संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील DAC अर्थात संरक्षण संपादन परिषदेने २१,७७२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पाच प्रमुख भांडवली प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये भारतीय नौदलासाठी प्रगत जहाजे, भारतीय तटरक्षक दलासाठी हेलिकॉप्टर तसेच भारतीय वायुसेनेसाठी (IAF) इलेक्ट्रॉनिक युद्ध संच, रणगाडेअन्य अपग्रेडेड वाहने आणि विमानांची इंजिनं आदिंचा समावेश आहे. या प्रस्ताव मंजुरीमुळे भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाला निश्चीतच चालना मिळाली आहे.
नौदलाचे सक्षमीकरण होणार वॉटर जेट फास्ट ॲटॅक क्राफ्ट्सचा (जहाजांचा) समावेश
प्रस्तावात नमूद केल्यानुसार, भारतीय नौदलासाठी 31 नवीन वॉटर जेट फास्ट ॲटॅक क्राफ्टसाठी मंजूरी देण्यात आली आहे. या जहाजांची रचना कमी-तीव्रतेच्या सागरी ऑपरेशन्स, किनारी भागांवर पाळत ठेवणे, गस्त घालणे तसेच शोध कार्य आणि बचाव मोहिमेसाठी उपयुक्त अशी असणार आहे. याशिवाय बेट प्रदेशांभोवती होणारी चाचेगिरी रोखण्यासाठी देखील ही जहाजे सुसज्ज असतील, असे संरक्षण मंत्रालयाने (MOD) सांगितले आहे.
वेगवान इंटरसेप्टर क्राफ्ट्स (जहाजे)
याशिवाय सदर प्रस्तावामध्ये, १२० वेगवान इंटरसेप्टर जहाजांनाही मान्यता देण्यात आली आहे. ही अष्टपैलू जहाजे तट संरक्षणाच्या बळकटीकरणामध्ये मोलाचे योगदान देतील. तसेच विमानवाहू लढाऊ जहाजे, फ्रिगेट्स आणि पाणबुड्यांसारख्या उच्च-मूल्याच्या युनिट्सना एस्कॉर्ट देखील करतील. ज्यामुळे भारताच्या किनारपट्टीवरील सुरक्षेत अधिक वाढ होण्यास मदत होईल.
एअरबोर्न कॉम्बॅटची कार्यक्षमता वाढणार, Su-30 MKI विमानांसाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट
या प्रस्तावांतर्गत, Su-30 MKI लढाऊ विमानांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये हवाई स्व-संरक्षण जॅमर पॉड्स, रडार चेतावणी रिसीव्हर्स आणि अन्य उपकरणांचा देखील समावेश आहे. MOD च्या म्हणण्यानुसार, या अपग्रेडेशनमुळे Su-30 MKI च्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून, शत्रूच्या रडारपासून दूर राहण्यास आणि मोहिमेदरम्यान हवाई संरक्षण प्रणालींकडून येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यास ही लढाऊ विमानं अधिक सक्षम बनणार आहेत.
किनारपट्टीची सुरक्षा वाढणार, अत्याधुनिक हेलिकॉप्टरचा समावेश
भारतीय तटरक्षक दलामध्ये ६ नव्या अत्याधुनिक मात्र वजनाने हलक्या अशा Mk-III (मेरिटाइम रोल) या हेलिकॉप्टर्सचा समावेश होणार आहे. या हेलिकॉप्टर्समुळे किनारपट्टीवर पाळत ठेवणे आणि सागरी सुरक्षेची कार्यप्रणाली मजबूत करण्यास सहकार्य मिळाणार आहे.
प्रमुख मालमत्तेचे सेवा आयुष्य वाढणार
DAC ने भारतीय सैन्याच्या T-72 आणि T-90 रणगाडे, BMP पायदळ लढाऊ वाहने आणि Su-30 लढाऊ विमानांच्या इंजिनांच्या दुरुस्तीलाही हिरवा कंदील दाखवला आहे. या सुधारणांचे उद्दिष्ट या महत्त्वपूर्ण संरक्षण मालमत्तेचे सेवा आयुष्य वाढवणे, शाश्वत ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे आहे.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, भारताच्या संरक्षण उत्पादनात स्वदेशीकरण आणि स्वावलंबनावर भर देणे आणि देशाच्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला चालना देणे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
टीम भारतशक्ती
(अनुवाद – वेद बर्वे)