भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज – आयएनएसव्ही तारिणी हे आपल्या नाविक सागर परिक्रमा दोन या मोहिमेमधील चौथा टप्पा पूर्ण करुन दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये दाखल झाले.
केपटाऊन येथील भारताच्या महावाणिज्यदूत रुबी जसप्रीत, दक्षिण आफ्रिकी नौदल ताफ्याच्या प्रमुख रिअर ॲडमिरल (जेजी) लिसा हेंड्रिक्स आणि प्रिटोरिया येथील भारताचे संरक्षण सल्लागार कॅप्टन अतुल सपाहिया यांनी जहाजाचे आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.
या जहाजाच्या स्वागताप्रीत्यर्थ दक्षिण आफ्रिकन नौदल बँडने सादरीकरण केले.
एनएसपी II मोहीम
“नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 02 ऑक्टोबर 24 रोजी गोवा येथून नाविका सागर परिक्रमा II मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. भारतीय नौदलाच्या नौकानयन जहाजावरील (आयएनएसव्ही तारिणी) नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. या दोन महिला अधिकारी या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत,” असे भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मोहिमेचा उद्देश
या मोहिमेअंतर्गत आठ महिन्यांच्या कालावधीत 23,400 नॉटिकल मैल ( 43,300 किमी) पेक्षा जास्त अंतर कापण्याचे उद्दिष्ट असून मे 2025 मध्ये ते प्रदक्षिणा पूर्ण करुन गोव्यात दाखल होईल.
या मोहिमेत आतापर्यंत या जहाजाकडून फ्रीमँटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्यूझीलंड) आणि पोर्ट स्टॅनली(केपटाऊन) असे एकूण तीन थांबे घेण्यात आले आहेत.
नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कार्यासाठी हे जहाज दोन आठवडे रॉयल केप यॉट क्लबमध्ये असेल.
या काळात जहाजावरील कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाच्या सायमन टाउन येथील नौदल तळात आणि गॉर्डन बे नेव्हल विद्यापीठात परिसंवादात सहभाग घेतील. याशिवाय त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीत सामुदायिक संपर्क कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
या जहाजाने आणि त्यावरील कर्मचाऱ्यांनी खवळलेला समुद्र, अत्यंत थंड तापमान आणि वादळी वाऱ्यांसह प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला असून त्यामुळे ही प्रदक्षिणा अतिशय आवाहनात्मक आणि खडतर ठरली आहे. आतापर्यंत या मार्गावर 50 नॉट्सपेक्षा (93 किमी प्रतितास) जास्त वेगाने वारे आणि 7 मीटर (23 फूट) उंच लाटांना तोंड देत जहाजाने आपला प्रवास सुरु ठेवला आहे.
स्वदेशी आयएनएसव्ही तारिणी
स्वदेशी बनावटीच्या आयएनएसव्ही तारिणी या 56 फुट लांबीच्या नौकानयन जहाजाचा, भारतीय नौदलात 2018 मध्ये समावेश झाला असून या जहाजाने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. हे जहाज भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा पुरावा आहे.
नाविका सागर परिक्रमा II ही मोहीम भारतीय सशस्त्र दलातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत असून युवतींनी सशस्त्र दल सेवेत विशेषतः भारतीय नौदलात मोठ्या प्रमाणात प्रवेश घ्यावा यासाठी प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे.
याशिवाय नौवहन आणि वैज्ञानिक संशोधन वाढीस लागावे यादृष्टीने देखील मोहिमेची ही आवृत्ती प्रेरणादायक ठरेल.
तारिणी जहाजाने केपटाऊन येथे घेतलेला थांबा, भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या संबंधांचे तसेच हिंद महासागर क्षेत्रातील मैत्रीपूर्ण देशांसोबत सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवतो.
अलिकडच्या काळात, भारतीय नौदलाचे जहाज तलवारने ऑक्टोबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत IBSAMAR सरावाच्या 8 व्या आवृत्तीत भाग घेतला होता.
या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भारतीय नौदलाचे नवीनतम स्टील्थ फ्रिगेट आयएनएस तुशिल हे देखील डरबन येथील बंदरात आले होते आणि क्वा-झुलु नटाल येथे दक्षिण आफ्रिकेचे नौदल आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला होता.
अशा भेटी आणि सहभागामुळे सागरी क्षेत्रातील समान आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षित समुद्र सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींमधून शिकण्यासाठी नौदल एकत्र येते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)