लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या अनेक वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान एकीकडे शर्थीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे मृतांची संख्या 10 वर पोहोचली असून सुमारे 10 हजार वास्तू या प्राणघातक आगीत भस्मसात झाल्या आहेत, गुरुवारीच्या तिसऱ्या रात्रीपर्यंत आणखी पाच आगी लागल्या असून, कोरड्या वाऱ्यांमुळे ही आग आणखी भडकली आहे.शहराच्या पश्चिमेकडील बाजूस सांता मोनिका आणि मालिबू यांच्यातील पॅलिसेड्स आग आणि पासाडेनाजवळील पूर्वेकडील ईटन आग ही लॉस एंजेलिसच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक आहे. यात 34 हजार एकरपेक्षा (13 हजार 750 हेक्टर) जास्त किंवा सुमारे 53 चौरस मैल परिसरातील परिसर भस्मसात झाला असून संपूर्ण परिसरात राखेचे साम्राज्य दिसून येत आहे.
मृतांचा आकडा वाढला
लॉस एंजेलिसच्या जंगलातील वणव्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 10 वर पोहोचली आहे, असे लॉस एंजेलिस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षकाने गुरुवारी उशिरा सांगितले.
लॉस एंजेलिस काउंटीचे शेरीफ रॉबर्ट लुना यांनी आधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.
“या भागात जणूकाही अणुबॉम्ब टाकला आहे असे वाटते. मला चांगल्या बातमीची अपेक्षा नाही आणि आम्ही कमी आकड्यांची अपेक्षा करत नाही,” असे लूनाने सांगितले.
खाजगी हवामानअंदाजक AccuWeather ने लॉस एंजेलिसमधील सर्वात भीषण वणव्यांमुळे 135 अब्ज ते 150 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे, हे नुकसान भरून काढणे अशक्य असून घरमालकांच्या विमा खर्चात होणारी वाढ दाखवणारी आहे.
“लॉस एंजेलिस शहराची लवकरात लवकर पुनर्बांधणी करण्यासाठी आम्ही कंबर कसून तयार आहोत,” असे डेमोक्रॅटच्या महापौर कॅरेन बास म्हणाल्या. ही आपत्ती चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल बास यांना नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर रिपब्लिकनकडून टीकेचा सामना करावा लागला आहे.
मंगळवारी राष्ट्रीय आणिबाणी घोषित करणारे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी आश्वासन दिले की फेडरल सरकार पुढील 180 दिवसांमध्ये भरपाईची 100 टक्के परतफेड करेल, जेणेकरून वणव्यातील अवशेष आणि इतर धोकादायक साहित्य काढून टाकणे, तात्पुरते निवारे आणि मदतकर्त्यांचे वेतन देता येईल.
व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ सल्लागारांच्या भेटीनंतर बायडेन म्हणाले, “मी राज्यपालांना, स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांना जे करावे लागेल ते करण्यासाठी आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी खर्चाचा कोणताही विचार करू नका.
लॉस एंजेलिस काउंटीमध्ये एकूण पाच वणवे लागले असून पॅलिसेड्सची सर्वात मोठी आग फक्त 6 टक्के आटोक्यात आली आणि ईटनच्या आगीवर अजून कोणत्याही प्रकारे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग लागलेल्या टेकड्यांवर अग्निरोधन आणि पाणी सोडणाऱ्या विमानांनी आकाशात गर्दी झाली होती.
एल. ए. काउंटी अग्निशमन विभागाने सांगितले की, कॅनडाकडून कर्जावर घेतलेल्या एका मोठ्या सुपर स्कूपर विमानाचे पॅलिसेड्स आगीजवळ अनधिकृत नागरी ड्रोनला धडक दिल्यानंतर नुकसान झाले आणि ते जमिनीवर उतरवण्यात आले. यात कोणतीही दुखापत झाली नाही.
अमेरिकेतील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आणि असंख्य सेलेब्रिटी व्यक्तींचे घर असलेल्या कॅलबाससजवळ गुरुवारी वेगाने वाढणारी आग लागली. तथाकथित केनेथ वणवा काही तासांत 960 एकरपर्यंत (388 हेक्टर) पर्यंत विस्तारला.
या सगळ्या गडबडीत लॉस एंजेलिस काउंटीने चुकून 96 लाख लोकांना परिसर सोडण्याची सूचना पाठवली. मात्र ती फक्त केनेथ वणवा क्षेत्रातील नागरिकांसाठी होती. त्यामुळे आवश्यक दुरुस्ती लगेच करण्यात आली.
आम्ही जिवंत आहोत
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ईटन वणव्यामुळे 4 ते 5 हजार इमारतींचे नुकसान झाले आहे किंवा त्या नष्ट झाल्या आहे, तर पॅलिसेड्स वणव्यात आणखी 5 हजार 300 बांधकामे नष्ट झाली आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे.
पॅसिफिक वणवा लागलेल्या भागातील काही रहिवाशांनी आग लागलेल्या भागात परत जाण्याचा प्रयत्न केला, जिथे जळालेला कचरा आणि जळलेल्या वाहनांसोबत आता केवळ विटांच्या चिमण्या उभ्या आहेत.
‘आम्ही जिवंत आहोत. आणि तेवढेच महत्त्वाचे आहे,” खाजगी सुरक्षा रक्षक बिलाल तुखी त्याच्या मालकाच्या खराब झालेल्या घराबाहेर पहारा देताना म्हणाला, की हे दृश्य त्याला त्याच्या मूळ, युद्धग्रस्त अफगाणिस्तानची आठवण करून देते.
दूषित हवेमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे अधीक्षक अल्बर्टो कार्व्हाल्हो यांनी सांगितले.
