सौदी अरेबियात हज यात्रेदरम्यान किमान 19 जॉर्डनियन आणि इराणी यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे संबंधित देशांतील अधिकाऱ्यांनी 16 जून रोजी सांगितले. यंदा तापमानात झालेली वाढ हज यात्रेकरूंसाठी मोठा अडसर बनली आहे.
जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, हज यात्रेतील धार्मिक विधी पार पाडताना जॉर्डनच्या चौदा यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर 17 जण बेपत्ता आहेत. मंत्रालयाने नंतर पुष्टी केली की या 14 जणांचा मृत्यू “तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे झाला आहे.”
इराणच्या रेड क्रिसेंटचे प्रमुख पीरहोसेन कुलिवंद यांनी स्वतंत्रपणे सांगितले की, “या वर्षी हजदरम्यान मक्का आणि मदिना येथे आतापर्यंत पाच इराणी यात्रेकरूंनी आपला जीव गमावला आहे.” मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेली हज यात्रा ही इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे आणि सुसंपन्न असलेल्या सर्व मुस्लिमांनी ही यात्रा किमान एकदा तरी केली पाहिजे असे मानले जाते. यंदा सुमारे 18 लाख यात्रेकरू सहभागी होत असलेल्या वार्षिक यात्रेदरम्यान तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
यात्रेमधील अनेक धार्मिक विधी मोकळ्या जागेत आणि चालत पार पाडले जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते.
सौदी अरेबियाने मृतांची कोणतीही माहिती अद्याप उघड केलेली नाही. हवामान-नियंत्रित क्षेत्रांबरोबरच उष्णता कमी करण्याच्या अनेक उपाययोजना देशाने यात्रेच्या निमित्ताने राबवल्या आहेत. यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी पाणी वाटपाचे काम सुरू आहे. यात्रेकरूंनी तीव्र सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत सातत्याने सल्ला दिला जात आहे.
विविध देशांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार – यात मृत्यूची कारणे नमूद केलेली नाहीत – गेल्या वर्षीच्या हज यात्रेदरम्यान किमान 240 लोक मृत्यूमुखी पडले. यातील बहुतांश यात्रेकरू इंडोनेशियातील होते. गेल्या वर्षी उष्णतेशी संबंधित 10,000 हून अधिक आजारांची नोंद झाली होती, त्यापैकी 10 टक्के उष्माघाताचे रुग्ण होते, असे एका सौदी अधिकाऱ्याने या आठवड्यात सांगितले.
सौदीने केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले गेले आहे की प्रत्येक दशकात प्रादेशिक तापमानात 0.40 अंश सेल्सिअसची वाढ होत आहे. उष्णता कमी करण्याच्या उपायांचाही त्यासाठी फार उपयोग होत नाही.
आराधना जोशी
(रॉयटर्स इनपुट्ससह)