इराणी नौदलाच्या युद्धनौका, IRIS Boushehr आणि IRIS Lavan, या नुकत्यात प्रशिक्षण भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. भारतीय नौदलाने बुधवारी दिलेल्या एका निवेदनानुसार, ‘या विशेष उपक्रमाचा उद्देश भारत आणि इराण मधील सागरी सहकार्य मजबूत करणे आणि परस्पर संबंध दृढ करणे हा आहे.’
मंगळवारी, मिशन कमांडर- कॅप्टन मोहम्मद साबेरी यांनी, या दोन्ही जहाजांवरील कमांडिंग अधिकाऱ्यांसह- वरिष्ठ कॅप्टन सय्यद अली मदनी (लवान) आणि कमांडर हमेद बहरामियन (बौशेहर) यांनी मुख्यालय पश्चिम नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी (ऑपरेशन्स) रिअर ॲडमिरल विद्याधर हरके यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत, नौदल प्रशिक्षण कार्यक्रम, द्विपक्षीय ऑपरेशनल सहयोग आणि परस्पर हितसंबंध यासारखे विषय हाताळले गेले.
सुमारे 220 अधिकारी कॅडेट्स घेऊन जाणारा फ्लोटिला, हिंद महासागरात प्रशिक्षण मोहिमेवर असून, त्याचे सागरी कौशल्य आणि ऑपरेशनल तयारी वाढवत आहे. आगमनानंतर, भारतीय नौदलाने लष्करी बँडसह या युद्धनौकांचे औपचारिक स्वागत केले.
दोन्ही देशाच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या परस्पर संवादात, नौदल क्षमता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांची योजना आखण्यात आली आहे, ज्यात क्रीडा सहभाग आणि अधिकारी कॅडेट्ससाठी नौदल डॉकयार्डमधील प्रशिक्षण भेटींचा समावेश आहे.
25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजित ही भेट, भारत आणि इराणच्या नौदलांमधील वाढत्या सहभागाला अधोरेखित करते, प्रादेशिक सुरक्षा आणि सागरी सहकार्यातील सामायिक हितसंबंधांना बळकटी देते. गेल्या काही वर्षांमध्ये, भारत आणि इराणने संरक्षणाशी संबंधित विविध क्षेत्रात आपले सहकार्य वाढवले आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत झाले आहेत.
‘इराणी युद्धनौकांची ही भेट, दोन्ही देशातील सागरी सहकार्य आणि परस्पर मैत्री दृढ करण्याच्या दिशेने एक नवे पाऊल आहे,’ असे भारतीय नौदलाने त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे.
टीम भारतशक्ती