
पश्चिम किनाऱ्याजवळील (वेस्ट बँक) एका गावातून, 10 भारतीय बांधकाम कामगारांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. या कामगारांना एक महिन्याहून अधिक काळ तिथे ठेवण्यात आले होते.
लोकसंख्या आणि इमिग्रेशन प्राधिकरणाने, द टाईम्स ऑफ इस्रायलला सांगितले की, “पॅलेस्टिनी लोकांनी 10 भारतीय कामगारांना काम देण्याचे आश्वासन देऊन, वेस्ट बँक जवळील अल-झायेम या गावात आणले होते आणि नंतर त्यांचे पासपोर्ट काढून घेतले आणि त्यांचा वापर करून इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.”
आयडीएफ (IDF) आणि न्याय मंत्रालयासह प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या वेळी केलेल्या एका कारवाईदरम्यान, या बंधक कामगरांची सुटका करण्यात आली. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याचे समजते.
द टाईम्स ऑफ इस्रायलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, “आयडीएफने पासपोर्टच्या गैरवापारचा पर्दाफाश केला आणि ओळख पटवून घेत सर्वांना त्यांचे पासपोर्ट परत केले.”
7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासच्या हल्ल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. तेव्हा निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी इस्रायली सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, गेल्यावर्षी भारतातून सुमारे 16 हजार कामगार इस्रायलमध्ये आले असल्याचे, वृत्तपत्राने म्हटले आहे.
इस्रायलमधील भारतीय दूतावासाकडून पुष्टी
इस्रायलमधील भारतीय दूतावासाने या घटनेची पुष्टी करत X वर लिहिले की: “इस्रायली अधिकाऱ्यांनी 10 बेपत्ता भारतीय बांधकाम कामगारांना पश्चिम किनाऱ्यावरुन सुखरुप सोडवले आणि त्यांना इस्रायलमध्ये परत आणले.”
“हे प्रकरण जरी अद्याप तपास प्रक्रियेत असली तरी, भारतीय दूतावास इस्रायली अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, कामगारांची सुरक्षा आणि तब्येत सुनिश्चित करण्याची विनंती करत आहे.”
ट्रम्प यांचा हमासला अंतिम इशारा
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझावर नियंत्रण ठेवणाऱ्या गट हमाससोबत, अमेरिकन बंधकांच्या मुक्ततेसाठी चर्चा केली असून, पॅलेस्टिनियन सैन्य गटाने त्यांचे पालन न केल्यास “त्यांना नरक यातना भोगाव्या लागलीत” असा गंभीर इशारा दिला असल्याचे, मीडिया अहवालात म्हटले आहे.
बुधवारी ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे, हमासकडून बंधकांची मुक्तता आणि चालू संघर्षात मरण पावलेल्यांचे मृतदेह परत करण्याची करण्याची मागणी केली.
“सर्व बंधकांना त्वरित मुक्त करा, उशीर नको आणि तुम्ही ज्यांना मारले त्यांचे मृतदेहसुद्धा ताबडतोब परत करा, नाहीतर परिणामांना तयार रहा,” असा इशारा ट्रम्प यांनी पोस्टद्वारे दिला आहे.
ज्यादिवशी अमेरिकन अधिकाऱ्यांनी हमाससोबत चर्चा केली होती, त्यादिवशी ट्रम्प यांनी हा धमकीवजा इशारा दिला होता.
व्हाइट हाऊसने याची पुष्टी केली असून, वॉशिंग्टन हमाससोबत चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.
“हे चालू प्रक्रियेतील संवाद आहेत. मी ते येथे तपशीलवार सांगणार नाही. अमेरिकन नागरिकांचा जीव धोक्यात आहे,” असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी, ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.
“राष्ट्रपतींनी वेळोवेळी सिद्ध केले आहे की, जगभरातील लोकांशी संवाद साधणे हे कायमच त्यांच्या हिताचे ठरले आहे आणि मला खात्री आहे की ते अमेरिकन लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करतील,” असे लेव्हिट म्हणाल्या.
अहवालांनुसार, हमासने 2006 मध्ये गाझावर आपला वेढा टाकल्यानंतर 59 लोकांना बंधक बनवले होते, ज्यापैकी आता फक्त 22 बंधक जिवंत आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS इनपुट्ससह)