दीर्घकालीन दुर्लक्षानंतर, भारत रशियासोबतचे संबंध पुन्हा सुधारतो आहे का?

0
रशियासोबतचे संबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट. फोटो सौजन्य: PIB

“भारत आणि रशियामध्ये सध्या कोणतेही तणाव नाहीत, कोणताही छुपा संघर्ष नाही,” असे एका ज्येष्ठ माजी राजनयिकांनी (डिप्लॉमॅट्स), नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर सांगितले. “रशियाला माहीत आहे की आपल्याला त्यांच्यामध्ये फारसे स्वारस्य नाही. आपण त्यांच्याशी मैत्री असल्याचे केवळ भासवतो आहोत, पण आपला खरा कल हा अमेरिकेकडे अधिक आहे,” असेही ते म्हणाले.

सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी, मॉस्कोमध्ये एक महत्त्वपूर्ण आणि सखोल बैठक सत्र पूर्ण केले आहे. त्यांनी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली, तसेच पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर संवादही झाला. हे सगळे या वर्षाअखेरीस होणाऱ्या पुतीन यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.

मात्र, दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे भारतासोबत बिघडत चालेलेले संबंध पाहता, भारत रशियासोबतचे संबंध पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो.

डोवाल यांचा रशिया दौरा आणि त्यावेळी झालेल्या चर्चांनी अनेकांचे लक्ष वेधवे आहे, कारण हा दौरा नेमका अशावेळी झाला आहे, जेव्हा भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव पाहायला मिळत आहे.

सामान्यतः अशा दौऱ्यांचे नियोजन हे काही आठवडे किंवा महिन्यांआधी केलेले असते, काही वृत्तांनुसार डोवाल यांचा रशिया दौरा थोडा उशीराच होणे अपेक्षित होते, मात्र त्याआधीच हा दौरा झाल्यामुळे आता तो चर्चेचा विषय ठरतो आहे.

माजी परराष्ट्र सचिव आणि रशियातील माजी राजदूत- कंवल सिब्बल मान्य करतात की, “अणुकरारानंतर अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये पर्याय मिळाल्यामुळे भारत-रशिया संबंध कमकुवत झाले आहेत. अमेरिकेसोबत भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात आहे, भारतीय वंशाचे लोक तिथल्या तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि अमेरिका हा भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे.”

“त्या तुलनेत, भारताचे रशियाशी संबंध हे प्रामुख्याने तेल खरेदीपुरतेच मर्यादित आहेत. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो, पण त्यांना फारसे काही निर्यात करत नाही. आज याच तेलाचा प्रश्न अमेरिका आणि युरोपसाठी राजकीय ‘हॉट पोटॅटो’ ठरला आहे.”

सिब्बल यांचे म्हणणे आहे की, “रशियासोबतचे संबंध कमकुवत करण्यासाठी, भारताकडून मुद्दाम घेण्यात आलेला हा राजकीय निर्णय नव्हता. फक्त आपले राष्ट्रीय हित जसजसे पुढे गेले, तसतसे ही परिस्थिती निर्माण झाली. रशिया हा आपल्या परराष्ट्र धोरणाच्या समीकरणात कायम असून, तोच एक स्थिर घटक ठरला आहे.”

याआधी उल्लेख केलेल्या माजी मुत्सदींच्या मते: “रशियाला हे माहीत आहे की, सध्या आपले अमेरिकेसोबत संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे मॉस्कोमधील काही व्यक्ती भारताविषयी नकारात्मक भावना ठेवू शकतात, मात्र सध्या मोदी आणि पुतीन यांच्यातील वैयक्तिक संबंध हाच मोठा आधार आहे.”

“मात्र, वैयक्तिक पातळीवरील हे संबंध, दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत. ज्या दिवशी रशिया अमेरिकेसोबत कुठला मोठा करार करेल (जो कदाचित लवकरच होईल), तेव्हा ते आपल्याशी तसेच वागतील जसे आपण त्यांच्याशी वागलो आहोत, आणि ज्यादिवशी ट्रम्प चीनसोबत व्यापारविषयक करार करतील, त्यादिवशी आपण एकाकी पडू,” असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

कंवल सिब्बल या मताशी सहमत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, “भारत सध्या रशिया-चीनवर संतुलन राखत आहे.
जसे रशिया भारत-अमेरिका संबंधांमध्ये अडथळा आणत नाही, तसेच आपणही मॉस्को आणि बीजिंग यांच्यातील वाढत्या जवळीकीचे कारण समजून घेतो आहोत. आपले रशियाशी पर्याय अजूनही खुले आहेत. गरज पडल्यास, आपण त्यांच्याशी संबंध वाढवू शकतो. BRICS, SCO परिषदांद्वारे हे सहकार्य वाढू शकते.”

“आपण BRICS संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहोत.
आपली भूमिका एकसत्ताक जागतिक व्यवस्थेला नाकारण्याची आहे आणि BRICS-SCO च्या माध्यमातून आपण जागतिक व्यवस्था टिकवण्यासाठी आपले स्थान निर्माण करणारच आहोत,” असा विश्वास ते व्यक्त करतात.

मूळ लेखक– सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleAustralian Army Chief in Delhi, Focus on Defence Alumni Diplomacy Ahead of Quad Summit
Next articleक्वाड परिषदेपूर्वी ऑस्ट्रेलियन लष्करप्रमुख दिल्लीमध्ये; संरक्षण सहकार्यावर चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here