आठवड्याच्या सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग गुरूवारी 100-मैल-प्रति-तास (160-किमी प्रतितास) इतका कमी झाला. ज्यामुळे जमिनीवरील कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण हवाई मदत मिळणे शक्य झाले.
मात्र रात्रभरात वाऱ्याची तीव्रता पुन्हा वाढली आणि शुक्रवारी दुपारपर्यंत लाल बावट्याची स्थिती (म्हणजे अति धोकादायक) अपेक्षित होती.
ईटन वणवा माउंट विल्सन वेधशाळेच्या मैदानावर पोहोचला, जिथे एका शतकापूर्वी एडविन हबलने आकाशगंगेच्या पलीकडे आकाशगंगेचे अस्तित्व शोधले आणि विश्वाचा पसारा विस्तारला. आग नियंत्रणात असल्याचे वेधशाळेने नंतर स्पष्ट केले.
जवळच्या वांशिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण समुदाय असलेल्या अल्ताडेनामध्ये, अनेक रहिवाशांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांना चिंता आहे की सरकारी मदत ए-लिस्टर्समध्ये लोकप्रिय असलेल्या उच्च-प्रोफाइल क्षेत्रांकडे वळवली जाईल, तर विमा कंपन्या कमी श्रीमंत कुटुंबांकडे दुर्लक्ष करू शकतात ज्यांच्याकडे आगीच्या दाव्यांचा सामना करण्यासाठी आर्थिक साधने नाहीत.
“ते तुम्हाला तुमच्या घराचे योग्य मूल्य देणार नाहीत. जर त्यांनी तसे केले तर तुम्हाला त्यासाठी खरोखरच संघर्ष करावा लागेल,” असे 63 वर्षीय के यंगने, तिच्या कुटुंबाच्या पारंपरिक घराच्या अवशेषांकडे आणि निघणाऱ्या धूराकडे पाहत अश्रू ढाळत म्हटले.
हॉलिवूडमधील आग आटोक्यात
बुधवारी रात्री हॉलीवूड बुलेवार्डच्या वॉक ऑफ फेमकडे पाहत असलेल्या पर्वतरांगांवर आगीच्या ज्वाळा पसरल्यानंतर अग्निशमन दलाला हॉलीवूड हिल्समधील सनसेट फायरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये, एकेकाळी महालासारखी असणारी घरे भग्नावस्थेत उभी होती, तर कोसळलेल्या विजेच्या तारा आणि सोडून दिलेल्या गाड्या रस्त्यांवर विखुरलेल्या होत्या.
65 वर्षीय जॉन कार नावाच्या एका रहिवाशाने सांगितले की त्याने तो भाग सोडून जाण्याच्या आदेशांचे उल्लंघन केले आणि आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी तो तिथेच थांबला.
“हे घर माझ्या आई वडिलांनी 1960 मध्ये बांधले होते आणि मी माझे संपूर्ण आयुष्य इथेण व्यतीत केले, त्यामुळे इथे अनेक आठवणी आहेत. आणि मला वाटते की घर वाचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले तर त्यांचेही ऋण आहे.
“कार म्हणाला की त्याच्या शेजाऱ्यांच्या घरांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात त्याला मदत करण्यासाठी अग्निशमन दल तिथे नव्हते.”
“जर त्यांच्याकडे अग्निशामक दलाच्या काही गाड्या असत्या आणि त्यांनी येथे फक्त एक स्क्वर्ट ठेवला असता, आणि सगळ्या परिस्थितीवर गोष्टींवर लक्ष ठेवले असते, तर ही सर्व घरे आता सुरक्षित राहिली असती.”
अधिकाऱ्यांनी सांगितले की परिसर सोडण्याच्या आदेशांमुळे प्रभावित झालेल्या भागात संचारबंदी लागू करण्यासाठी ते काम करत आहेत.
आकाशातून घेण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सपाट घरांच्या ओळी दिसून आले, तर उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये दोन सर्वात मोठ्या आगीमुळे शहराभोवती एक पिन्सर तयार होत असल्याचे आणि प्रशांत महासागरावर उडून जाणाऱ्या आगीतून निघणाऱ्या धुराचे दाट ढीग दिसून आले.
या भागातील वणव्यात होरपळून गेलेल्यांमध्ये चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध व्यक्तींची घरे होती.
जगभरातील आपत्तीग्रस्तांना मोफत अन्न पुरवण्यासाठी ओळखले जाणारे स्पेनचे शेफ जोस आंद्रेस यांनी पॅसिफिक कोस्ट हायवेवरील पॅलिसेड्स फायरजवळ फूड ट्रक उभारला.
“श्रीमंत असो वा नसो, गरीब असो वा नसो, या क्षणी प्रत्येकाला आधार आणि प्रेमाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
अभिनेत्री जेमी ली कर्टिसने गुरुवारी सांगितले की तिचे कुटुंब मदतकार्यासाठी 10 लाख डॉलर्स दान करणार आहे.
अमेरिकन फेडरल कर्मचारी आणि सामुग्री व्यतिरिक्त अमेरिकेतील इतर अर्धा डझन राज्ये आणि कॅनडातील अग्निशामक दल कॅलिफोर्नियाला रवाना केले जात होते.
“आमच्या अमेरिकन शेजाऱ्यांसाठीः कॅनडा मदतीसाठी येथे आहे,” असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो म्हणाले. स्वतःच्या देशातील जंगलात लागलेल्या भयानक वणव्याचा अनुभव कॅनडानेही घेतला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
9 जानेवारी 2025 रोजी अल्टाडेना येथील वणव्याचे दृश्य. (रॉयटर्स/रिंगो चियु)