पहिल्या AIKEYME 2025 सरावासाठी नौदल प्रमुख टांझानिया दौऱ्यावर

0
AIKEYME

 

हिंद महासागर प्रदेशातील सागरी मुत्सद्देगिरी आणि संरक्षण सहकार्याला लक्षणीय चालना देण्यासाठी, नौदल प्रमुख (सीएनएस) ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी शनिवारी टांझानियाच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्याला सुरुवात केली. भारतीय नौदल आणि टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स (टीपीडीएफ) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आफ्रिका इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट (AIKEYME) या अशा प्रकारच्या पहिल्या मोठ्या, बहुपक्षीय सागरी सरावाच्या उद्घाटनपर आवृत्तीत भारताचा सहभाग त्यांच्या भेटीमुळे चिन्हांकित होतो.


AIKEYME या शब्दाचा संस्कृतमधील अर्थ एकता असा आहे. या सागरी सराव उपक्रमाचे पहिले पर्व 13 ते 18 एप्रिल 2025  दरम्यान पार पडणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात सह-यजमान भारत आणि टांझानिया सोबत कोमोरोस, जिबूती, केनिया, मादागास्कर, मॉरिशस, मोझांबिक, सेशेल्स आणि दक्षिण आफ्रिका हे देशही सहभागी होणार आहेत.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या, आफ्रिकेतील प्रदेशांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर सामायिक आणि सर्वंकष प्रगती (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions – MAHASAGAR) अर्थात “महासागर” या दृष्टिकोनाला सुसंगत स्वरुपातच या सरावाचे आयोजन केले गेले आहे.

या सरावात भारताची विनाशिका आयएनएस चेन्नई आणि लष्करी सामग्री वाहक (Landing Ship Tank) आयएनएस केसरी हे मोठे जहाज सहभागी होणार आहे. आयएनएस चेन्नई 10 एप्रिल रोजी तर आयएनएस केसरी हे जहाज 11 एप्रिल 2025 रोजी दार-एस-सलाम येथे पोहोचले आहे.

AIKEYME 25 सरावादरम्यान बंदरावरील सरावाच्या टप्प्याअंतर्गत म्हणजे आज 13 एप्रिलला उद्घाटन समारंभ होणार असून भारताचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि टांझानियाचे संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक स्वागत समारंभ होणार आहे. बंदर टप्प्यामध्ये डेक रिसेप्शन, स्थानिक लोकांच्या जहाज भेटी आणि योग सत्रे तसेच मैत्रीपूर्ण क्रीडा सामन्यांसह सांस्कृतिक देवाणघेवाण देखील समाविष्ट असेल.

भारतीय नौदलाच्या निवेदनानुसार, 16 ते 18 एप्रिल या कालावधीत सागरी टप्प्यात ऑपरेशनल इंटरऑपरेबिलिटी आणि सागरी सुरक्षा सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सहभागी नौदलांना पायरसीविरोधी कवायती, टेबलटॉप आणि कमांड पोस्ट सराव, माहिती सामायिकरण प्रोटोकॉल आणि भेट,  व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीझर (व्हीबीएसएस) प्रशिक्षण देण्यात येईल.

हिंद महासागरीय जहाज सागर म्हणून 05 एप्रिल 2025 रोजी कारवारहून रवाना झालेले आयएनएस सुनयना हे भारताचे आणखी एक जहाज AIKEYME 25 मध्ये सहभागी होणार आहे.

प्रादेशिक सागरी प्रदेशातील परस्पर सामायिक आव्हानांवर सहकार्यात्मक उपाययोजना विकसित करणे हाच AIKEYME 25 या सरावाचा उद्देश आहे. भारतीय नौदलाचा या क्षेत्रासाठीचा हा पहिलाच उपक्रम असून, भागीदार देशांच्या नौदलांमधील परस्पर सहकार्य वाढवणे आणि संयुक्त नौदल मोहिमांसाठी परस्पर समन्वयित कार्यक्षमतेचा विकास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारत आणि आफ्रिकन देशांमधील दृढ तसेच मैत्रीपूर्ण संबंधही ठळकपणे अधोरेखित होणार आहेत.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleकाकीनाडामध्ये भारत-अमेरिका नौदल सराव शक्तीप्रदर्शनासह संपन्न
Next article ‘Hinduphobia’ बाबत विधेयक मांडणारे जॉर्जिया पहिले अमेरिकन राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here