इस्रायली हवाई हल्ले सुरू झाल्यापासून लेबनीज ऑफिशियल स्टेट बिल्डिंगवर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यात नगरपालिकेचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे. या हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमधील नबातीह या मुख्य शहराचे महापौर इतर 15 जणांबरोबर ठार झाले.
लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. प्रांतीय राजधानी नबातीह येथे झालेल्या या हल्ल्यात 50 हून अधिक लोक जखमी झाले. हिजबुल्लाह या सशस्त्र गटाविरूद्ध सुरू असणारी इस्रायलची मोहीम आता लेबनॉन राज्याला लक्ष्य करत असल्याचा हा पुरावा आहे असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इस्रायली हल्ल्यांमुळे विस्थापित झालेल्या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने “शहराच्या सेवा आणि मदत परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या बैठकीला इस्रयालने जाणूनबुजून लक्ष्य केले,” असे काळजीवाहू पंतप्रधान नजीब मिकाती यांनी सांगितले.
इस्रायलने गुरुवारी पहाटे सीरियातील भूमध्य सागरी बंदर असलेल्या लाटाकिया शहरावरही हल्ला केला, अशी माहिती सीरियातील सरकारी वृत्तसंस्था सनाने दिली.
सनाने पुढे सांगितले की, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत, तर सीरियन राज्य दूरचित्रवाणीने सांगितले की देशाच्या हवाई संरक्षण दलाने लटाकियावर करण्यात आलेल्या इस्रायली हल्ल्यांचा सामना केला आहे.
युनिफिलच्या मालमत्तेचे नुकसान
लेबनॉनमधील यूएन मिशनने (युनिफिल) सांगितले की त्यांच्या शांती सैनिकांनी बुधवारी सकाळी दक्षिण लेबनॉनच्या कफर केलाजवळील त्यांच्या वॉचटॉवरवर इस्त्रायली रणगाड्यांना मारा करताना पाहिले. या हल्ल्यात दोन कॅमेरे नष्ट झाले असून टॉवरचेही नुकसान झाले, असे युनिफिलने सांगितले.
युनिफिलच्या या विधानावर इस्रायली सैन्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इस्रायलने यापूर्वीच संयुक्त राष्ट्रांना दक्षिण लेबनॉनमधील युनिफिलच्या शांतीरक्षक दलाच्या सदस्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी लढाऊ क्षेत्राबाहेर हलवण्याचे आवाहन केले आहे.
युनिफिलने म्हटले आहे की त्याच्या सैन्यावरही अनेक वेळा इस्रायली हल्ले करण्यात आले आहेत.
हल्ल्यांमध्ये खंड नाही
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी उत्तर इस्रायलच्या सीमेजवळील भेटीदरम्यान सांगितले की, वाटाघाटींना परवानगी देण्यासाठी हिजबुल्लाहवरील हल्ले इस्रायल थांबवणार नाही.
“आम्ही केवळ युद्धाच्या सावटाखालीच वाटाघाटी करू. मी हे पहिल्या दिवशी बोललो, तेच मी ते गाझामध्ये बोललो आणि इथेही मी तेच सांगत आहे,” असे त्यांच्या कार्यालयातून दिलेल्या निवेदनात गॅलंट म्हणाले.
पेंटागॉनचे प्रमुख लॉयड ऑस्टिन यांनी बुधवारी गॅलंटशी संवाद साधला आणि “युनिफिल फोर्सेस आणि लेबनीज सशस्त्र दलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे महत्त्व त्यांच्या कानावर घातले,” असे संरक्षण विभागाने म्हटले आहे.
गाझामधील पॅलेस्टिनी अतिरेकी हमासच्या समर्थनार्थ इराण-समर्थित हिजबुल्लाह या अतिरेकी गटाने सीमापार गोळीबार केल्यावर एक वर्षानंतर इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहला नष्ट करण्यासाठी आपली लष्करी आणि हवाई मोहीम सुरू केली.
