संपादकीय टिप्पणी
भारतात सी-295 वाहतूक विमाने तयार करण्याचा प्रकल्प हा आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या दिशेने एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. हा प्रकल्प एका खासगी कंपनीने ओईएम (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स) यांच्या सहकार्याने सुरू केला आहे, यामुळे एरोस्पेस क्षेत्रातील आपली डिझाइन आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (TASL) आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस ए, स्पेन यांच्यामधील हा उपक्रम त्याच्या आताच्या क्षमतेच्या पलिकडे जाऊ शकतो आणि बाजारातील आवश्यकतेनुसार वेळोवेळी आपली उत्पादनक्षमता वाढवण्याची शक्यता आहे.
—————————————————————————-
भारतीय सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण हे भारत सरकारच्या मुख्य लक्ष्य क्षेत्रांपैकी एक आहे. भारत सरकारने लष्करी विमान वाहतूक क्षेत्रासह सर्व सशस्त्र दलांच्या जहाजांच्या आधुनिकीकरणासाठी 130 अब्ज डॉलर खर्चाचा रोडमॅप तयार केला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठी चालना देत आणि भारतीय सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस, एसए, स्पेन यांनी 30 ऑक्टोबर 2022 रोजी C-295 वाहतूक विमाने बनवण्याच्या कारखान्याची पायाभरणी केली. आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल विशेष महत्त्वाचे आहे, कारण भारतात लष्करी विमाने तयार करणारा खासगी क्षेत्रातील हा पहिला कारखाना असेल.
भारतातील लष्करी विमान वाहतूक उद्योग
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) 1942मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय हवाई दल तसेच लष्कर आणि नौदलासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि एव्हीओनिक्सचे उत्पादन, डिझाइन आणि निर्मितीबरोबरच भारतीय लष्करी विमानांसाठी ओव्हरहॉलिंग, अपग्रेडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच अतिरिक्त पुरवठा अविरतपणे करत आहे. खरं तर, मिग-21, मिग-27, बायसन, जग्वार, हॉक आणि एसयू-30 तसेच किरण आणि एचपीटी-32 यासारख्या प्रशिक्षण विमानांद्वारे एचएएल भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षेत्राला बळकटी देण्यात गुंतले आहे.
हेलिकॉप्टर निर्मितीच्या क्षेत्रात, एचएएलने झपाट्याने आपली व्याप्ती वाढवली आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या तसेच तटरक्षक दलाच्या गरजांची पूर्तता करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी चेतक, चिता, लान्सर, चीतल आणि चेतन अशा हेलिकॉप्टर्सची निर्मिती आणि पुरवठा तर केलाच, त्याबरोबरीने नंतर त्यांच्या प्रगत आवृत्यांवरही काम केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ची निर्मिती, जे तिन्ही सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले गेले. त्याचेच शस्त्रास्त्रवाहक रूप ‘रुद्र’ आणि नुकतेच सादर केलेले लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) ‘प्रचंड’ यामुळे भारताला लष्करी विमान वाहतूक उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यात अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.
लढाऊ विमानांमध्ये झालेली प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे. भारताच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने (ADA) विकसित केलेल्या आणि एचएएलद्वारे उत्पादित झालेल्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजसला इतकी मागणी आहे की, त्याचे उत्पादन कमी पडत आहे. हे 4.5 जनरेशनचे विमान असून भारतीय हवाई दलाने 300हून अधिक संख्येची विमाने निश्चित केली आहे. एलसीएच्या इतर प्रकारांमध्ये ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर (टीईडीबीएफ) समाविष्ट आहे जे नौदलासाठी आहे. पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) निर्धारित वेळेत विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हा आत्मनिर्भर भारताच्या लष्करी विमानचालनाचा नवा चेहरा असल्याचे द्योतक आहे.
स्वदेशी वाहतूक विमानांचे उत्पादन
आपले लक्ष प्रामुख्याने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरवर ठेवून, एचएएलने भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतूक विमानांच्या उत्पादनाची गती योग्य प्रमाणात ठेवली. एचएएलने प्रथम भारतीय हवाई दल आणि भारतीय एअरलाइन्ससाठी हॉकर सिडले एचएस 748 एवरो विमान तयार केले. नंतर ट्विन टर्बोप्रॉप शॉर्ट टेक-ऑफ आणि लँडिंग (STOL) युटिलिटी विमान डॉर्नियर 228चा त्यात समावेश झाला. या दोन्ही विमानांचा भारतीय हवाई दलाने दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला. डॉर्नियरचा वापर भारतीय नौदलाने टेहळणी आणि दळणवळण या दोन्हीसाठी केला होता. याशिवाय प्रशिक्षणासाठी सुद्धा ही विमाने दोन्ही दलांत वापरली गेली. दोन्ही हलकी वाहतूक विमाने हलक्या बहुपयोगी कामांसाठी भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार आहेत. दोन दशकांपूर्वी, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने (NAL) देशातील पहिले बहुउद्देशीय नागरी लाइट ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट ‘सारस’ हे वाहतूक विमान श्रेणीमध्ये तयार केले. या क्षेत्रातील पुढची पायरी म्हणजे एनएएलने डिझाइन केलेले प्रादेशिक परिवहन विमान (RTA) किंवा भारतीय प्रादेशिक जेट (IRJ) जे एचएएलद्वारे 2026पर्यंत तयार केले जाणार आहे.
