मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी हमास नेता इस्माईल हनियेह याच्या हत्येविषयीची आपली फेसबुक पोस्ट काढून टाकल्यानंतर गुरुवारी मेटा प्लॅटफॉर्मवर भ्याडपणाचा आरोप केला.
मुस्लिम बहुसंख्याक असलेला मलेशिया हा पॅलेस्टिनचा मोठा समर्थक आहे. हनियेहच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी हमासच्या अधिकाऱ्याला केलेल्या फोन कॉलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग इब्राहिम यांनी फेसबुकवर पोस्ट केले होते, जे नंतर हटवण्यात आल्याचे लक्षात आले.
इराणमध्ये बुधवारी झालेल्या हनियेहच्या हत्येमुळे गाझामधील संघर्षाचे रुपांतर आता मध्य पूर्वेकडील मोठ्या युद्धात होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने जगाची चिंता वाढली आहे.
मे महिन्यात कतारमध्ये हनियेहची भेट घेतलल्या इब्राहिम यांनी आपले हमासच्या राजकीय नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत परंतु लष्करी स्तरावर कोणतेही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
“हा मेटासाठी एक स्पष्ट आणि निःसंदिग्ध संदेश म्हणून कामी येईल की हे भ्याडपणाचे प्रदर्शन थांबवा,” असे इब्राहिम यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केले.
मेटाने या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी गुरुवारी करण्यात आलेल्या विनंतीला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मलेशियाचे दळणवळण मंत्री फाहमी फडझील म्हणाले की याप्रकरणी मेटाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. पोस्ट आपोआप दिसेनाशी झाली की कोणाच्या तक्रारीवरून ती हटवण्यात आली आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
गाझावर राज्य करणाऱ्या पॅलेस्टिनी इस्लामी चळवळ हमासला ‘धोकादायक संघटना’ म्हणून मेटाने याआधीच घोषित केले आहे आणि या गटाची स्तुती करणाऱ्या मजकुरावरही बंदी घातली आहे. त्यामुळे याविषयी पोस्ट करण्यात आलेली ग्राफिक्स काढून टाकण्यासाठी किंवा त्याला लेबल लावण्यासाठी मेटा स्वयंचलित तंत्रज्ञान आणि मानवी पुनरावलोकन असे दोन्ही प्रकार एकत्रितपणे वापरते.
मलेशियाने यापूर्वीही मेटाकडे कंटेंट काढून टाकल्याबद्दल तक्रार केली आहे, ज्यात इब्राहिम यांची हनियेहशी झालेल्या शेवटच्या भेटीबाबत स्थानिक माध्यमांच्या कव्हरेजचा समावेश आहे. तक्रारीनंतर हटवण्यात आलेला कंटेंट पुन्हा एकदा अपलोड करण्यात आला होता.
त्यावेळी मेटाने म्हटले होते की ते त्यांच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवरील आवाज जाणूनबुजून दडपत नव्हते किंवा पॅलेस्टिनींना पाठिंबा देणाऱ्या कंटेंटवर निर्बंधही घालत नव्हते.
मलेशियाने बऱ्याच काळापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षावर द्विराष्ट्राच्या संकल्पनेचे समर्थन केले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आता नऊ महिने जुन्या युद्धात दोन्ही बाजूंनी झालेल्या प्रचंड जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर, द्वि-राज्य तोडग्यासाठी मलेशियाचा खरोखर किती पाठिंबा आहे हे स्पष्ट झालेले नाही.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)