अलिकडच्या घडमोडींनुसार इस्रायलने हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्याची हत्या केली आणि दक्षिणेकडील सीमावर्ती शहरांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील हिजबुल्लाहच्या तावडीतून बाहेर काढलेल्या हजारो इस्रायलींना घरी परतणे सुरक्षित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
इस्रायली हल्ल्यांवर अमेरिकेची प्रतिक्रिया
इस्रायलने 3 ऑक्टोबर रोजी हजारो लोकांचे शहर असलेल्या नाबतीहला शहर सोडून जाण्याची सूचना जारी केली. त्यावेळी, शहराचे महापौर अहमद काहिल यांनी मीडियाला सांगितले की ते शहर सोडणार नाहीत.
नाबतीहवर इस्रायली हल्ल्याबद्दल विचारले असता, स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी विशिष्ट हल्ल्यांच्या परिस्थितीवर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, ते म्हणाले की अमेरिकेला हे समजते की हिजबुल्लाह नागरी वस्त्यांसह इतर ठिकाणांहून कार्य करते.त्यामुळे या गटाला लक्ष्य करण्यासाठी आम्ही मर्यादित हल्ल्यांना समर्थन देतो.
“साहजिकच, आम्ही संपूर्ण गावे उद्ध्वस्त झालेली पाहू इच्छित नाही. आम्हाला नागरिकांची घरे उद्ध्वस्त झालेली पाहायची नाहीत,” असे मिलर म्हणाले.
इस्रायलने बुधवारी सांगितले की त्यांनी नाबतीह भागात डझनभर हिजबुल्लाह लक्ष्यांवर आणि त्यांच्या नौदलाने दक्षिण लेबनॉनमध्ये डझनभर लक्ष्यांवर हल्ला केला
इस्रायलच्या सीमेजवळील एका शहराच्या मध्यभागी हिजबुल्लाहच्या एलिट रडवान फोर्सेसद्वारे वापरलेले टनेलचे जाळे “उध्वस्त” केले आहे. याशिवाय इमारतींच्या क्लस्टरला हादरवून टाकणाऱ्या स्फोटांचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले की ते म्हैबीबचे छोटे शहर आहे.
हल्ल्यांना पुन्हा सुरूवात
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बुधवारी बैरुतच्या दक्षिणेकडील उपनगरांवरही हल्ले केले. 10 ऑक्टोबरनंतर झालेल्या या पहिल्या हल्ल्यात शहराच्या मध्यभागी दोन ठिकाणे लक्ष्य केली गेली. यात 22 लोक मारले गेले. याशिवाय दाट लोकवस्तीच्या परिसरात मोठमोठ्या इमारती कोसळल्या.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमधील इस्रायली कारवायांमध्ये गेल्या वर्षभरात किमान 2 हजार 350 लोक मारले गेले आहेत आणि 1.2 दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
यूएन म्हणते की देशाचा एक चतुर्थांश भाग निर्वासन आदेशाखाली आहे. टोलमध्ये नागरिक आणि लढवय्ये यांच्यात फरक केला जात नाही परंतु त्यात शेकडो महिला आणि मुले यांचाही समावेश आहे.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, त्याच कालावधीत सुमारे 50 इस्रायली सैनिक आणि नागरिक दोघेही मारले गेले आहेत.
इस्रायलची यूएन शांतीरक्षकांबाबत प्रतिक्रिया
सशस्त्र सैनिकांना सीमावर्ती भागापासून दूर ठेवण्याच्या मिशनमध्ये युनिफिल अपयशी ठरल्याचा दीर्घकाळ आरोप करत, इस्रायलने बुधवारी अधिक सलोख्याचा सूर लावला.
“इस्रायल राज्य युनिफिलच्या पुढाकाराला खूप महत्त्व देते आणि संस्था किंवा तिच्या कर्मचाऱ्यांना हानी पोहोचवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही,” असे परराष्ट्रमंत्री इस्रायल कॅटझ यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
10 हजार बलवान शांतीरक्षक दलात 2 हजार 500इटालियन, फ्रेंच आणि स्पॅनिश सैनिकांसह 50 देशांच्या तुकड्यांचा समावेश आहे, त्यामुळे इस्रायल आणि त्याच्या काही प्रमुख युरोपियन मित्र राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)