C-295चे भारतात उत्पादन : आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक पाऊल
एचएएलनिर्मित एवरो विमाने टप्प्याटप्प्याने बाद करून त्यांच्या जागी नवी विमाने येण्याची जी गरज निर्माण झाली होती, आता सी-295 वाहतूक विमानाच्या वडोदरा कारखान्यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत एअरबस डिफेन्स एसए स्पेन आणि टीएएसएल यांच्यात झालेल्या कराराच्या पूर्ततेमुळे पूर्ण होणार आहे. करारानुसार, उड्डाणासाठी तयार स्थितीतील पहिली 16 विमाने सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान भारताला मिळतील, तर पहिले भारतीय बनावटीचे विमान सप्टेंबर 2026मध्ये कारखान्यातून बाहेर पडेल आणि उर्वरित 39 विमाने ऑगस्ट 2031पर्यंत मिळतील. टाटा एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स (Tata A&D) 40, C-295 विमाने बनवणार आहेत, त्यापैकी 8 सेमी नॉक्ड डाउन (SKD) किट आणि 8 Antiirally Knocked Down (CKD) किटमधून येतील. उर्वरित 24 विमानांची मुख्य जोडणी आणि उपजोडणी येथेच होणार आहे. याचा अर्थ दरवर्षी अंदाजे 8 विमाने तयार होतील.
समकालीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले, सी-295 हे पाच ते दहा टन वजनाचे वाहतूक विमान आहे, जे युद्धजन्य परिस्थितीत सैन्य आणि मालवाहतूक करण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि ते सामरिक वाहतूक विमान म्हणूनही तैनात केले जाऊ शकते. हे अवघड हवाई पट्ट्यांवर आणि ग्राउंड सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर फारसे अवलंबून न राहता ऑपरेट केले जाऊ शकते. असे म्हटले जाते की, पूर्णपणे लोड केलेल्या स्थितीत देखील ते कोणत्याही विशेष समस्येशिवाय सॉफ्ट ग्राऊंडवर वापरले जाऊ शकते. यात ऑटो-रिव्हर्स क्षमता देखील आहे. केवळ 12 मीटर रुंदीमध्ये ते धावपट्टीवर 180 अंशांपर्यंत फिरू शकते. हे 71 सैनिक किंवा 50 पॅराट्रूपर्सना अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकते जिथे सध्याची अवजड विमाने जाऊ शकत नाही.
सामरिक वाहतुकीचे प्रमुख साधन या व्यतिरिक्त, सी-295 विविध मोहिमा प्रभावीपणे पार पाडू शकते. यामध्ये पॅराशूट आणि कार्गो सोडणे, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, वैद्यकीय निर्वासन आणि सागरी गस्त यांचा समावेश आहे. या विविध भूमिकांसाठी आवश्यक असलेली अनेक साधने पॅलेटवर बसवली जातात, जी आवश्यकतेनुसार पटकन जोडली किंवा काढली जाऊ शकतात. ही विमाने लहान किंवा अर्धवट बांधलेल्या हवाई पट्ट्यांवरही काम करू शकत असल्याने ते दऱ्यांमध्ये किंवा हिमालयात उंचावरील कामगिऱ्यांसाठी देखील योग्य असतील. भविष्यात गरज भासल्यास हवाई बॉम्बफेक करण्याचे कामही ही विमाने करू शकतील.
संरक्षण क्षेत्रातील ही अशा प्रकारची पहिली आणि सर्वात मोठी गुंतवणूक आहे, जी देशांतर्गत संरक्षण आणि विमान वाहतूक उत्पादन परिसंस्थेला चालना देणार आहे. टाटा-एअरबस सी-295 मॅन्युफॅक्चरिंग प्लांटने भारतातील खासगी क्षेत्राला तंत्रज्ञान-केंद्रित आणि अत्यंत स्पर्धात्मक विमान उद्योगात प्रवेश करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि संरक्षण निर्यात वाढेल.
सी-295 प्रकल्पाचा भारतातील भविष्यातील लष्करी विमान वाहतुकीवर परिणाम
भारतातील लष्करी विमान वाहतूक झपाट्याने वाढत आहे आणि अलीकडे आत्मनिर्भरतेवर भर दिल्याने या क्षेत्राला एक विलक्षण गती प्राप्त होणार आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी समकालीन तंत्रज्ञानाचा फायदा आणि खासगी क्षेत्राची सोबत यामुळे स्वदेशी उत्पादनांच्या पायाभूत सुविधांना निश्चितच चालना मिळेल.
भारतात सी-295च्या उत्पादनासारखे प्रकल्प सुरू केल्याने ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ उपक्रमांतर्गत देशाने किती प्रगती केली आहे, हे दिसून येते. संरक्षण क्षेत्रातील ही सर्वात मोठी आणि अशा प्रकारची पहिली गुंतवणूक आहे, जी देशांतर्गत संरक्षण आणि विमान वाहतूक उत्पादन इकोसिस्टम मजबूत करणारी आहे. भारत ही सर्वात वेगाने वाढणारी हवाई वाहतूक बाजारपेठ आहे आणि इथे नागरी विमाने आणि इंजिनांना मोठी मागणी आहे. देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलसाठी (MRO) देखील एक चांगली बाजारपेठ आहे, ज्याचा वापर करणे आवश्यक आहे. लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातील प्रगती म्हणून, भारताने आधीच एलसीए, एलसीएच सारखी स्वदेशी बनावटीची विमाने आणि ब्रह्मोस सारखी शस्त्रे निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक क्षेत्र आणि यूएव्हीमध्येही असे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील.
आत्मनिर्भर भारत मिशनअंतर्गत मूल्य साखळीत (व्हॅल्यू चेन) झालेल्या प्रगतीमुळे आज आपण भारताचे जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतर होताना पाहत आहोत. एक विश्वासार्ह संरक्षण उत्पादक राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही गती कायम राखली पाहिजे.
एअर कमांडर एसपी सिंह, वीएमएस (निवृत्त)
(अनुवाद : आराधना जोशी)