युरोपमधील व्यवसायिकांनी युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहावे तसेच रशिया आणि चीनसारख्या देशांकडून होणाऱ्या ब्लॅकमेलचा धोका कमी करण्यासाठी त्यानुसार आपले उत्पादन आणि वितरण कसे करता येईल याचा विचार करण्याचे आवाहन नाटोच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सोमवारी केले.
नाटोच्या लष्करी समितीचे अध्यक्ष डच ॲडमिरल रॉब बाउर यांनी ब्रुसेल्समध्ये सांगितले की, “जर आम्ही सर्व महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू यापैकी काहीही वेळेमध्ये वितरित करू हे निश्चित करू शकलो तर तो आमच्या प्रतिबंधात्मक प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असेल.”
युरोपियन पॉलिसी सेंटर थिंक टँकच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लष्करी क्षमतेच्या पलीकडे जाणे असे म्हटले आहे, कारण सर्व उपलब्ध साधने युद्धात वापरली जाऊ शकतात आणि वापरली जातील.
बाउर म्हणाले, “विध्वंसक कृत्यांच्या वाढत्या संख्येमुळे आम्ही या सगळ्याचा अनुभव घेत आहोत आणि युरोपने देखील ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीत हे पाहिले आहे.”
“आम्हाला वाटले की आम्ही गॅझप्रॉमशी करार केला आहे, परंतु प्रत्यक्षात आम्ही पुतीन यांच्याशी करार केला. चीनच्या मालकीच्या पायाभूत सुविधा आणि वस्तूंच्या बाबतीतही हेच लागू होते. आम्ही प्रत्यक्षात (चीनचे अध्यक्ष) शी (जिनपिंग) यांच्याशी करार केला आहे.”
नाटोच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने चीनकडून होणाऱ्या पुरवठ्यावर पाश्चिमात्य देशांचे अवलंबित्व असल्याचे नमूद केले, ज्यात 60 टक्के दुर्मिळ खनिज सामग्री उत्पादित केली जाते आणि 90 टक्के प्रक्रिया तेथे केली जाते. ते म्हणाले की सडेटिव्हज्, प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि कमी रक्तदाबावरील औषधांसाठी आवश्यक रासायनिक घटक देखील चीनमधून येत आहेत.
“कम्युनिस्ट पक्ष त्या शक्तीचा कधीही वापर करणार नाही असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण मूर्ख आहोत. युरोप आणि अमेरिकेतील व्यावसायिकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्यांनी घेतलेल्या व्यावसायिक निर्णयांचे त्यांच्या देशाच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक परिणाम आहेत,” असेही बाउर यांनी जोर देऊन सांगितले.
“व्यवसायांनी युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्याची आवश्यक आहे आणि त्यानुसार त्यांचे उत्पादन तसेच वितरण कसे करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण लढाईत जरी सैन्य जिंकत असले तरी युद्धे जिंकून देण्यासाठी अर्थव्यवस्था महत्त्वाची असते.”
फेब्रुवारी 2022 मध्ये मॉस्कोने युक्रेनवर पूर्ण ताकदीने आक्रमण केले त्यावेळी असलेल्या लष्करापेक्षा आताचे रशियाचे लष्कर मोठे आहे मात्र त्यांची गुणवत्ता कमी झाली असल्याचा दावाही बाउर यांनी केला.
“त्या सैन्याचा दर्जा खालावलेला आहे,” असे नाटोच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय सैन्याच्या साधनसामुग्रीची स्थिती आणि रशियन सैन्याच्या प्रशिक्षण पातळीकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.ध्रुव यादव
(रॉयटर्स)
(रॉयटर्स)