एक्सवर (ट्विटर) शेअर केलेल्या पोस्टमध्ये जयशंकर यांनी लिहिले, “रिओ येथे जी-20 शिखर परिषदेच्या वेळी सीपीसी पॉलिटब्युरो सदस्य आणि चीनचे एफएम यी यांची भेट घेतली. आम्ही भारत-चीन सीमा भागातून अलिकडेच सैन्य माघार घेण्याच्या प्रगतीची दखल घेतली. आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील पुढील भूमिकेबाबत विचारांची देवाणघेवाण केली. जागतिक परिस्थितीवरही चर्चा झाली.”
On the sidelines of the G20 Summit in Rio, met CPC Politburo member and FM Wang Yi of China.
We noted the progress in the recent disengagement in the India-China border areas. And exchanged views on the next steps in our bilateral ties.
Also discussed the global situation. pic.twitter.com/fZDwHlkDQt
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 19, 2024
दोन्ही देश त्यांच्या सामायिक सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी आणि गुंतागुंतीच्या जागतिक परिदृश्यात द्विपक्षीय संबंध वाढवण्याचे मार्ग शोधण्यावर काम करत असताना ही बैठक पार पडली आहे.
तसेच प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांमधील “अधिक परस्पर विश्वास आणि कमी संशय” दाखवण्याच्या गरजेबद्दलही चर्चा झाली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
“आपण अधिक सकारात्मक संकेत दिले पाहिजेत आणि दोन्ही देशांमधील देवाणघेवाणीसाठी अनुकूल अशा अधिक गोष्टी केल्या पाहिजेत; परस्पर विश्वास वाढवला पाहिजे आणि संशय कमी केला पाहिजे”, असे यी म्हणाले.
पत्रकारांची देवाणघेवाण आणि व्हिसा सुलभ करण्यासाठी सहकार्य वाढवण्याचे आवाहनही यी यांनी भारताला केले आहे.
“जी-20 च्या निमित्ताने भेटणे खूप चांगले आहे. अलीकडेच ‘ब्रिक्स “च्या निमित्ताने देखील आम्ही एकमेकांना भेटलो. दोन्ही व्यासपीठांवरील आमचे योगदान परिणामांना आकार देण्यात उल्लेखनीय होते परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या दोन्ही देशांचे महत्त्व आम्हाला आठवण करून देणारे होते,” असे जयशंकर नंतर म्हणाले.
जयशंकर यांनी रशियाच्या कझानमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या संवादाची आठवण करून देत ते म्हणाले, “21 ऑक्टोबरचा करार लक्षात घेऊन आमच्या संबंधांमध्ये पुढील पावले उचलण्यासाठी आमच्या नेत्यांमध्ये कझान येथे एकमत झाले. मला हे सांगताना आनंद होत आहे की, त्या सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी नियोजित योजनेनुसार झाली आहे. आमच्या नेत्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना आणि विशेष प्रतिनिधींना लवकरात लवकर भेटण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दिशेने काही प्रगती झाली आहे, काही चर्चा झाली आहे. आज मी तुमच्याशी पुढील भूमिकेबाबत चर्चा करण्यास उत्सुक आहे.”
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल यी यांच्या हवाल्याने एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित केली गेली. निवेदनात म्हटले आहे की, “एस. जयशंकर यांनी नमूद केले की कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये भारत-चीन संबंधांच्या स्थिर विकासाला चालना देण्यासाठी एकमत झाले. हे एकमत अंमलात आणण्यासाठी आणि सकारात्मक प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही बाजू पावले उचलत आहेत हे पाहून मला आनंद झाला आहे.”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जयशंकर म्हणाले, “संबंधित संवाद यंत्रणा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची आणि वाढीव संवादाद्वारे संबंध सुधारण्याची गती कायम राहिल याची भारताला आशा आहे. भारत आणि चीनमधील एकमत हे त्यांच्या मतभेदांपेक्षा खूप जास्त आहे. दोन्ही बाजूंनी धोरणात्मक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे, अधिक सकारात्मक दृष्टिकोनासह समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि एकूण संबंध परिभाषित करण्यासाठी विशिष्ट मतभेदांना परवानगी दिली जाऊ नये.”
आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि भारत चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थैर्य आणण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांना या प्रतिक्रिया अधोरेखित करतात.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) समस्यांचे निराकरण झाले असून, आता तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे जयशंकर यांनी सांगितल्यानंतर केवळ दोन दिवसांनीच त्यांची यी यांच्याशी बैठक झाली. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी यावर भर दिला की, सैन्य माघारीच्या अंतिम फेरीनंतर भारत-चीन संबंधांमध्ये काही सुधारणा होण्याची अपेक्षा करणे ‘वाजवी’ आहे. मात्र याबाबत सावधगिरी व्यक्त करताना त्यांनी नमूद केले की, द्विपक्षीय संबंधांमध्ये संपूर्ण पुनर्रचना सुचवणे काहीसे घाईचे ठरेल.
रवी शंकर