दि. ०८ मे: ब्रिटनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज’च्या (आरसीडीएस) शिष्टमंडळाने मंगळवारी नवी दिल्लीतील ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’ला भेट देऊन ‘कॉलेज’चे समादेशक (कमांडंट) व विद्यार्थ्यांशी चर्चा केली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’ या सोशल मीडिया संकेतस्थळावर दिली आहे.
A 21- members delegation of the Royal College of Defence Studies RCDS, UK led by Lt Gen Sir George Norton (Retd.) Commandant, RCDS visited NDC, New Delhi today to enhance defence interaction at senior military leadership level. (1/2)@rajnathsingh @giridhararamane pic.twitter.com/nd6xx7idHF
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) May 7, 2024
भारत आणि ब्रिटनचे उभयपक्षी लष्करी संबंध, उभय देशांतील संरक्षण विषयक बाबी आणि संरक्षण क्षेत्रासमोरील नवी आव्हाने या विषयावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज’च्या २१ सदस्यीय शिष्टमंडळाने ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’ला भेट दिली. ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’ भारतातील एक अतिशय प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्था मानली जाते. शिष्टमंडळाचे नेतृत्व ‘रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज’चे समादेशक (कमांडंट) लेफ्टनंट जनरल सर जॉर्ज नॉर्टन यांनी केले. या शिष्टमंडळाने नॅशनल डिफेन्स कॉलेजमधील विद्यार्थी आणि समादेशक (कमांडंट) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी उभय देशातील संरक्षण विषयक बाबींवर चर्चा केली. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर परस्पर संवाद वाढवण्याच्या दृष्टीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या ६४ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींशी या शिष्टमंडळाने चर्चा केली. भारत आणि ब्रिटन समोर असणारी सुरक्षा विषयक आव्हाने आणि महत्त्वाचे मुद्दे, उभयपक्षी संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
विनय चाटी