“समुद्र प्रदक्षिणा” मोहिमेला सुरुवात, सशस्त्र दलांमधील महिलांचा सहभाग

0

तीन सैन्य दलांतील महिलांच्या ‘समुद्र प्रदक्षिणा’ या सागरी परिक्रमा मोहिमेचा काल दि. 7 एप्रिल 2025 रोजी कुलाबा येथील भारतीय नौदल जलक्रीडा प्रशिक्षण केंद्र येथून प्रारंभ झाला.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग (CME) कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी या मोहीमेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या मोहिमेत भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलातल्या 12 महिला सदस्यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत आयएएसव्ही त्रिवेणी जहाज मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मुंबईला परत असा 4 हजार सागरी मैलांचा 55 दिवसांचा आव्हानात्मक प्रवास करणार आहे.

ही एक पथदर्शी मोहिम असून, या मोहिमेतून नारी शक्तीची क्षमता अधोरेखित झाली आहे. त्यासोबतच सागरी उपक्रमांमध्ये लिंगभाव समानतेला चालना देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. 2026 या वर्षासाठीही अशाच प्रकारच्या महत्त्वाकांक्षी सागरी परिक्रमा मोहिमांचे नियोजन केले असून, त्या दिशेनेच ही मोहीम पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आखण्यात आली आहे.

या मोहिमेसाठी तिन्ही सैन्यदलांतील 41 उत्साही महिला प्रतिनिधींमधून 12 महिला अधिकार्‍यांची निवड केली गेली. या सर्वजणींनी सागरी जलपर्यटनाचे दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. या सर्व महिला अधिकारी, समुद्रातील धोकादायक जलप्रवास करून त्यांच्यातील लवचिकपणा, धैर्य आणि निर्धाराने दर्शन घडवतील. या चमूने हवामानाशी संबंधित आव्हाने, जहाजातील यांत्रिक समस्या आणि शारीरिक आव्हानांसारख्या अनेक प्रशिक्षण मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.


आर्मी ॲडव्हेंचर नोडल सेंटर फॉर ब्लू वॉटर सेलिंग (एएएनसीबीडब्ल्यूएस) येथे अनुभवी खलाशांच्या कठोर मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण झालेल्या या महिला अधिकाऱ्यांनी एक वर्षाहून अधिक काळ खडतर तयारी केली आहे. नवशिक्यांपासून ते अनुभवी नाविकांपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासामध्ये नौकानयनाची मूलभूत तत्त्वे, हवामानाचा अंदाज, आपत्कालीन हाताळणी आणि लांब पल्ल्याच्या मोहिमेचे नियोजन यांचा समावेश होता.

मुंबई-सेशेल्स-मुंबई या मोहिमेच्या माध्यमातून सशस्त्र दलातील महिलांच्या सक्षमीकरणाची प्रचिती येईल, आणि त्यासोबतच ही मोहीम अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार्‍या राणी वेलू नचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या भारताच्या महान वीरांगनाना आदरांजलीही अर्पण करणारी मोहीम असणार आहे.

या अभूतपूर्व मोहिमेची सांगता 30 मे 2025 रोजी‌ होईल. त्यानिमित्ताने त्या दिवशी सांगता समारंभाचेही नियोजन करण्यात आले आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नारीशक्ती ही कोणतीही आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम असलेली ताकद असल्याचे अधोरेखित केले आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleSikh Gurdwara at Epicentre of Terrorist Violence in Afghanistan
Next articleएमआय-17 हेलिकॉप्टर्सच्या ईडब्ल्यू सूट्सचे कंत्राट बीईएलला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here