15 महिन्यांहून अधिक काळ चाललेले युद्ध आणि प्रदीर्घ चर्चांच्या फेऱ्यांनंतर, इस्रायल आणि हमास यांनी नवीन युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेबाबतच्या करारावर सहमती दर्शवली असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी जाहीर केले.
या करारानुसार सहा आठवड्यांसाठी युद्धविराम, गाझाच्या नागरी भागातून इस्रायली सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार आणि इस्रायलने ताब्यात घेतलेल्या शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांची सुटका यांचा समावेश आहे.
‘या करारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नव्हता. मी अनेक दशके परराष्ट्र धोरणात काम केले आहे, मात्र मी अनुभवलेल्या सर्वात कठीण वाटाघाटींपैकी ही एक होती,” असे बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधून सांगितले. “अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने हमासवर निर्माण केलेल्या दबावामुळे मी या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो आहे,” असेही ते म्हणाले.
अमेरिकेचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि हमासवरील इस्रायली दबाव याला त्यांनी या यशाचे श्रेय दिले. या करारामध्ये पहिल्या टप्प्यात महिला, वृद्ध पुरुष आणि जखमी किंवा आजारी असलेल्यांची सुटका समाविष्ट आहे. हमासने ताब्यात घेतलेल्या सात अमेरिकन लोकांपैकी काहीजण सुटका केल्या जाणाऱ्या ओलिसांमध्ये असतील याला बायडेन यांनी दुजोरा दिला.
रविवारपासून सुरू होणार युद्धविराम
अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीने रविवारीपासून तीन टप्प्यात युद्धबंदीची अंमलबजावणी केली जाईल. गाझा उद्ध्वस्त करणारी आणि प्रदेश अस्थिर करणारी लढाई थांबवणे हा या युद्धविरामाचा उद्देश आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या काही दिवस आधी या घडामोडी घडल्या आहेत.
नोव्हेंबर 2023 च्या करारासह मागील वाटाघाटी फिसकटल्यानंतर हा करार झाला. आधीच्या करारानुसार आठवडाभर चाललेल्या युद्धविरामाच्या दरम्यान 105 ओलिसांची सुटका निश्चित करण्यात आली होती. युद्ध पुन्हा सुरू झाले त्यावेळी हा करार उघडकीस आला.
युद्धाची विध्वंसकता
हमास आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या युद्धात 46 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे तर गाझाच्या 23 लाख रहिवाशांपैकी बहुसंख्य नागरिक विस्थापित झाले आहेत.
या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाली आहे, ज्यात लेबनॉनमधील इस्रायल आणि इराण समर्थित हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष, येमेनमधील हुती बंडखोर आणि स्वतः इराणबरोबर वाढलेला तणाव यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या युद्धामुळे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे राजकीय पतन झाले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कराराच्या गुंतागुंतीवर भर देत म्हटले की, “आम्ही सर्वसमावेशक ठरावासाठी प्रयत्न करत राहू, त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल.”
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)