणीचा इतिहास आहे. 16व्या आणि 18व्या शतकात शहरात बांधलेली जहाजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी (100 वर्षांपेक्षा जास्त) ओळखली जात होती. सुरत ही विनाशिका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार केली गेली आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवर नौकेच्या सांगाड्याचे बांधकाम झाले आणि मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये ते एकत्र जोडले गेले. या श्रेणीतील पहिली विनाशिका 2021मध्ये कार्यान्वित झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या विनाशिकांचे यापूर्वीच जलावतरण झाले असून त्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.
‘उदयगिरी’विषयी
आंध्र प्रदेशातल्या पर्वतरांगांवरून ‘उदयगिरी’ या फ्रिगेट युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही प्रोजेक्ट 17A श्रेणीतील तिसरी फ्रिगेट युद्धनौका असून सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स तसेच प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह P17 फ्रिगेटनुसार (शिवालिक श्रेणी) याची बांधणी केली आहे. ‘उदयगिरी’ हे पूर्वीच्या लिअँडर क्लास एएसडब्ल्यू फ्रिगेट ‘उदयगिरी’चे नवे रूप आहे, जे 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्ट 2007 या तीन दशकांत आपल्या गौरवशाली सेवेत देशासाठी असंख्य आव्हानात्मक मोहिमांमध्ये सहभागी होते. प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धानौकांपैकी चार माझगाव डॉक (एमडीएल) इथे आणि तीन जीआरएसई येथे निर्माणाधीन आहेत. प्रोजेक्ट 17A प्रकल्पातील पहिल्या दोन युद्धानौकांचे 2019 आणि 2020मध्ये अनुक्रमे एमडीएल आणि जीआरएसई येथे जलावतरण करण्यात आले.
(संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर आधारित हा लेख आहे)
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCPZPza3BQr6nt1Tp8EntiGg