ब्रिटन संसदेला लक्ष्य करणाऱ्या परदेशी हेरगिरीबद्दल MI5ने जारी केला इशारा

0
ब्रिटनचे संसद सदस्य हे चीन, रशिया आणि इराणच्या हेरगिरीचे लक्ष्य असल्याचा सार्वजनिक इशारा ब्रिटनची देशांतर्गत गुप्तचर संस्था MI5 ने दिला आहे. देशाच्या लोकशाही व्यवस्थेला कमकुवत करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

चीनसाठी संसद सदस्यांवर गुप्तपणे पाळत ठेवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन ब्रिटिशावर सुरू असणाऱ्या खटल्यात त्यांना सोडून द्यावे लागले असे सरकारी वकिलांनी म्हटल्यानंतर एका आठवड्याने हा इशारा देण्यात आला आहे. ब्रिटिश सरकारने चीन त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

MI5 ने राजकारण्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल किंवा फिशिंग हल्ल्यांद्वारे, त्यांच्याशी दीर्घकालीन आणि खोल संबंध जोपासून किंवा त्यांच्या निर्णयांवर प्रभाव पाडण्यासाठी देणग्या देऊन त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेरांवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला.

“जेव्हा इतर देश ब्रिटनमधील महत्त्वाची माहिती चोरतात किंवा आपल्या लोकशाही प्रक्रियांमध्ये फेरफार करतात तेव्हा ते केवळ अल्पावधीतच आपल्या सुरक्षेला हानी पोहोचवत नाहीत, तर आपल्या सार्वभौमत्वाचा पायाही उद्ध्वस्त करतात,”  असे MI5 चे महासंचालक केन मॅककॉलम म्हणाले.

‘स्वतःच्या संरक्षणासाठी पावले उचला’

MI5 ने राजकारण्यांना “विचित्र पद्धतीने घडणाऱ्या सामाजिक संवादांचा मागोवा ठेवा” असे आवाहन केले, ज्यात खाजगीपणे  भेटण्यासाठी वारंवार केल्या जाणाऱ्या विनंत्याचा समावेश आहे आणि “उघडपणे स्तुती केली जात असेल” तर काळजी घ्या असा सल्ला दिला आहे.

संसद सदस्यांना दिलेल्या सल्ल्यासोबतच्या टिप्पण्यांमध्ये, मॅकलम म्हणाले: “ही मार्गदर्शक तत्वे वाचणाऱ्या प्रत्येकाला ब्रिटन लोकशाहीमध्ये त्यांच्या भूमिकेची खूप काळजी आहे. त्याचे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आजच पावले उचला.”

जानेवारी 2022 मध्ये, MI5 ने वकील क्रिस्टीन ली यांच्याबद्दल एक अलर्ट नोटीस पाठवली, ज्यामध्ये चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ब्रिटनमध्ये “राजकीय हस्तक्षेपाच्या कार्यात त्या सहभागी” असल्याचा आरोप करण्यात आला होता.

हाऊस ऑफ कॉमन्सच्या स्पीकरने कायदेकर्त्यांना हा इशारा पाठवला होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की MI5 ला आढळले आहे की ली यांनी “हाँगकाँग आणि चीनमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या वतीने सेवा करणाऱ्या आणि इच्छुक संसद सदस्यांना आर्थिक देणग्या दिल्या आहेत.”

ली यांनी नंतर त्यांचे नाव काढून टाकण्यासाठी MI5 वर खटला दाखल केला, परंतु त्या या खटला हरल्या.

गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यापासून ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी चीनशी संबंध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, तर लंडन आणि बीजिंग यांनी वारंवार एकमेकांवर हेरगिरीचे आरोप केले आहेत, ब्रिटिश सुरक्षा सेवांनी चीनकडून त्यांच्या राजकीय आणि व्यावसायिक समुदायांमध्ये होऊ शकणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांबद्दल इशारा दिला आहे.

अलिकडेच रद्द झालेल्या खटल्याच्या बाबतीत, लंडनमधील चीनच्या दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे: “आम्ही सुरुवातीपासूनच यावर जोर दिला आहे की चीनने संबंधित ब्रिटीश व्यक्तींना ‘ब्रिटनची गुप्त माहिती चोरण्याचे’ निर्देश दिल्याचा आरोप पूर्णपणे बनावट आणि द्वेषपूर्ण निंदेतून करण्यात आला आहे, जो आम्ही ठामपणे नाकारतो.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमंगोलियाचे राष्ट्रपती चार दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी भारतात दाखल
Next articleसंरक्षण आधुनिकीकरणाच्या बजेटपैकी 50% निधी, सप्टेंबरपर्यंत खर्च झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here