हमासने गुरूवारी इस्रायलकडे परत पाठवलेल्या मृतदेहांपैकी एक मृतदेह गाझामध्ये ठेवण्यात आलेल्या कोणत्याही ओलिसाचा नाही असे इस्रायलच्या सैन्याने शुक्रवारी सांगितले. तसेच या गटाने आधीच नाजूक बनलेल्या युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचाही आरोप केला.
दोन मृतदेहांची ओळख पटली
अपहरण झाले त्यावेळी नऊ महिन्यांचा असलेला कफीर बिबास आणि त्याचा चार वर्षांचा भाऊ एरियल अशी पटली असली तरी तिसरे शव त्यांची आई शिरीचे असावे असे मानले जात असले तरी त्याची ओळख कोणत्याही ओलिसाशी जुळत नसल्याचे आढळून आले आणि म्हणूनच ही ओळख अद्याप अज्ञात आहे असे लष्कराने सांगितले.
“हमास या दहशतवादी संघटनेने कराराचे अत्यंत गंभीर उल्लंघन केले आहे, करारानुसार चार मृत ओलिसांना परत करण्यास ते बांधील आहेत,” असे शिरी आणि सर्व ओलिसांना परत करण्याची मागणी करत लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.
ओलिस ठेवलेल्या ओडेड लाइफशिट्झच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्याच्या मृतदेहाची औपचारिक ओळख पटली आहे.
हमासकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नेतान्याहू यांचा सूड घेण्याचा निर्धार
7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात अपहरण झालेल्यांपैकी सर्वात लहान असलेल्या कफीर आणि एरियलसह चार ओलिसांचे अवशेष इस्रायलला परत न पाठवल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासवर सूड उगवण्याचे वचन दिले होते.
कडेकोट बंदोबस्तात सार्वजनिक ठिकाणी चार काळ्या शवपेट्या हमासने इस्रायलला दिल्या. पॅलेस्टिनी लोकांची गर्दी आणि डझनभर सशस्त्र हमास अतिरेकी त्यावेळी तिथे उपस्थित होते. या गंभीर घटनेचा तमाशा केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी निषेध केला.
अमेरिकेच्या पाठिंब्याने आणि कतार तसेच इजिप्तच्या मध्यस्थीने गेल्या महिन्यात झालेल्या गाझा युद्धविराम कराराअंतर्गत दोन लहान मुले, त्यांची आई आणि लाइफशिट्झ यांचे मृतदेह इस्रायलला देण्यात आले.
इस्रायलचे शोकसंदेश
शवपेट्या घेऊन ताफा जात असताना आदरांजली वाहण्यासाठी इस्रायली लोकांनी गाझा सीमेजवळ भर पावसात रस्त्यावर रांगा लावल्या.
“आम्ही येथे तुटलेल्या अंतःकरणाने एकत्र उभे आहोत. आकाशही आमच्याबरोबर रडत आहे आणि चांगले दिवस दाखवण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत,” अशी भावना एफ्राट या स्त्रीने व्यक्त केली.
तेल अवीवमध्ये, होस्टेजेस स्क्वेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलच्या संरक्षण मुख्यालयासमोरील सार्वजनिक चौकात काही लोक रडत जमले.
“संताप. वेदना होतात. शब्दच उरले नाहीत. आपली अंतःकरणे-संपूर्ण राष्ट्राची अंतःकरणे-भग्नावस्थेत आहेत,” असे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग म्हणाले.
हमासचा पाडाव करा
ओलिसांचे अवशेष ताब्यात घेतल्यानंतर जारी केलेल्या रेकॉर्डेड भाषणात, नेतान्याहू यांनी हमासचा नायनाट करण्याचे वचन दिले, ते म्हणाले की या “चार शवपेट्यां” नी इस्रायलला 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची पुनरावृत्ती होणार नाही याची “पूर्वीपेक्षा अधिक” खात्री करण्यास भाग पाडले.
ते म्हणाले, “आमच्या प्रियजनांचे रक्त जमिनीवरून आमच्यावर ओरडत आहे आणि आम्हाला घृणास्पद मारेकऱ्यांशी तडजोड करण्यास भाग पाडत आहे आणि आम्ही ते करू.”
16 महिन्यांच्या संघर्षादरम्यान, इस्रायली अधिकाऱ्यांनी वारंवार ठामपणे सांगितले आहे की हमासचा नाश केला जाईल आणि ऑक्टोबर 2023 मध्ये हमासच्या नेतृत्वाखाली इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान अपहरण झालेल्या अंदाजे 250 ओलिसांना मायदेशी परत पाठवले जाईल.
गुरुवारी हस्तांतराच्या वेळी, एक दहशतवादी इस्त्रायली झेंड्यांमध्ये गुंडाळलेल्या शवपेट्या दर्शविणाऱ्या पोस्टरच्या बाजूला उभा होता. त्यात ‘द रिटर्न ऑफ द वॉर = द रिटर्न ऑफ युअर प्रिजनर्स इन कॉफिन्स’ असे लिहिले होते.
संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख गुटेरेस यांनी “आज सकाळी मृतदेहांची निघालेली मिरवणूक आणि मृत ओलिसांच्या शवपेट्यांचे प्रदर्शन बघितले, जे अत्यंत घृणास्पद आणि भयावह असून त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे असे गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले.
ते म्हणाले की, अशा प्रकारांमध्ये मृतदेह कशाप्रकारे सुपूर्द केला जाणे आवश्यक आहे ज्यामुळे “मृतांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानाचा आदर केला जाईल”, याबद्दल आंतरराष्ट्रीय कायदा गरजेचा आहे.
प्रतीक
गाझाजवळील हमासच्या नेतृत्वाखालील हल्लेखोरांनी काबीज केलेल्या समुदायांपैकी एक असलेल्या किबुट्झ निर ओझ येथून वडील यार्डन यांच्यासह बिबास कुटुंबाचे अपहरण करण्यात आले तेव्हा काफिर बिबास नऊ महिन्यांचा होता.
नोव्हेंबर 2023 मध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात कुटुंबातील दोन मुले आणि त्यांची आई ठार झाल्याचे हमासने जाहीर केले. मात्र इस्रायली अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नव्हता.
“शिरी आणि मुले हे एक प्रतीक बनले,” असे निर ओझ किबुट्झचे यिफ्ताच कोहेन म्हणाले. हमास हल्ल्यादरम्यान या गावाने सुमारे एक चतुर्थांश रहिवासी गमावले. ते एकतर मारले गेले किंवा त्यांचे अपहरण केले गेले. या महिन्यात कैद्यांच्या बदल्यात यार्डन बिबासला जिवंत परत पाठवण्यात आले.
लिफशिट्झ 83 वर्षांचा असताना त्यांचे निर ओझ येथून अपहरण करण्यात आले. त्यावेळी त्यांची 85 वर्षीय पत्नी योचेवेद हिला त्यांच्यासोबत पकडण्यात आले. मात्र दोन आठवड्यांनंतर दुसऱ्या महिलेसह तिची सुटका करण्यात आली.
लिफशिट्झ एक माजी पत्रकार होते आणि जानेवारी 2019 मध्ये डाव्या बाजूने झुकलेल्या हारेट्झमधील एका ओप-एडमध्ये त्यांनी नेतान्याहू यांचे धोरणात्मक अपयश कुठे कुठे दिसून आले याची भली मोठी यादी दिली होती.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)