समुद्री चाच्यांविरोधातील आपली दुसरी सशस्त्र मोहीम आय. एन. एस. सुमित्राने यशस्वीपणे राबवून 19 कर्मचारी तसेच एका जहाजाची सुटका केली. ‘इमान’ या इराणी मासेमारी जहाजावरील समुद्री चाच्यांचा प्रयत्न यशस्वीरित्या रोखल्यानंतर, भारतीय नौदलाच्या आय. एन. एस. सुमित्राने सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर आणखी एक मोहीम पार पाडली. या कारवाईत, 19 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेले मासेमारी जहाज अल नईमी आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची त्यांनी 11 सोमालीय चाच्यांच्या तावडीतून सुटका केली.
भारतीय नौदलाचे गस्ती जहाज आय. एन. एस. सुमित्राला सोमालिया आणि एडनच्या आखाताच्या परिसरात पायरसीविरोधी तसेच सागरी सुरक्षा मोहिमांसाठी तैनात करण्यात आले आहे. 28 जानेवारीच्या संध्याकाळी, इराणी ध्वज असलेल्या फिशिंग व्हेसल (एफ. व्ही.) इमानचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या संकट कॉलला भारतीय युद्धनौकेने प्रतिसाद दिला. समुद्री चाच्यांनी इमान या जहाजावर हल्ला करून कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. भारतीय नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे की, आय. एन. एस. सुमित्राने स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणि जबरदस्त डावपेचांचा वापर करून मासेमारीचे हे जहाज यशस्वीरित्या अडवले. 29 जानेवारीच्या पहाटे, जहाज आणि त्यातील 17 इराणी नागरिकांचा समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. बचाव कार्यानंतर, एफ. व्ही. इमान पूर्णपणे तपासून, त्याला आता कोणताही धोका नसल्याची शहानिशा करून, पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले.
सुरुवातीच्या कारवाईनंतर, आय. एन. एस. सुमित्राने आणखी एक इराणी ध्वज असलेले मासेमारीचे जहाज, अल नईमी – जे समुद्री चाच्यांच्या ताब्यात होते – त्याचा मागोवा घेऊन ते अडवण्यासाठी पुन्हा एकदा त्वरित हालचाल केली. या जहाजावरील 19 पाकिस्तानी नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. या आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देत, 29 जानेवारीच्या संध्याकाळी, सुमित्राने मासेमारी जहाजाला अडवले. पुन्हा एकदा योग्य व्यूहरचना आणि जहाजावरील हेलिकॉप्टर तसेच बोटींचा प्रभावीपणे वापर करून, युद्धनौकेने कर्मचारी आणि जहाज या दोघांनाही सुरक्षितपणे सोडण्यास चाच्यांना भाग पाडले. भारतीय युद्धनौकेने या भागातील धोका पूर्णपणे संपुष्टात आल्याची खात्री केली तसेच, सोमाली चाच्यांच्या ताब्यात असलेल्या कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक तपासणीही केली, असे भारतीय नौदलाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
36 तासांपेक्षा कमी कालावधीत, आय. एन. एस. सुमित्राने जलद, योग्य व्यूहरचना आणि अथक प्रयत्न करून कोचीच्या पश्चिमेस सुमारे 850 नॉटिकल मैल अंतरावर दक्षिण अरबी समुद्रात अपहरण झालेल्या दोन मासेमारी जहाजांची आणि 36 कर्मचाऱ्यांची (17 इराणी आणि 19 पाकिस्तानी) यशस्वीरित्या सुटका केली. विशेष म्हणजे, आय. एन. एस. सुमित्राने केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याठी या मासेमारी जहाजांचा समुद्री चाच्यांकडून संभाव्य गैरवापर होणे टळले आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)