एस. जयशंकर आणि वांग यी यांची भेट; LAC वरील तणावाबाबत चर्चा

0

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वांग यांना सांगितले की, “भारत-चीन संबंध सामान्य ठेवण्यासाठी, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) वर शांतता आणि स्थैर्य टिकून राहणे आवश्यक असून, तिथल्या सैन्याने “माघार घेण्याची प्रक्रिया” गतीमान होण्याची गरज आहे.”

वांग यी, हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. नवी दिल्लीत त्यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, “सीमावर्ती भागातील परिस्थिती स्थिर झाल्यावरच द्विपक्षीय संबंधांना “सकारात्मक गती” मिळू शकते.” ते वांग यांना म्हणाले की, “ही भेट आपल्याला द्विपक्षीय संबंधांचे पुनरावलोकन करण्याची संधी देते. जागतिक परिस्थिती आणि काही परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

2020 च्या, गलवान खोऱ्यातील संघर्षात 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते, ज्यानंतर नवी दिल्ली आणि बीजिंगमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये, दोन्ही बाजूंनी दोन वादग्रस्त ठिकाणांवरून आपापले सैन्य मागे घेतले असले तरी, तणाव कमी करण्याची आणि अखेरीस सैन्य पूर्णपणे मागे घेण्याची मोठी प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे, अजूनही पूर्व लडाखमध्ये 50 ते 60 हजार सैनिक तैनात आहेत.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा, जयशंकर यांनी वांग यांच्याकडे हा मुद्दा मांडला आहे. जुलैमध्ये बीजिंगमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत, जयशंकर यांनी यावर भर दिला होता की, “तणाव कमी करण्यासह, सीमेशी संबंधित इतर पैलूंवर लक्ष देणे आपल्यासाठी आवश्यक आहे.” सोमवारी, नवी दिल्लीत पुन्हा एकदा त्यांनी यावर प्रकाश टाकला. “भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कठीण काळ गेला आहे. आता दोन्ही देश पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन्ही बाजूंनी प्रामाणिक आणि विधायक दृष्टिकोन आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

सीमा सुरक्षेसोबतच, दोन्ही मंत्र्यांनी व्यापार, कनेक्टिव्हिटी, नदी-माहितीची देवाणघेवाण, लोकांमधील संवाद आणि आर्थिक सहकार्य यावरही चर्चा केली. भविष्यातील संवाद हा “तीन परस्पर तत्त्वांनी” (Three mutuals) – परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हित (Mutual respect, mutual sensitivity, and mutual interest), यांनी निर्देशित असला पाहिजे, असे जयशंकर म्हणाले.

वांग यी यांची ही भेट, मंगळवारी होणाऱ्या विशेष प्रतिनिधी (SR) स्तरावरील 24 व्या फेरीच्या चर्चेआधी झाली असून, ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) तणावाच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील, त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटतील. ही भेट, मोदींच्या आगामी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेतील उपस्थितीसाठी दिशादर्शक मानली जात आहे.

गलवान संघर्षानंतर चिनी परराष्ट्र मंत्र्याची ही पहिलीच भारत भेट आहे. रशियाच्या काझान येथे, ऑक्टोबर 2024 मध्ये, मोदी यांची अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे तात्पुरते प्रयत्न दिसून येत आहेत.

गेल्या वर्षभरात, दोन्ही देशांमध्ये तांत्रिक पातळीवरील संवाद सुरू राहिला असला तरी, वांग यांचा भारत दौरा हा चीनकडून राजकीय संवाद पुन्हा सुरू करण्याचा संकेत मानला जात आहे. भारतानेही चीनसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करणे, कैलास मानसरोवर यात्रेची सुरुवात करणे आणि 2020 पासून बंद असलेल्या व्यावसायिक उड्डाणांबाबत चर्चा सुरू करण्यास तयारी दर्शवणे, हे द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे संकेत आहेत.

तथापि, खरी कसोटी ही आहे की, दोन्ही देश एलएसीवरील सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी (de-escalation) कितपत प्रगती करतात. सध्या तरी, LAC वरील विश्वास निर्मिती प्रक्रियेवरच द्विपक्षीय संबंधांची दिशा अवलंबून आहे.

मूळ लेखिका – हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleJaishankar to Wang Yi: LAC Troop De-escalation Must Move Forward
Next articleभारत–बांगलादेश मैत्रीचा ‘सुवर्ण अध्याय’, पुन्हा लिहिला जाऊ शकतो का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here