सोमवारी इजिप्तच्या राज्याशी संलग्न असलेल्या अल काहेरा न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यस्थ इजिप्त आणि कतार यांनी हमासला गाझा युद्धबंदीचा नवीन प्रस्ताव सुचवला आहे. दरम्यान, हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘ते या प्रस्तावातील दोन प्रमुख मुद्द्यांशी असहमत आहेत.’
सूत्रांचा हवाला देत, अल काहेरा म्हणाले की, “आम्ही या करारातील मध्यस्थी असलेल्या हमासच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत.”
युद्धबंदी कराराने गाझामधील युद्ध संपवावे आणि इस्रायलने या पट्ट्यातून पूर्णपणे माघार घ्यावी, अशी आपली मुख्य मागणी पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने पुन्हा एकदा मांडली आहे.
तत्पूर्वी, हमासचे वरिष्ठ अधिकारी सामी अबू झुहरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, ‘इस्रायलने शत्रुत्व पूर्णपणे थांबवावे या पॅलेस्टिनी गटाच्या मागणीचे, हा नवा प्रस्ताव समर्थन करत नाही.’
‘या प्रस्तावात, इस्रायलने पहिल्यांदाच वाटाघाटीच्या पुढील टप्प्यात हमासचे नि:शस्त्रीकरण करण्याचे आवाहन केले आहे, ज्यासाठी पॅलेस्टिनी गट तयार होणार नाही,’ असे अबू झुहरी म्हणाले.
“प्रतिरोधाच्या शस्त्रास्त्रांचे समर्पण करणे हा आजवर लाखोवेळा नाकारण्यात आलेला प्रस्ताव आहे, तो ना विचाराधीन आहे, ना चर्चेचा भाग,” असेही अबू झुहरी यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रस्तावावर इस्रायलने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
इजिप्तच्या सरकारी माहिती विभागप्रमुखांनी अल काहेरा यांना सांगितले की, “हमासला आता वेळेचे महत्त्व नीट माहिती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की इस्रायली प्रस्तावावर त्यांचे उत्तर लवकरच येईल.”
इस्रायलने जानेवारीच्या उत्तरार्धात लागू झालेली शस्त्रसंधी मार्चमध्ये संपवून गाझा पट्टीतील लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली.
सोमवारी कॅरो (इजिप्त) येथे झालेल्या शस्त्रसंधी पुनर्स्थापनेसाठीची बैठक निष्फळ ठरल्याची माहिती, पॅलेस्टिनी आणि इजिप्शियन सूत्रांनी दिली.
जानेवारीच्या अखेरीस लागू झालेल्या, तीन टप्प्यांच्या युद्धबंदी करारात मान्य केल्याप्रमाणे, युद्ध संपवण्यासाठी आणि गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेण्याचा इस्रायलचा आग्रह आहे.
इस्रायलने म्हटले आहे की हमासचा खात्मा करून गाझामध्ये ठेवण्यात आलेल्या उर्वरित बंधकांना परत केल्याशिवाय ते युद्ध संपवणार नाही.
अबू झुहरी म्हणाले की, “युद्ध संपवण्याच्या आणि गाझामधून इस्रायली सैन्य मागे घेण्याच्या बदल्यात हमास एकाच तुकडीत बंधकांना सोपवण्यास तयार आहे”.
गेल्या महिन्यात, लष्करी कारवाई पुन्हा सुरू केल्यापासून इस्रायली सैन्याने 1,500 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना ठार केल्याचं गाझा येथील आरोग्य विभागाने सांगितलं आहे. यामुळे शेकडो हजार नागरिक विस्थापित झाले आहेत आणि संपूर्ण गाझा पट्टीवर पुरवठा बंदी (ब्लॉकेड) घालण्यात आली आहे.
सध्या 59 इस्रायली बंदी अजूनही अतिरेक्यांच्या ताब्यात आहेत, त्यापैकी 24 जण जिवंत असल्याचा इस्रायलचा अंदाज आहे.
(रॉयर्सच्या इनपुट्ससह)