टांझानियातील निदर्शनांसाठी विरोधी पक्ष नेते, पत्रकारांना अटक

0
टांझानियातील
टांझानियातील चॅडेमा या मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष फ्रीमन म्बोवे यांना 23 सप्टेंबर 2024 रोजी दार एस सलामच्या मॅगोमेनी भागात अपहरण आणि हत्यांच्या मालिकेचा निषेध करण्यासाठी आयोजित निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (इमॅन्युएल हर्मन/रॉयटर्स)

टांझानियातील व्यावसायिक राजधानी दार एस सलाममध्ये केली जाणारी सरकारविरोधी निदर्शने थांबवण्यासाठी टांझानियाच्या पोलिसांनी सोमवारी पुन्हा तीन विरोधी पक्षनेत्यांना अटक केली. चॅडेमा या मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष फ्रीमन म्बोवे यांना निदर्शने करताना रस्त्यातून ताब्यात घेण्यात आले, तर सरकारी टीकाकारांच्या कथित हत्या आणि अपहरणांच्या विरोधात निदर्शनांचे आयोजन करण्याच्या तयारीत असताना म्बोवे यांचे सहकारी टुंडू लिसू यांना त्यांच्या घरातून उचलण्यात आले.
चॅडेमा पक्षाने सोमवारी नंतर सांगितले की पोलिसांनी दार एस सलाम येथील त्यांच्या दोन कार्यालयांमधील आणखी एक वरिष्ठ अधिकारी आणि पक्षाचे असंख्य सदस्य, कर्मचारी तसेच सुरक्षारक्षकांना अटक केली.


याशिवाय मवानांची कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि ईस्ट आफ्रिका टीव्ही यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी निदर्शनांचे वार्तांकन करणाऱ्या त्यांच्या तीन पत्रकारांनाही ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली, असे दोन्ही कंपन्यांनी सांगितले. त्यांना का अटक करण्यात आली याचे कोणतेही कारण पोलिसांकडून देण्यात आलेले नाही.

यावरील प्रतिक्रियेसाठी पोलिस दलाकडून कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका आणि 2025 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहु हसन यांचे सरकार विरोधकांना लक्ष्य करीत आहे, असे हक्क प्रचारकांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सांगितले की, निदर्शनांच्या आयोजनाची बंदी असूनही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल एमबोवे आणि लिसूसह 14 जणांना अटक करण्यात आली.

सोमवारी उशिरा, पोलिसांनी म्बोवे, लिसु आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते गोबलेस लेमा आणि बेन्सन किगैला यांची जामिनावर सुटका केली, असे चॅडेमाने आपल्या एक्स खात्यावर सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्या आरोपांखाली न्यायालयीन कारवाई करण्याची योजना आखली आहे हे चॅडेमाने स्पष्ट केलेले नाही.

पक्षाने सांगितले की म्बोवे यांची सुटका झाली असली तरी त्यांच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या इतरांच्या सुटकेची वाट बघत ते पोलिस स्टेशनवरच थांबले होते.

हसनच्या सरकारने यापूर्वी असे जाहीर केले होते की ते लोकशाहीचे रक्षण करतील आणि कोणतीही क्रूरता सहन करणार नाहीत. मात्र सोमवारी घडलेल्या प्रकारानंतर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

चॅडेमाने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एमबोवे जेव्हा शांततामय मार्गाने निषेध मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आले तेव्हा त्यांना शहराच्या मागोमेनी भागात अटक करण्यात आली. तर दुसरीकडे 11 वाहनांच्या एका ताफ्याने लिस्सू यांना उचलले आणि त्यांना कुठे नेले जात आहे याबाबत काहीही माहिती दिली नाही.

गेल्या महिन्यात शेकडो समर्थकांसह या जोडीला थोड्या काळासाठी अटक करण्यात आली होती. 2016 मध्ये लिसू यांच्यावर 16 गोळ्या झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला होता. सुदैवाने ते यातून बचावले.

या महिन्याच्या सुरुवातीला, एका ज्येष्ठ विरोधी पक्ष नेत्याचे बसमधून अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडला. तपासाअंती त्यांना मारहाण करण्यात आल्याचे तसेच त्यांच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्यात आल्याचे सिद्ध झाले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleइस्रायलच्या हवाई हल्ल्यांत 492 जणांचा मृत्यू, दशकातील सर्वात भीषण दिवस
Next articleChina Unveils Broad Stimulus Measures To Revive Economy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here