शेतकरी कुटुंबातून आलेल्या सिमरन थोरात हिने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सिमरनने सातासमुद्रापार जाण्याचं, त्यासाठी समुद्रावर स्वार होण्याचं स्वप्न पाहिलं.
पण स्वप्न सत्यात उतरणं अतिशय आव्हानात्मक होतं. मर्चंट नेव्हीत काम करायची इच्छा असणाऱ्यांसाठी पुण्यात तीन वर्षांचा एक अभ्यासक्रम आहे. त्याची फी आहे जवळपास 9 लाख रुपये. शेतकरी कुटुंबातल्या सिमरनसाठी फीचा हा आकडा फार मोठा होता. त्यातच भावाच्या शिक्षणासाठी वडिलांनी जमिनीचा एक तुकडा विकला होता. इंदापूरच्या बाहेरचं जगही न बघितलेल्या पालकांनी मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात असलेली उरलीसुरली जमीनही विकली आणि शिक्षणासाठी आवश्यक पैशांची तजवीज केली.
शेतकरी असलेल्या वडीलांनी जमीन विकल्यावर इलेक्ट्रीशियनचे काम सुरू केले तर आईने इंदापूरच्या फरेरो चॉकलेट फॅक्टरीत काम करायला सुरूवात केली. आर्थिक प्रश्न सुटल्यानंतर दुसरी सर्वात मोठी अडचण आली ती समाज काय म्हणेल? कुटुंबातील एक मुलगी महिनो न् महिने दूर जहाजावर अनोळखी लोकांबरोबर कशी रहाणार? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला. पण सिमरनच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या निर्णयामागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला.
सिमरनचा भाऊदेखील मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून काम करतोय. आपल्या पालकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम भावाने म्हणजे शुभम थोरातने केले. आर्थिक-सामाजिक अडथळे दूर केल्यानंतर काही शिक्षणाशी, भाषेशी संबंधित अडचणी होत्या. आठवीपर्यंत केवळ मराठी माध्यम आणि त्यानंतर सेमी इंग्रजीत शिक्षण झाल्यामुळे मर्चंट नेव्हीचा पूर्णपणे इंग्रजी भाषेत असलेला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे तसे अवघडच होते. तरीही सिमरनने मेहनत करत हा कोर्स पूर्ण केला.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिमरने हा संपूर्ण प्रवास तिच्यासाठी किती आव्हानात्मक होता ते सांगितले आहे. “माझ्या बॅचमधील इतर मुलींप्रमाणेच मी पण एक चांगली विद्यार्थीनी होते, पण सुरुवातीच्या प्लेसमेंट फेरीत मला नाकारण्यात आले. माझे इंग्रजी अस्खलित नसल्यामुळे मला एका मोठ्या शिपिंग कंपनीतील नोकरी नाकारली गेली. मी निराश झाले, पण त्यातूनही स्वतःला सावरत आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. मी भावाशी फोनवर इंग्रजीत बोलू लागले.”
सन २०१९मध्ये तिची कॉलेजमधूनच व्हँकुव्हर येथील (कॅनडा) ‘सिस्पन शिप मॅनेजमेंट’ या कंपनीत निवड झाली. तिने बीएसस्सी नॉटिकल सायन्स ही पदवी घेतली. या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. मात्र, भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी असल्याने इतिहास घडला. तिच्या यशस्वी कामगिरीनंतर अनेक भारतीय मुलींची निवड करण्यात आली. २०१९मध्येच सिमरनने डेक कॅडेट म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तिने पुढील परीक्षा देऊन लायसन्स मिळवले. त्यानंतर तिची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून ‘सिस्पन’मध्ये निवड झाली.
कामाच्या निमित्ताने आजवर सिमरनने २०पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास केला आहे. आपल्या या यशात आई, वडील आणि भावाचे मोठे योगदान असल्याचे ती अभिमानाने सांगते. अलीकडच्या काळात मर्चंट जहाजांवर सागरी चाच्यांचे हल्ले वाढले आहेत. याबाबत भीती वाटते का? असा प्रश्न विचारला असता सिमरन सांगते की, आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. आम्हाला सर्व आणीबाणीच्या प्रसंगासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. तरीही असे काही प्रसंग घडू नयेत, याची मी प्रार्थना करते.
सिमरन आणि शुभम ही दोन्ही भावंडे इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जमीन ते आपल्या आई-वडिलांना भेट म्हणून देणार आहेत.