नामिबियाच्या सत्ताधारी एसडब्ल्यूएपीओ पक्षाच्या नेतुंबो नंदी-नदैतवाह यांची अध्यक्षपदी निवड झाली असून त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असतील असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या निकालात म्हटले आहे.
कोण आहेत नंदी-नदैतवाह?
72 वर्षीय नंदी-नदैतवाह या सध्या उपराष्ट्रपती आहेत. निवडणुकीत त्यांना मिळालेल्या विजयामुळे 1990 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदापासून नामिबियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली 34 वर्षे सत्तेवर असणाऱ्या एसडब्ल्यूएपीओचा हा एक प्रकारे सत्ता विस्तार असल्याचे मानले जात आहे.
नामिबियाच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या तपशीलानुसार, राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नंदी-नदैतवाह यांना अंदाजे 57 टक्के मते मिळाली. विजयासाठी त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवणे आवश्यक होते. “नामिबिया राष्ट्राने शांतता आणि स्थैर्यासाठी मतदान केले आहे”, असे नंदी-नदैतवाह यांनी विजयाची घोषणा झाल्यानंतर सांगितले.
1960 च्या दशकात स्वातंत्र्यासाठी लढा देत असताना त्या एसडब्ल्यूएपीओमध्ये सामील झाल्या आणि लोकशाही स्वीकारल्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
या निवडणुकीत त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इंडिपेंडंट पॅट्रियट्स फॉर चेंज (आयपीसी) पक्षाचे पांडुलेनी इटुला होते, जे अंदाजे 26 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.
अडथळ्यांवर मात
नामिबियामध्ये राष्ट्रीय विधानसभेसाठी स्वतंत्रपणे मतदान झाले. 96 पैकी 51 जागा जिंकून एसडब्ल्यूएपीओने तिथेही बहुमत मिळवले. आयपीसीने 20 जागा जिंकल्या असून ते अधिकृतरित्या विरोधी पक्ष असतील.
आयपीसीने म्हटले आहे की ते या निकालानां न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यांच्या मते ही निवडणूक प्रक्रिया “अत्यंत सदोष” होती.
तांत्रिक अडचणी आणि मतपत्रिकेच्या कमतरतेमुळे 27 नोव्हेंबरच्या मतदानात व्यत्यय आला, ज्यामुळे काही ठिकाणी मतदानाची वेळ वाढवल्यामुळे निकाल जाहीर करायला विलंब झाला.
राजकीय विश्लेषकांच्या मते बेरोजगारी आणि असमानतेच्या वाढत्या प्रकरणांमुळे वाढणाऱ्या नैराश्यामुळे एसडब्ल्यूएपीओचा विजय अनिश्चित होता. मात्र राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यामुळे पक्षाने ग्रामीण भागात मजबूत मुळे आणि वृद्ध, जुन्या मतदारांमध्ये आपली निष्ठा कायम राखली.
विश्लेषक रक्केल अँड्रियास म्हणाले की, नंदी-नदैतवाह यांनी एसडब्ल्यूएपीओमधील विविध गटांना एकत्र आणण्यात यश मिळवले असून पक्षाच्या इतर सदस्यांप्रमाणे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा खराब झालेली नाही.
“ती एक राष्ट्रमाता आहे. आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आमचे नेतृत्व करत आली आहे.” “तिला व्यवस्था समजते,” असे अँड्रियास म्हणाले.
अनुकृती
(रॉयटर्स)