गाझा शहराकडे जाणारा मुख्य रस्ता सील, इस्रायलचा अंतिम निर्वासन इशारा

0
इस्रायली रणगाड्यांनी गुरुवारी गाझा शहराकडे जाणारा मुख्य रस्ता सील केला. जे पळून गेले त्यांच्या परत येण्यावर प्रतिबंध लावले. संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इशारा दिला की अजूनही गाझा शहरात असलेल्या लाखो लोकांना पळून जाण्याची ही अंतिम संधी आहे.

इस्रायलने गाझा शहराच्या काही दशलक्ष नागरिकांना दक्षिणेकडे जाण्यास सांगितले आहे कारण या महिन्यात युद्धातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक हल्ला इस्रायलकडून केला जाणार आहे. गाझाच्या सर्वात मोठ्या शहरी भागात अजूनही दडून बसलेल्या हमासच्या अतिरेक्यांना मुळापासून उखडून टाकण्याचे वचन इस्रायलने दिले आहे.

रहिवाशांनी रॉयटर्सला सांगितले की गाझा शहराच्या दक्षिणेकडील मुख्य रस्त्यावर रणगाड्यांनी वाळूच्या पोत्यांचे अडथळे उभारले होते. लोकांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात होती, परंतु जे अन्न किंवा तात्पुरत्या निवाऱ्याच्या शोधात बाहेर पडले होते त्यांना आता परतण्याची परवानगी दिली जात नव्हती.

इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “ज्या गाझा रहिवाशांना दक्षिणेकडे जाण्याची इच्छा आहे आणि आय. डी. एफ. च्या पूर्ण-प्रमाणात सुरू असलेल्या मोहिमांच्या पार्श्वभूमीवर गाझा शहरातच हमास कार्यकर्त्यांना वेगळे ठेवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे.”

जे लोक बाहेर पडतील त्यांची लष्कराकडून तपासणी केली जाईल, असेही काट्झ म्हणाले.

लष्कराने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी उत्तर आणि दक्षिण गाझा विभागणाऱ्या नेत्झारिम कॉरिडॉरचे ऑपरेशनल नियंत्रण मजबूत करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. मात्र यावर अधिक माहितीसाठी केलेल्या विनंतीला त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

‘आम्ही कुठेही जाणार नाही’

संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की गेल्या काही आठवड्यात इस्रायली सैन्याच्या वाटचालीमुळे 4 लाख नागरिक पळून गेले आहेत. याशिवाय या मार्गावरील इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. याशिवाय 6 ते 7 लाख नागरिक अजूनही गाझा शहरात आहेत.

रॉयटर्सने काही रहिवाशांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की लोकांना गाझा शहरात परतण्यापासून रोखण्याच्या या कारवाईमुळे त्यांचा तिथेच राहण्याचा निर्धार आणखी वाढला आहे.

“आम्ही कुठेही जाणार नाही. काल, एका ड्रोनने आमच्या इमारतीच्या छतावर ग्रेनेड टाकले, पण आम्ही कुठेही जाणार नाही आहोत,” असे गाझा शहरात राहणाऱ्या 24 वर्षीय हानी यांनी स्पष्ट केले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी फक्त त्यांचे पहिले नाव प्रसिद्ध करण्याची विनंती केली.

“आम्हाला भीती आहे की जर आम्ही इथून बाहेर पडलो तर आम्हाला आमचे गाझा शहर पुन्हा कधीही दिसणार नाही.”

इस्रायली विमाने आणि रणगाडे यांचे गाझा शहरावर जोरदार हल्ले सुरूच आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गेल्या 24 तासांत इस्रायली गोळीबारात किमान 77 लोकांचा मृत्यू झाला.

गुरुवारी करण्यात हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, ज्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता. अल-मावासी हा दक्षिणेकडील किनारी भाग आहे. गाझाच्या इतर भागांमधून पळून जाण्यास भाग पाडलेल्या लाखो रहिवाशांसाठी इस्रायलने आलं मावासीला “मानवतावादी क्षेत्र” म्हणून घोषित केले आहे.

हल्ल्यांमुळे आरोग्य सुविधांचे नुकसान

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांमुळे चार वैद्यकीय सुविधा बंद करण्यास भाग पाडल्यानंतर आजारी आणि जखमींवर उपचार करण्याची क्षमता कमी होत आहे,

गाझा शहराच्या मुख्य रुग्णालय अल शिफा येथील डॉक्टरांनी सांगितले की, इस्रायलने रुग्णालयाभोवती सतत केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे त्यांना आपली सेवा कमी करण्यास भाग पाडले गेले आहे, कारण रुग्णालय लवकरच बंद करावे लागेल अशी भीती रुग्णांना वाटत होती.

“जर हा विभाग बंद झाला तर याचा अर्थ रुग्णांचा मृत्यू होईल. आमच्यासाठीही आयुष्य संपेल. हा विभाग आमच्यासाठी आयुष्याचे प्रतिनिधित्व करणारा आहे,”  असे रॉयटर्सने मिळवलेल्या रुग्णालयाच्या आत चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये किडनी रुग्ण मेधत एलेवाह म्हणाले.

एलेवाह यांना आठवड्यातून तीन वेळा चार तास डायलिसिसचे उपचार मिळत होते, मात्र आता ते दोन तासच मिळतात.

इस्रायली आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखालील इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावरील आक्रमण सुरू केले ज्यामध्ये सुमारे 1 हजार 200 लोक मारले गेले आणि 251 जणांना ओलिस म्हणून गाझामध्ये आणण्यात आले, असे इस्रायली आकडेवारी सांगते.

गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या दोन वर्षांच्या युद्धामुळे गाझामध्ये 66 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारताचा नवा ग्राहक: महिलांची आघाडी ते नव्या मध्यमवर्गाचा उदय, तज्ज्ञांचे मत
Next articleशटडाऊन दरम्यान ‘डेमोक्रॅटिक एजन्सी’मधील कपातीवर ट्रम्प यांचे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here