रशिया आणि चीनच्या आक्रमक धोरणांमुळे निर्णय घेतल्याची माहिती
दि. १७ जून: ‘चीन आणि रशियाकडून असलेल्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर अटलांटिक क्षेत्रीय करार संघटनेच्या (नाटो) सदस्य देशांतही आपली अण्वस्त्रे तैनातीसाठी तयार ठेवण्याबाबत चर्चा सुरु आहे. जग अण्वस्त्रमुक्त असले पहिजे अशीच ‘नाटो’ची भूमिका आहे. मात्र, चीन, रशिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांकडे अण्वस्त्रे असताना अण्वस्त्रमुक्ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही,’ असे प्रतिपादन नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्तोल्तेन्बर्ग यांनी सोमवारी ब्रिटनमधील ‘द टेलिग्राफ’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.
चीन आणि रशियाचा वाढता विस्तारवाद आणि त्यांच्याकडून जागतिक शांततेला असलेला धोका युक्रेन आणि तैवानबाबत या दोन्ही देशाच्या भूमिकांमुळे अधिक स्पष्ट झाला आहे. त्याचा विचार करता आपल्याकडील अण्वस्त्रे अधिक प्रमाणत तैनात करण्याचा विचार ‘नाटो’च्या सदस्य देशांत सुरु आहे. त्यावरील चर्चा प्रगतीपथावर आहे. मात्र, प्रत्येक सदस्य देशाने आपल्या अण्वस्त्रसंभाराबाबत आणि त्यांच्या प्रतिकारक्षमतेबाबत अतिशय पारदर्शी असावे आणि त्याची माहिती ‘नाटो’ सदस्यांना असावी, अशी आमची भूमिका आहे, असे स्तोल्तेन्बर्ग यांनी स्पष्ट केले. ‘किती अण्वस्त्रे सध्या कार्यान्वित करण्यात आली आहेत, किती तयार थावण्यात आली आहेत, अशा परिचालनविषयक तपशीलात मी आता शिरणार नाही. मात्र, या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे आणि आम्ही नेमके तेच करीत आहोत,’ असे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. ही पारदर्शकता आम्हाला आम्ही आण्विक युती आहोत, हा थेट संदेश द्यायला (रशिया आणि चीन यांना) उपयोगी पडेल, असेही ते म्हणाले. जग अण्वस्त्रमुक्त असले पहिजे अशीच ‘नाटो’ची भूमिका आहे. मात्र, चीन, रशिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांकडे अण्वस्त्रे असताना अण्वस्त्रमुक्ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. चीन, रशिया आणि उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत आणि ‘नाटो’कडे नाहीत, ही परिस्थिती तर जगासाठी अधिक धोकादायक आहे, असेही ते म्हणाले.
‘नाटो’च्या सदस्य देशांकडे असलेली अण्वस्त्रे हे जगासाठी सुरक्षेची सर्वोच्च खात्री आहे आणि त्याचा अर्थ शांतता कायम ठेवणे असा आहे, असे स्तोल्तेन्बर्ग यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. ‘युक्रेनच्या पाश्चिमात्य मित्रदेशांनी दिलेल्या शस्त्रांचा वापर युक्रेनकडून रशियाविरोधात झाल्यास त्यांना त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील. रशिया त्यांच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दिला होता. युक्रेनचे पाश्चिमात्य मित्र जगाला अणुयुद्धाच्या खाईत लोटत आहेत, असे पुतीन म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर स्तोल्तेन्बर्ग यांनी ही मुलाखत दिली आहे. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला शस्त्रे आणि इतर सामग्रीचा पुरवठा नाटोकडून होत आहे. अमेरिकेने युरोपच्या बऱ्याच भागात आपली अण्वस्त्रे तैनात केली आहेत हे उघड गुपित असले, तरी अण्वस्त्रांच्या विषयांत ‘नाटो’कडून कधी उघडपणे बोलले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर स्तोल्तेन्बर्ग यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)